किनवट : येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील व डाव्या बाजुचे अतिक्रमण तात्काळ काढून पुतळा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात यावा, या मागणीचे निवेदन शहरातील बौध्द युवकांनी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांना दिले.
निवेदनात असे नमूद करण्यात आले की, तमाम भारतीयांची अस्मिता असलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भोवताल जे अतिक्रमण वाढले आहे ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे. पुतळ्याच्या मागील व डाव्या बाजुने असलेल्या शासकीय जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण आपल्या कार्यालयामार्फत तात्काळ काढून पुतळा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येथे अधिकच्या जागेची नितांत गरज आहे. पुतळा व परिसराचे चांगल्या प्रकारे सुशोभिकरण करण्यात यावे. तसेच तयार होत असलेला विस्तारीत राज्य महामार्ग येथून जात असून विकासात्मक दृष्टीकोनातून पुतळ्याचे निर्माण कार्य होणे अपेक्षित आहे. म्हणून मुख्याधिकारी नगर परिषद, किनवट यांना विनंती आहे की, त्यांनी या कार्यात विशेष लक्ष देवून ठोस पाऊले उचलावीत व पुतळा परिसरातील वाढलेले अतिक्रमण तात्काळ काढून परिसर अतिक्रमणमुक्त करण्याची मागणीही केली आहे.




No comments:
Post a Comment