किनवट : तत्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्पाधिकारी यांनी महत प्रयासाने स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पिंपळशेंडा या अतिदुर्गम आदिवासी गावाला रस्ता करून दिला. आजही वाघदरी, मांजरीमाथा, घोगरवाडी ही गावे रस्त्यापासून वंचित आहेत. आदिवासी पाड्या- गुड्यात आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा लागेल. जल, जंगल, जमीन यावर निसर्गपूजक आदिवासींचा हक्क आहे. महाराणी दुर्गावती व शहीद बिरसा मुंडा यांनी दिलेल्या अस्मितेच्या लढ्याचं सूत्र आजही आदिवासींनी स्विकारणं गरजेचं आहे. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
येथील एन. के. गार्डन मध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने आयोजित 'जागतिक आदिवासी दिन' कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, तहसिलदार डॉ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, साजीद खान, आनंद मच्छेवार, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, खासदार हेमंत पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड, रामजी डुडुळे मंचावर उपस्थित होते. प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आदिवासीतील गुणवंत विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यूक्लिअस बजेट मधून पारधी अदिवासी युवकांना स्वयं रोजगारासाठी उपलब्ध करून दिलेल्या चारचाकी वाहनाची चाबी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
सामाजिक दरी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचं ध्येय आहे. वनहक्क धारकांना सर्व योजना व कर्जाचा लाभ द्यावा. असे आम्ही सर्व यंत्रणेला आदेश दिले आहेत. मांजरीमाथाचं काम लवकरच सुरु होणार आहे. वाघदरीचा प्रश्न सोडवण्यासाठीचा वेगळा अभ्यासपूर्ण प्रयास सुरु आहे. असे मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी आदिवासी नेते प्रा. किसन मिराशे, आदिवासी सेवक नारायणराव सिडाम, विद्यार्थिनी सीमा जंगले, सुनिल काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सर्व प्रथम मान्यवरांनी छत्रपती शिवराय, राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबडकर, शहीद बिरसा मुंडा या महानायकांसह आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य केलेल्या नायकांच्या प्रतिमांना पुष्पार्पूण दीप प्रज्वलन केले. शासकीय आश्रम शाळा किनवटच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाईले. नियोजन अधिकारी संदीप कदम यांनी प्रास्तविक व प्रा. गजानन सोनोने यांनी सूत्रसंचालन केले. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती तुपेकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमास शेतकरी संघटनेचे त्रिभूवनसिंग ठाकूर, अभि. प्रकाश टारपे, पीएम पोषण योजनेचे अधिक्षक अनिल महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड , कोंडबाजी खोकले आदी मान्यवरांसह आदिवासी नेते, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. माधव देशमुखे यांनी घेतलेल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.






No comments:
Post a Comment