“मेरी माटी - मेरा देश” अभियानाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक लोकसहभागातून राज्यात हे अभियान यशस्वी करावे -प्रधान सचिव विकास खारगे - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, August 7, 2023

“मेरी माटी - मेरा देश” अभियानाच्या पूर्वतयारीची आढावा बैठक लोकसहभागातून राज्यात हे अभियान यशस्वी करावे -प्रधान सचिव विकास खारगे



मुंबई, ता. 7 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी - मेरा देश’ अर्थात ‘माझी माती - माझा देश’ या अभियानाने होणार असून राज्यात लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे, अशा सूचना मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिल्या. 

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधत श्री. खारगे यांनी या अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला व उपयुक्त सूचना दिल्या. 

“देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असून सर्व यंत्रणांनी याचे सूक्ष्म नियोजन करावे. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून व जास्तीत जास्त लोकसहभागातून हे अभियान उत्तमप्रकारे आयोजित करावे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारणे हे उपक्रम आयोजित करावयाचे आहेत”, असे श्री. खारगे यांनी सांगितले.

“9 ते 30 ऑगस्ट, 2023 दरम्यान, 'मेरी माटी - मेरा देश' मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्यस्तरावरील कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. दिल्लीत 'अमृत वाटिका' तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन 'अमृत कलश यात्रा' काढण्यात येणार असून ही 'अमृत वाटिका' 'एक भारत श्रेष्ठ भारत' या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे. जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी (जन भागीदारी) https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, लोक माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी या संकेतस्थळावर अपलोड करू शकतील”, अशी माहिती श्री. खारगे यांनी दिली.

“भारताला विकसित देश बनवणे, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे, एकता आणि बंधुता टिकवून ठेवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यांप्रति आदर व्यक्त करणे यावर आधारित प्रतिज्ञा घेणे व प्रतिज्ञा घेतल्यानंतर सहभागाचे डिजिटल प्रमाणपत्र वेबसाइटवरून डाउनलोड करणे, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करावे”, असेही श्री. खारगे म्हणाले.

30 ऑगस्ट 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे अभियानाचा समारोप समारंभ होणार आहे. संपूर्ण अभियानाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्याच्या तसेच अभियान प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना प्रधान सचिव श्री. खारगे यांनी दिल्या.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News