हदगांव (गौतम कदम ) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दत्ता पाटलांनी ता. ०२ सप्टेंबर पासून सुरू केलेले अमरण उपोषण आजही सुरू आहे. त्यांच्यासोबत कालपासून (ता.12) अन्य पाच जण उपोषणाला बसले आहेत. आज (ता.13) उपोषणाच्या समर्थनार्थ अंबाळा येथील शेतकऱ्यांनी सुमारे १०० ट्रॅक्टरची रॅली शहरातून काढली. तर तळेगाव, वाटेगाव आणि अंबाळाच्या ग्रामस्थांनी पदयात्रा काढून तहसील कार्यालयात निवेदन दिले. मागील बारा दिवसापासून हदगांव तालुक्यातील हडसणी गावचे भूमिपुत्र दत्ता पाटील सूर्यवंशी हे उपोषण करत आहेत. कालपासून यांच्या सोबत हदगाव तालुक्यातील वाटेगावचे आत्माराम पाटील जाधव, हदगाव शहरातील राजकुमार भुसारे, हरडफ येथील पवन मोरे व उंचेगाव खुर्द येथील संदीप शिंदे आणि बेलमंडळ येथील बाबाराव पाटील तंत्रे हे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. मराठा आरक्षणासाठी काल मनोज जरांगे यांच्या सोबत सरकारच्या प्रतिनिधींनी केलेल्या बोलणीत व मंत्री मंडळाच्या बैठकीत काहीही निष्पन्न न झाल्यामुळे आरक्षणाचा तिढा सुटला नाही. सरकारने आरक्षणाचा निर्णय निकाली काढण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली आहे. त्यामुळे एक महिनाभर आता हा लढा असाच चालू ठेवावा लागेल, असे मराठा समाजातील नेत्यांनी निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने या उपोषणाला पाठिंबा म्हणून नियोजनानुसार दररोज वेगवेगळे कार्यक्रम केले जात आहेत. आज अंबाळा येथील शेतकऱ्यांनी सुमारे शंभर ट्रॅक्टरची भव्य रॅली हदगाव शहरातून काढून तहसील कार्यालयावर जाऊन निवेदन दिले. तसेच तळेगाव येथून हदगांव पर्यंत समाजातील तरुणांनी पदयात्रा काढून पाठिंबा दर्शवला आहे.
या आंदोलनाला मराठा समाजाव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव यांनी निवेदन देऊन तसेच विनोद निकाळजे प्रतिष्ठानच्या वतीने रमेश नरवाडे उमरीकर यांनी निवेदन देऊन पाठिंबा दिला आहे. याशिवाय हदगाव तालुक्यातील रुई, हडसणी, बाभळी, भानेगाव, उंचेगाव, गोजेगाव, वाटेगाव, तळेगाव, कोथळा या गावांनी ठराव घेऊन आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे.





No comments:
Post a Comment