नांदेड, ता. 15: शाश्वत स्वच्छतेसाठी केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने देशभरात आजपासून दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा हे विशेष अभियान राबविण्यात येणार असून या अभियानात जिल्हयातील नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून आपले गाव, शाळा-अंगणवाडी व परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध अभियान राबविण्यात येतात. लोकसहभाग ज्या गावात मिळाला त्या गावांचा कायापालट झाला आहे. स्वच्छता ही सेवा या विशेष अभियानातून गावस्तरावर स्वच्छते विषयी मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. कचरामुक्त भारत या संकल्पनेवर हे अभियान चालणार आहे. गावस्तरावर शाश्वत स्वच्छता, हागणदारी मुक्त अधिक माँडेल गावासाठी नागरीकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वच्छता ही सेवा या अभियानात गावातील सर्व पारंपारिक कचऱ्याची साफसफाई करणे. सार्वजनिक शौचालय, कचराकुंड्या, कचरा वाहून नेणारे वाहने आदी सर्व स्वच्छतेच्या दृष्टीकोणातून दुरुस्ती्, रंगरंगोटी, साफसफाई व ब्रेडिंग करण्यात येणार आहे. बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे इत्यादी ठिकाणी रंगरंगोटी, तसेच कचराकुंड्या ठेवण्यात याव्यात. स्वच्छता प्रश्नमंजुषा, वृक्षारोपण मोहीम, स्वच्छता प्रतिज्ञा, नदी- नाले मधील तसेच सार्वजनिक ठिकाणाचे प्लास्टिक साफसफाई करण्यासाठी मोहीम राबण्यात येणार आहे. एकल वापर प्लास्टिक वस्तूंचा वापर रोखण्यासाठी जनजागृती. त्याचबरोबर पर्यटन स्थळाची स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. कुटुंब स्तरावर ओला कचरा हिरवा व सुका कचरा निळा ही जनजागृती करून घर स्तरावर ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी मोहीम आखण्यात यावी. शाळेमध्ये स्वच्छता मोहीम राबवून वर्तणूक बदलाबाबत उपक्रम राबविण्यात यावेत. सदर उपक्रमात कचऱ्याची उत्पत्ती त्याच ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण, कचऱ्याबाबतचे नियोजन व्यवस्थापन एकच कचऱ्यापासून मिळणारे उत्पादन, एकल प्लास्टिकच्या वापरा ऐवजी पर्यायी वस्तू वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यात यावे. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक कार्यक्रम शाळा स्तरावर राबविण्यात येणार आहे.
स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकांच्या नेतृत्वाखाली सर्व गटांना एकत्रित करून त्यांच्याकडून स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पर्यावरण विशेषत: टेकड्या स्वच्छ करण्यासाठी राज्यभरात 17 सप्टेंबर रोजी स्वच्छता मोहिमेसह इतर उपक्रमाचेही आयोजन करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.
मंत्री महोदय जलशक्ती मंत्रालय, मंत्री महोदय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या हस्ते आज 15 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संयुक्तपणे स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन ही मोहीम यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment