किनवट : विद्यार्थ्यांनो तुमच्याकडे शिस्त असेल तर तुम्ही कोणताही मार्ग निवडून शंभर टक्के यश गाठू शकता. म्हणून शिक्षकांना माझं सांगणं आहे की , तुम्ही विद्यार्थ्यांच्या शिस्तीवर फोकस करा. त्याआधारेच ज्ञानदान करून त्यांना चांगला माणूस बनवा. असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कार्तिकेयन एस.(भाप्रसे) यांनी केले.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात राष्ट्रीय विद्यार्थी सैनिक दल (एन.सी.सी.) कनिष्ठ तुकडीच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी 52 महाराष्ट्र बटालियन (एनसीसी ) नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. रंगा राव , गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने , मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभि. प्रशांत ठमके , कोषाध्यक्षा प्राचार्य शुभांगीताई ठमके , पीएम पोषण आहार योजना अधीक्षक अनिल महामुने, सहायक प्रकल्पाधिकारी (शिक्षण) राजेंद्र शेळके, विस्तार अधिकारी (शिक्षण) संजय कराड, अधीक्षक रियाजोद्दीन अन्सारी, लेफ्टनंट एस.एस. काझी , हवालदार यशवीर सिंग , ऍड. सचिन येरेकार व पत्रकार गोकुळ भवरे मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री कार्तिकेन म्हणाले की , मुलांनो भविष्यात तुम्हाला नुसते कलेक्टरच बनायचे नाही तर तुम्ही दर्जेदार पूल इमारत बांधकाम करणारे एक चांगलेइंजिनियर व्हा, ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व्हा , देशाच्या प्रगतीला चालना देणारे शास्त्रज्ञ व्हा , राष्ट्र रक्षणासाठी सैनिक व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतंत्र आपल्या राष्ट्रावर प्रेम करणारे माणूस बना, असे मौलिक विचार त्यांनी मांडले.
मुख्याध्यापक शेख हैदर यांनी प्रास्ताविक व उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक किशोर डांगे यांनी आभार मानले.
आपल्या मार्गदर्शनात कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. रंगा राव म्हणाले की , एकता व शिस्त ब्रिदवाक्य घेऊन 15 जुलै 1948 रोजी नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) ची स्थापना झाली. सैन्यदल, नौदल , लष्कर आणि हवाई दल या तिन्ही दलाशी युवा विभागाचा संपर्क असणारी ही त्रि-सेवा संस्था आहे. विद्यार्थ्यांना लष्कराशी संबंधित विविध प्रशिक्षण देण्याचे काम जसे लहान बंदूक चालवणे , राष्ट्रावर प्रेम करायला , शिस्तबद्ध रहायला शिकवणे , वेळ अत्यंत मौल्यवान आहे. त्याचा आदर करा , वेळेवर राहा ,परिश्रमपूर्वक आणि त्रुटी शिवाय कार्य करा , हे शिकवणे. विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता , मैत्री , शिस्त , नेतृत्व , धर्मनिरपेक्षता आणि निस्वार्थ सेवा हे गुण रुजवविणे ही उद्दिष्ट साध्य केल्या जातात. सैन्य दलात एनसीसी कॅडर साठी राखीव जागा आहेत. याबरोबरच मुलांनो आपल्यातील एखाद कला आवड म्हणून जोपासणे अत्यंत गरजेचे आहे.
याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने आपल्या भाषणात म्हणाले की , ज्याप्रमाणे शारीरिक तंदुरुस्ती व्यायामावर असते. त्याचप्रमाणे कोणत्याही समस्यांवर मात करण्यासाठी तुमचे मन बळकट करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना लष्कराशी संबंधित प्रशिक्षण अभ्यास दिल्याने यातून सुदढ युवक तयार होतो. आदिवासी भागात माध्यमिक शाळांतून सुरु होणारी एन.सी.सी. ची ही पहिलीच तुकडी आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते एनसीसी फलकाचे व कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
निवृत्त उप मुख्याध्यापक जुम्माखान पठाण यांनी राष्ट्रगीत घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य सुभाष राऊत, उप मुख्याध्यापक अंबादास जुनगरे, पर्यवेक्षक प्रमोद मुनेश्वर, रघुनाथ इंगळे, संजय ढाले, ज्ञानेश्वर कदम, प्रफुल डावरे आदिंनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment