नांदेड : स्वच्छता ही सेवा व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज जिल्ह्यात श्रमदान मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली आहे. दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यात 17 सप्टेंबर रोजी सर्व स्तरावर महा श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा-अंगणवाडी, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाजारपेठ, धार्मिक स्थळे, सार्वजनीक आदी ठिकाणांची श्रमदानातून स्वच्छता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मोहिमेमध्ये नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक, महाविद्यालयीन युवक, एनसीसी, एमएसएसचे विद्यार्थी, बचत गट, स्वच्छाग्रही, विविध संघटना यांचा सहभागाने ही मोहीम राबवली जाणार आहे.
भारतीय स्वच्छता 2.0 या अंतर्गत स्वच्छतेसाठी युवकांच्या कृतीला चालना देण्यासाठी युवकांच्या नेतृत्वाखालील सर्व गटांना एकत्रित करून युवकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. तरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कार्यालय व गाव स्तरावर श्रमदानाची मोहीम आखून मोठ्या प्रमाणात स्वच्छता करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे व जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment