महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Wednesday, November 15, 2023

महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच झारखंड राज्य स्थापना दिवस साजरा

 


 


मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : वनसंपदा, खनिज संपदा व कला यांनी समृद्ध असलेले झारखंड राज्य ही ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. वृक्ष व निसर्गाची पूजा करणारे आदिवासी लोक या राज्यात आहे. निसर्ग रक्षणाला धर्माचे अधिष्ठान दिल्यामुळे लोकांनी निसर्ग संपदेचे रक्षण केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.  


            राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 15 नोव्हे) महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच 'झारखंड राज्य स्थापना दिवस' साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. 


            'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमांतर्गत विविध राज्य व केंद्र शासित प्रदेशांचे स्थापना दिवस देशातील सर्व राजभवनांमध्ये  साजरा करण्याच्या सुचनेनुसार झारखंड राज्य स्थापना दिवस महाराष्ट्र राजभवन येथे साजरा करण्यात आला. 


            झारखंडचे सुपुत्र महान क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन करुन राज्यपालांनी  झारखंड राज्याच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. 


            झारखंड राज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली असून राज्य कला, चित्रकला व नृत्य या क्षेत्रात समृद्ध असल्याचे राज्यपालांनी सांगितले. झारखंड राज्याचे दोन वर्षे राज्यपाल म्हणून काम करणे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.  



            देशातील सर्व राजभवनांमध्ये विविध राज्य तसेच केंद्र शासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे केल्यामुळे राज्यांच्या संस्कृतींची ओळख होत आहे व त्यातून राष्ट्रीय एकात्मतेच्या कार्याला चालना मिळत आहे, असे राज्यपालांनी सांगितले. 


            यावेळी झारखंड सरकारचे सांस्कृतिक कार्य संचालनालय, जय फाउंडेशन व रुद्र प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून झारखंडच्या लोक संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. 


       सांस्कृतिक कार्यक्रमात छट पूजा, छऊ नृत्य, कावड यात्रा, पैका नृत्य, फगुआ नृत्य, करम नृत्य, माघे नृत्य आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. 


            राज्यपाल बैस यांच्या हस्ते जय व रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंह, खासदार संजीव नाईक, झारखंड येथील कलाकार सृष्टीधर महतो व लखन गुरिया, लालमती सिंह, सीमा सिंह, तसेच इतर कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचा झारखंड स्थापना दिनानिमित्त संदेश दाखविण्यात आला.  झारखंड राज्याची माहिती दाखविणारा लघुपट देखील यावेळी दाखविण्यात आला. 


            राज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल यांनी प्रास्ताविक केले तर राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News