किनवट : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमासाठी किनवट (जि.नांदेड) येथे आले असता राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाचे नांदेड जिल्हा सरचिटणिस ग.नु.जाधव व जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी प्रलंबित प्रश्नांबाबत त्यांना निवेदन दिले.
राष्ट्रीय /राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रश्न , समस्यासाठी त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर आणि जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत कारले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा सरचिटणीस ग.नु. जाधव व जिल्हा कार्याध्यक्ष तथा राज्य प्रसिद्धीप्रमुख रमेश मुनेश्वर यांनी नुकतेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना भेटून निवेदन दिले.
या निवेदनात राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात यावे. शासनाने राज्य राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदी पदावर पदोन्नतीच्या वेळी दहा टक्के आरक्षण द्यावे. राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या बंद केलेल्या दोन जादा वेतन वाढी मंजूर करण्यात यावे. राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वार्षिक सर्वसाधारण बदल्यांमध्ये संवर्ग एक मध्ये समाविष्ट करण्यात यावे. राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध समित्यावर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment