सत्यशोधक विवाह -सामाजिक क्रांतीचे प्रेरणादायी पाऊल
-बाबुराव पाईकराव ,
सत्यशोधक हा एक व्यापक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त असलेला समाज होय. याचा अर्थ जाणण्यासाठी आपणास इतिहासाची पाने पाहावी लागतील, की ज्या समाजाने त्या काळी फार मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. धर्म परिवर्तनात फार मोलाचे योगदान दिले. याचे संस्थापक थोर
क्रांतीकारक, समाजशास्त्रज्ञ महात्मा जोतीराव फुले होत. यांच्या या नवीन सत्यशोधक समाजाने जागतिक पातळीवर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.आणि धर्मांतराचा पहिला प्रयोग यशस्वी करुन दाखविला. त्यामुळे तमाम तळागाळातील गोरगरीब, दीनदुबळ्या, शेती कसणाऱ्या माणसांस स्वतंत्रपणे जगण्याचा सत्यावादी सुंदर जीवनमार्ग मिळाला.
आज याच विचारांची मशाल घेवून सत्यशोधक चळवळीचे प्रसिद्ध सामाजिक युवा कार्यकर्ते डॉ. मनेश खटावे हे सत्यशोधक चळवळीचा रथ घेऊन भारतभर प्रचार आणि प्रसार करतात. ते प्रसिद्ध व्याख्याते आहेत.ते सामाजिक कार्यात विद्यार्थी दशेपासून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच समाजातील समस्या ह्या जाणून घेवून त्या सोडविण्याचा हिरीरीने प्रत्येक करतात. ते आमच्या कै.बापूराव देशमुख हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत.
आज डॉ. मनेश खटावे आणि डॉ. मनिषा पाटील यांचा विवाह हा सत्यशोधक पध्दतीने होत आहे. हे जाती निर्मुलनाच्या कार्याची मुहूर्तमेढ आहे. त्यांनी एक प्रेरणादायी पाऊल उचलून समाजापुढे एक महान आदर्श ठेवला आहे. सत्यशोधक हे काय आहे,हे सत्य समाजापर्यंत पोहचलेले नाही. जोपर्यंत हे सत्य समाजात पोहोचणार नाही, तोपर्यंत सत्याचा शोध लागणार नाही.पण सत्य हे फार काळ लपत नाही. सत्याचा विजय होतच असतो.तोच या नवदांपत्या मार्फत उदयास येत आहे.ते नवपिढीसाठी खरच भुषनावह आहे.त्यांचे मनस्वी अभिनंदन..
या चळवळीचा थोडक्यात इतिहास जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
आपण भारत देशात राहतो.आपल्या देशाची विशेषतः म्हणजे येथील विविधता होय.विविध जाती,धर्म, पंथ एकत्र राहून एकता प्रस्थापित केली आहे, हे एक आदर्शवादी संविधानाचे वैशिष्ट्य मानावे लागेल.पण हा सुवर्णमय काळ येण्यासाठी येथील महान थोर महापुरुष,संत, विचारवंत यांना अतिशय परिश्रम घ्यावे लागले.
भारत देशाचा भूतकाळ डोकावताना आपल्या लक्षात येईल की, येथील मनुस्मृतीने लादलेली ब्राह्मण,क्षत्रिय,वैश आणि शुद्र ह्या चातुर्वण्य व्यवस्थेची उतरंड या देशात जातीय विषमतेचे विष पेरून गेली. देश दारिद्र्याच्या खाईत फेकला गेला होता. याचाच आधार घेवुन याचा फायदा परकीय देशाने घेतला आणि देशाला दीडशे वर्षे पारतंत्र्यात राहावे लागले, हे तितकेच महत्वाचे आहे.
चातुर्वण्य व्यवस्थेने म्हणजेच उच्चवर्णीयांनी समाजातील बहुजन घटकाला आपल्या दबावाखाली दडपून टाकले होते. हक्क आणि अधिकारांपासून वंचित ठेवले होते. त्यामध्ये सर्वात पिळवणूक झालेला घटक म्हणजे शुद्र व अतिशुद्र होय.त्याचे सर्व हक्क हिरावून घेतले होते. यामुळे विषम सामाजिक वास्तव, धर्म प्रणित व्यवस्था, अर्थ व्यवस्था, ब्राह्मणांचे वर्चस्व, शूद्रांतिशुद्राचे दैन्य, स्त्रियांची पराधीनता, अवताराचे थोतांड, अज्ञान-अंधश्रद्धा, जोतिष्य,भविष्य, ग्रह, ग्रहयोग यांचे प्रस्थ वाढले होते. त्यामुळे याची झळ सर्वांनाच सोसावी लागली. त्यात आपणास ज्ञात आहे की, छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष यातून सुटले नाहीत, हे तितकेच खरे.
याचवेळी युगपुरुष म्हणून
महात्मा जोतीराव फुले हे महान नेतृत्व उदयास आले. म.फुलेंना अभिप्रेत धर्म विज्ञानवादी, नितीवादी, मानवता आणि समतावादी हवा होता. त्यांनी सत्यधर्माच्या मांडणीतून विज्ञानवादाची पायाभरणी केली, आणि बुद्धीवाद, बुद्धीनिष्ठता, तर्कनिष्ठता कार्य कारणभाव समजून घेण्याची मानसिकता विकसित केली.यातूनच एक नवा सत्यशोधक धर्म देवून समाजोन्नतीचा विचार करून समताधिष्टित,पर्यायी विवाह, अर्थ व शिक्षण व्यवस्था स्थापन केली. यातून वेगवेगळ्या बहुजनांच्यासाठी विविध योजना काढल्या. त्यात शाळा,शेती विषयक सुविधा, वस्तीगृह,स्त्री शिक्षण, गोरगरीबांसाठी शिष्यवृत्ती देणे, अज्ञानातून ज्ञानाकडे जाणारे मार्ग शोधले.
सत्यशोधक विवाह पध्दती निर्माण केली.यातून माणूस जोडण्याचे काम केले. कोणत्याही पुरोहिताकडून विवाह न लावता आपणच आपली विवाह विधी तयार करुन पुरोहितांची सुट्टी केली. त्यामध्ये अर्थपूर्ण मंगलाष्टके तयार केली गेली.त्यांनी विवाहाची एक शुद्ध शिस्तबद्ध, आदर्शवादी पध्दत निर्माण केली. जिच्यातून जातीजातीत, धर्माधर्मात बंधुभाव, मैत्रीभाव, समता,स्वातंत्र्य, एकात्मता प्रस्थापित होवून एक सुंदर राष्ट्रासाठी फार मोलाचे योगदान दिले .या सत्यशोधक धर्मास बहुसंख्य जनतेचे योगदान लाभले आणि हजारो विविध जातीधर्माचे लोक जोडले गेले. कारण म.फुले यांचे प्रत्येक कार्य माणूस या शब्दाशी केंद्रित होते.
त्याकाळी म.फुले यांनी अनेक संकटांना तोंड दिले. विविध विषयांचा अभ्यास केला. विचारवंताची पुस्तके वाचली. तेंव्हा त्यांना सर्व गोष्टीचे मूळ हे शिक्षणात आहे, हे दिसून आले.
हिंदू समाजातील स्त्रिया आणि अतिशुद्र यांच्या सर्वांगीन प्रगतीच्या बीजांचे संपूर्ण निर्दालन करणाऱ्या आणि ब्राह्मण जातीचे भरमसाट स्तोम माजवणाऱ्या या मनुस्मृती ला नष्ट करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली पण ते त्यांच्या हयातीत शक्य झाले नाही, पण ते स्वप्न पुढे त्यांचे शिष्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी जाळून आपल्या गुरुचे स्वप्न पूर्ण केले. भारतीय जनतेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता,बधुंता आणि स्वातंत्र्य संविधानातून बहाल केले.
पण मनुस्मृतीचा कायद्यात
खर पाहिले तर पारंपरिक स्त्री आणि आजची स्त्री यातील अंतर कसे होते हे पाहिले तर लक्षात येईल, ते पुढील प्रमाणे आहे..
बाल्या वा युवत्या वा वृध्या वा पि योषिता,
न स्वातंत्रयेण कर्तव्य किंचित्कायं गृहेष्वपि।
बालपणी, तारुण्यात आणि म्हातारपणीसुध्दा स्त्रियांनी आपल्या इच्छेनुसार घरात कामे करु नये.
एक मेवतू शूद्रस्यःप्रभूः कर्म समादिशत् ।
इतेषामेव वर्णानां शूश्रषामन सूयया।।
ईश्वराने शूद्रास एकच कार्य करण्याचे आदेश दिलेले आहेत की, त्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिनही वर्णियांची सेवा करत रहावी.
उच्चवर्णीयांनी स्त्री आणि शूद्र यांना अत्यंत हिन दर्जा दिला होता,हे आपणास वरील उदाहरण वरुन दिसेल.
पण सत्यशोधक समाजात स्त्री आणि पुरुष यांना समान दर्जा मिळालेला आहे.जात आणि धर्म याला महत्त्व न देता मानवतेला महत्त्व दिले आहे. हे समजून घेतले पाहिजे. म्हणून त्या काळी सत्यशोधक समाजाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहोचले होते.
म.फुले यांनी समानतेचा मार्ग देवून सत्यशोधक विवाहपध्दती सुरु केली वविवाह विधी साठी सरळ सोप्या भाषेत, अर्थपूर्ण मंगलाष्टके तयार केली.
वधू..
बंधुवत्मजला समस्त असती,त्वद् भिन्न जे की नर
आज्ञा भंग तुझा करीन कदा मी सत्य कर्त्यावर
ठेवोनी अवघाची भार झटू या,लोका कराया हिता
हाताला धरूनी तुला वरितले,सर्वांपुढे मी आता
वर...
स्थापाया अधिकार मी झटतसे,या बायकोचे सदा
खर्चाया मनि भी न मी किमपीही,सर्वस्व माझे सदा
मानीतो सकळा स्त्रीयांस बहिणी, तू एकली मत्प्रिया
कर्त्याचे भय मी मनात तुजला, ठेविन पोसावया
आभारा बहू मानिजे आपूलिया,माता पित्याचे सदा
मित्रांचे तुमच्या तसेच असती,जे इष्ट त्यांचे वदा
वृद्धा पंगू सहाय द्या मुलिमुला,विद्या तया शिकवा
हर्षे वृष्टी करा फुलांची अवघे,टाळीअता वाजवा
ही महत्त्वपूर्ण मंगलाष्टके वाचल्यानंतर यातील व्यापकता जीवनातील महत्त्व व मानवी नवजीवनाला मानवतावादी संदेश देवून जाणारी आहेत.उभयतांना आशीर्वाद देतांना धान्य उधळून नुकसान करण्यापेक्षा फुले उधळून आनंदरुपी आशीर्वाद द्यावा, असे त्यांनी सल्ला दिला.
तर वधूवरांना शपथविधी देवून वचनबध्द करण्याचे वचन पद्धती तयार केली.
ही आदर्श पध्दती सर्वांनीच अनुसरावी असे म.फुले यांनी सांगितले.
याच निमित्ताने डॉ. मनेश खटावे आणि डॉ. मनिषा या नवदांपत्याने भारतीय स्त्री मुक्ती दिन आणि मनुस्मृती दिनाचे औचित्य साधून एक सुंदर योग साधला. जातीधर्माच्या भिंती तोडून एक नवा आदर्श आपल्या समोर ठेवला. ही आदर्श वादी पायवाट नक्कीच नवपिढीला नवजीवनात मानवतेचा मार्ग दाखवून देशाला एकात्मतेच्या बंधनात बाधून बलशाली करेल. हे नक्की.
त्यांच्या या महान कार्याचे पूनश्च अभिनंदन आणि त्यांच्या वैवाहिक जीवनास अनंत शुभेच्छा...
-बाबुराव पाईकराव ,
डोंगरकडा
9665711514




No comments:
Post a Comment