नांदेड ता. ३१ : नांदेड लोकसभा मतदारसंघातील पर्यावरण पूरक अर्थात इको फ्रेंडली मतदार केंद्र म्हणून विष्णुपुरी केंद्र पुढे आले आहे. नैसर्गिक हिरवेपणा जपत या मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. हे मतदान केंद्र सर्वांना आकर्षित करत आहे.
चुनाव का पर्व,देश का गर्व संकल्पनेतून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही भारत देशात सध्या सार्वत्रिक निवडणूकीची धूम सुरु आहे. भारत निवडणूक आयोगाने यंदा इकोफ्रेंडली मतदार, ग्रीन मतदार बुथ उभारणीसाठी सूचना दिली आहे. याच सूचनेच्या अनुपालनासाठी जिल्हा ग्रामीण स्विप कक्षाच्या प्रमुख तथा जि.प.नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प.हा.विष्णुपूरी प्रशालेने इकोफ्रेंडली मतदान बुथ तयार केले आहे. याचे प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 087 नांदेड दक्षिण तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड विकास माने, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू , महसूल सहाय्यक मकरंद भालेराव, स्वीप कक्ष सदस्य राजेश कुलकर्णी व संजय भालके यांनी भेट दिली. संपूर्ण मतदान परिसर नैसर्गिक झावळ्यांनी,विविध रोपांनी,प्लास्टिक मुक्तपणे तयार केला आहे.
पाणी पिण्यासाठी मातीच्या भांड्यांची, मडक्याचा वापर केला आहे. ग्रीन मँट प्रवेशद्वारापासून अंथरली असून विविध फुलझाडांच्या कुंड्यांनी प्रवेश केला जात आहे. केळीची पान, पारंब्या, हिरव्या नारळाच्या झावळ्या उपयोगात आणल्यामुळे परिसर थंडगार व रमणीय आकर्षक झाला आहे. प्रात्यक्षिक मतदार म्हणून विलास देशमुख हंबर्डे, मारोती ग्यानबाराव हंबर्डे, बाबुराव नामदेवराव हंबर्डे यांनी मतदान प्रक्रियेत उत्साहाने भाग घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव, शिवाजी वेदपाठक,कृष्णा बिरादार, दत्ता केंद्रे, संतोष देशमुख, आनंद वळगे,उदय हंबर्डे, विकास दिग्रसकर, चंद्रकला इदलगावे,अर्चना देशमुख, कांचनमाला पटवे, शैलजा बुरसे,प्रिती कंठके , एम.ए.खदीर , मारोती काकडे ,कावळे गुरुजी आणि सर्व शिक्षकवृंदांनी भरीव परिश्रम घेतले आहेत.
*कर्मचाऱ्यांचे कौतुक*
नांदेड लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक केंद्र वैविध्यपूर्ण ठरावे निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात याव्यात तसेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्देशित केल्याप्रमाणे सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी प्रतीक्षालय तयार करण्यासाठी केंद्रप्रमुख व संबंधित कर्मचाऱ्यांनी तयार असावे अशी सूचना यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केली आहे. मतदान प्रक्रियेत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या मतदान प्रक्रिया कालावधीत आपले मतदान केंद्र नीटनेटके स्वच्छ व व्यवस्थित राहील याकडे लक्ष वेधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. विष्णुपुरी येथे उभारण्यात आलेल्या या केंद्राला शुभेच्छा दिल्या असून जिल्ह्यात निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या पद्धतीने अशी वेगवेगळी केंद्र उभी करण्यात आघाडी घ्यावी असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment