अष्टपैलू व्यक्तीमत्व: गं.ई. कांबळे
-डॉ. विलास ढवळे
आदर्श शिक्षक गं.ई. कांबळे हे निमगाव केंद्रातून सेवानिवृत्त झाले. त्याच्या कार्यावर प्रकाश टाकणारा डॉ. विलास ढवळे यांचा लेख येथे देत आहोत. - संपादक
गई या दोन शब्दाच्या नावाने ओळखले जाणारे गई कांबळे हे अत्यंत उत्साही नाविन्यपूर्ण उपक्रमाची कास असणारे आणि अनेक शैक्षणिक उपक्रमात हिरीरिने सहभाग घेऊन नामांकित असणारे शिक्षक आहेत.
गंई कांबळे यांचा जन्म 17 जून 1966 चा. देगलूर तालुक्यातील टाकळी वडग हे त्यांचे गाव. तीन भाऊ दोन बहिणी आई असं छोटसं कुटुंब. घरात शिक्षणाचा गंध नाही. शिक्षणामुळे काय फायदा होईल हे माहित नाही. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू झाली आणि बाबासाहेबांनी सर्वांनी शिकलं पाहिजे हा मूलमंत्र दिला आणि तो मूलमंत्र जेव्हा खेड्यापाड्यात पोहोचला तेव्हा इरबाजी कांबळे यांनी आपल्या मुलाला शिकवायचे ठरवलं .
1972 साली त्यांनी गंगाधर यांना पहिलीत प्रवेश दिला. ठणठणीत प्रकृती, उत्तम बांधा आणि रुबाबदार व्यक्तिमत्व यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उठून दिसू लागले. अंगभूत हुशारीमुळे शिक्षकांमध्ये लवकरच लोकप्रिय झाले.
इयत्ता दहावी मध्ये कुंडलवाडीतील मिलिंद विद्यालयात 1984 साली प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर अकरावीला पानसरे महाविद्यालय अर्जापूर येथे शिक्षण घेतले. डीएड करून 1988 साली जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये दाखल झाले.
या सबंध काळात अनेक नवनवीन शैक्षणिक प्रयोग त्यांनी राबवले आहेत. 1998 मध्ये ज्ञानयात्रा परिक्रमा, 2013 ,2014 या काळात नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सुमंत भांगे आणि अभिमन्यू काळे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना अनेक नाविन्यपूर्ण आणि वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जायचे . स्वच्छता दूत माधवराव पाटील झरीकर यांच्यासोबत लेक शिकवा अभियान जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले. लेक शिकवा अभियानाने गती घेतलेली होती.बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा नुकताच आला होता. त्या कायद्यातील तरतुदी समजून सांगण्यासाठी जिल्हा परिषद नांदेड च्यावतीने रथयात्रा काढण्यात आली होती. या रथयात्रेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. जिल्ह्यातल्या जवळपास 600 गावांमध्ये फिरण्याचा योग त्यांना आला. या गावांमधील माणसं, शिक्षणाच्या अवस्था, शैक्षणिक चळवळी जवळून अभ्यासता आल्या .1998 साली गोविंद नांदेडे शिक्षणाधिकारी असताना ज्ञानरथ यात्रा हा नाविन्यपूर्ण आणि देशातील पहिला उपक्रम सुरू करण्यात आला होता .एका वाहनांमध्ये कलासंच गावागावात जायचा आणि दररोज एका गावात मुक्काम करायचा. सबंध एक महिनाभर अनेक गावांमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम रात्री घेतल्या जायचे. गावागावात लोक उस्फुर्त स्वागत करायचे. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांच्या माळा अर्पण करायचे. सगळा गाव एकत्र जमा व्हायचा. असा भारावून टाकणारा माहोल त्याकाळी होता .मुंबई डीडी, सह्याद्री दूरदर्शन आणि दिल्ली दूरदर्शन वरूनही या कार्यक्रमाची दखल घेतल्या गेली. दिल्लीचे स्वतंत्र पथक यावर टेलीफिल्म करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात दाखल झालेले होते .
शैक्षणिक क्षेत्रात काम करताना जे काही चांगले जे काही नावीन्यपूर्ण आहे हे सगळे आपल्या शाळेमध्ये राबविले पाहिजे या दृष्टीने त्यांनी विषय कसोशीने काम केले.याशिवाय एक अतिशय प्रामाणिक आणि नीटनेटकेपणा असणारा प्रशासकीय सुसूत्रता आणून शैक्षणिक कामकाज गतीने करणारा एक चांगले मुख्याध्यापक म्हणूनही त्यांचा लौकिक राहिला आहे .शेवटी जिल्हा परिषदेच्या निमगाव या हदगाव तालुक्यातील केंद्रातून ते सेवानिवृत्त झाले.दिनांक सहा जुलै 2024 रोजी सेवानिवृत्तीचे औचित्याने एका भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या वतीने होणारा हा गौरव निश्चितच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी प्रेरक आणि ठरणार आहे.
-डॉ. विलास ढवळे, नांदेड
No comments:
Post a Comment