मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे.
समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यानुसार राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर शिक्षकांची निवड केली आहे.
पुरस्कारासाठी प्रवर्गनिहाय प्राथमिक- ३८, माध्यमिक- ३९, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक)- १९, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार- ८, विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१)- २, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक- १, स्काऊट/गाईड (१+१)-२ अशा एकूण १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील (१) न्यायालयाच्या आदेशानुसार विचारात घेण्यात आलेला सन (२०२२-२३) चा एक पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला आहे.
नांदेड जिल्हयातील त्रिरत्न
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी जाहीर झालेल्या यादीत नांदेड जिल्ह्यातील त्रिरत्न पुढील प्रमाणे : मिलिंद पुंडलिकराव जाधव (सशि, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या भोकर ता.भोकर), मीरा गोविंदराव परोडवाड (सशि, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा करंजी ता.माहूर) डॉ.प्रज्ञानकुमार पुरुषोत्तमराव भोजनकर( माध्यमिक शिक्षक, जिल्हा परिषद हायस्कूल,अर्धापूर ता. अर्धापूर)
इब्टाच्या वतीने मिलिंद जाधव यांचा सत्कार
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या भोकर ता.भोकर जि.नांदेड येथील अष्टपैलू व उपक्रमशिल शिक्षक मिलिंद पुंडलिकराव जाधव यांची राज्य शासनाच्यावतीने निवड झाल्याबद्दल त्यांचा नांदेड जिल्हा सहकारी पतसंस्था मर्यादीत जिल्हा परिषद नांदेडचे माजी सचिव, विद्यमान संचालक तथा इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे, लहानकर यांनी आपल्या सहकारी सर्व कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या घरी जाऊन इब्टाच्या वतीने सपत्नीक सत्कार केला. यावेळी सरचिटणीस निलेश गोधने फुलवळकर, गणपतराव गायकवाड, रामदास गोणारकर, राम अनंतवार, साहेबराव डोंगरे, जितेंद्र गवळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.






No comments:
Post a Comment