नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : नागपूर येथील सुयोग पत्रकार निवासस्थानी आज विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. अधिवेशन ८ डिसेंबर २०२५ पासून सुरु होत असल्याने पत्रकारांच्या निवास व इतर सोयीसुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेत त्यांनी आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश दिले.
सुयोग पत्रकार निवासाची पाहणी केल्यानंतर दोन्ही मान्यवरांनी पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी पत्रकारांच्या गरजांची संवेदनशीलतेने दखल घेण्यावर भर देत, “अधिवेशनकाळात पत्रकारांना सुलभ, सुरक्षित व सुबक सुविधा देणे ही आमची प्राथमिकता आहे,” असे स्पष्ट केले. पत्रकारांनी मांडलेल्या मुद्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ते निर्णय तत्काळ घेण्याची हमी त्यांनी दिली.
“पत्रकारांसाठी उपलब्ध सुविधा दरवर्षी अधिकाधिक सुधारताना दिसत आहेत. वार्तांकनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे ही आपली सामायिक जबाबदारी आहे,” असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. महिलांसाठी निवासाच्या सुविधा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, आरोग्य सेवा, रेल्वे तिकिटांची उपलब्धता, तसेच इतर प्रशासकीय सोयींबाबतही त्यांनी बारकाईने माहिती घेतली.
पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून निवासस्थानातील व्यवस्थापन, प्रवेशप्रक्रिया, तसेच शाखांच्या समन्वयाबाबत उद्भवणाऱ्या गैरसमजांना तातडीने दूर करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. “गैरसोयी टाळण्यासाठी कोणत्याही निर्णयाची स्पष्टता संवादातून करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पत्रकारांसाठी असलेल्या सुयोग निवासस्थानाचा वापर फक्त विधिमंडळ पत्रकारांसाठी असावा, तसेच अधिवेशन संपल्यानंतर पत्रकारांसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहितीही डॉ. गोऱ्हे यांनी दिली.
यावेळी विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले, शिवदर्शन साठे आणि विधान भवन जनसंपर्क अधिकारी निलेश प्रमुख उपस्थित होते. तसेच, मंत्रालय–विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, पत्रकार यदु जोशी आणि राज्यभरातून उपस्थित पत्रकार बांधव सहभागी झाले होते.




No comments:
Post a Comment