किनवट : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 नुसार मूलभूत अधिकारांची अत्यंत मूल्यवान देणगी दिली आहे. ह्यानुसार सर्व समान आहेत. सर्वांना समतेचा अधिकार आहे. सर्वांना एकसारखा कायदा लागू आहे. संविधानाने भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले पण यामुळे स्वैराचाराला मुभा नाही. संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य दिले परंतु इतर धर्माचा आदर करायला सांगितले. या देशाला राष्ट्र करायचे आहे तर ह्या देशाला धर्मनिरपेक्ष , जातीविरहीत केलं पाहिजे. असे प्रतिपादन विदर्भ महारोगी सेवामंडळ , तपोवन अमरावतीचे अध्यक्ष कुष्ठ सेवाकर्मी , संविधानाचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी केले.
ते येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात "भारतीय संविधानातून मानवी हक्काचा जाहीरनामा " या विषयावर आयोजित व्याख्या नात बोलत होते. भारतीय संविधानाच्या निर्मितीस 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल घरघर संविधान हा उपक्रम दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 शाळेत गावात राबवून संविधानाबद्दल जनजागृती, प्रभात फेरी, विविध स्पर्धा तसेच व्याख्यान यांचे आयोजन करावे. ह्या शासननिर्णयानुसार हे व्याख्यान आयोजित केले होते.
याप्रसंगी मिलिंद शिक्षण मंडळाचे सचिव अभि. प्रशांत ठमके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गट शिक्षणधिकारी अनिलकुमार महामुने , केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे , ऍड. विक्रांत गवई , संस्थेच्या कोषाध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके व डॉ. मोना गवई या मान्यवरांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना डॉ. गवई म्हणाले की , मानवी हक्काची सनद संयुक्त राष्ट्र संघाने 1948 मध्ये स्विकारली. पण 1949 राजकीय लोकशाही मिळाली. डॉ. बाबासाहेबांनी 1946 पासुनच तथागत बुद्धांच्या विचारातून ही लोकशाही आणली . ती इतर देशातून घेतली नाही. संविधानात लिंगभेदाला थारा नाही. परंतु आजही मुलीं-मुलांमध्ये फरक केल्या जातो. मुलींना , महिलांना शिक्षणाची मुभा दिली परंतु त्यांना स्वतंत्र विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. भगवान बुद्ध , महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री स्वातंत्र्याचा विचार दिला होता. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. समाज व्यवस्थेला बदलण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. म्हणून सर्वांनी प्रगल्भ व्हावे.
शुभांगी बेद्रे या विद्यार्थिनीचे प्रास्ताविक भाषण झाले. पाहुण्यांचा परिचर वैशाली साबळे-नरवाडे यांनी करून दिला. पर्यवेक्षक संतोष बैसठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. उप प्राचार्य राधेश्याम जाधव यांनी आभार मानले.
प्रारंभी फर्स्ट ऑफिसर डी.एस.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी. सी. 52 महाराष्ट्र बटालियनच्या पथकाने पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य प्रमोद मुनेश्वर, उप मुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक रघुनाथ इंगळे, मनोज भोयर , मुकूंद मुनेश्वर यांचेसह सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.









No comments:
Post a Comment