नांदेड ता. १५ मार्च : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि शासनासोबत जवळपास अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. हा दर्जा उशिरा मिळाला असला तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे व तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा श्वास आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मा. मा. जाधव यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. १५ मार्च) आयोजित ‘अभिजात मराठी भाषा व साहित्य’ या परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. जाधव पुढे म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव होय. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती समाजातील वेदना, संघर्ष आणि दु:ख व्यक्त करणारे प्रभावी माध्यम आहे. अशा प्रकारे समाजाशी जोडलेली भाषा कायम जिवंत राहते.
या परिसंवादात वक्ते संजय जगताप यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यामागील ऐतिहासिक पुराव्यांचा उल्लेख केला. दोन हजार वर्षांपूर्वीचे शिलालेख, इ.स. ९३९ चे शिलालेख, ज्योतिष रत्नमाला या संस्कृत ग्रंथातील संदर्भ, आद्यकवी मुकुंदराज यांचा विवेकसिंधु, इ.स. १२७८ मधील महिम भट्ट यांचे लीळाचरित्र, तसेच ज्ञानेश्वरी आणि संत तुकाराम गाथा यांसारख्या साहित्यसंपदेच्या आधारे मराठीच्या प्राचीनतेचे व समृद्धतेचे पुरावे अधोरेखित झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ साहित्यिक विलास वैद्य यांनी ‘मराठीच बोला, संतांचा विचार घरोघरी’ या कवितेद्वारे मराठी भाषेचा अभिमान आणि महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमास नांदेडचे तहसीलदार विकास बिरादार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ. वा. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन साहित्यिक नारायण शिंदे यांनी केले तर आभार बालाजी नार्लेवाड यांनी मानले.




No comments:
Post a Comment