नांदेड ता.१५ मार्च: धर्मादाय नोंदणीकृत संस्थांचे कामकाज करताना संस्थाचालकांनी संस्थेच्या घटनेतील नियमांनुसार ठरलेली कालमर्यादा संपल्यानंतर कार्यकारिणी अद्यावत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धर्मादाय उपआयुक्त ममता राखडे यांनी केले.
नांदेड ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम व सार्वजनिक ग्रंथालयांसमोरील आव्हाने’ या विषयावरील मार्गदर्शन सत्रात त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, अनेक वेळा संस्थेचे पदाधिकारी मयत झाल्यानंतरही कार्यकारिणीमध्ये आवश्यक बदल केले जात नाहीत. त्यामुळे संस्थेचे कामकाज अडचणीत येते. त्यामुळे अशा बदलांची नोंद वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे.
संस्थांनी दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत ऑडिट अहवाल सादर करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पक्षकाराने वकिलाशिवाय बदल अर्ज दाखल केल्यास त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधिज्ञ विजय भोपी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ. वा. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन नवनाथ कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन विधिज्ञ व्यंकटेश भवर यांनी मानले.
या कार्यक्रमास जिल्हाभरातील ग्रंथालय संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रंथप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No comments:
Post a Comment