नांदेड, ता. 15 मार्च : भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे. तो प्रत्येकाच्या ताटात अन्न पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. उत्पादन वाढीसोबतच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.
नांदेड येथे आयोजित जिल्हा कृषी व धान्य महोत्सव व प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे 15 ते 17 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास खासदार रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कृषी उपसंचालक कैलास वानखेडे, उपसंचालक आत्मा अर्चना गुंजकर, किशोर स्वामी, प्रगतशील शेतकरी, नागरिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते. महोत्सवात विविध विषयांवरील शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, कृषी मालाचे प्रदर्शन तसेच खरेदीदार-विक्रेता संमेलन होणार आहे.
खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, काळानुसार शेती करताना शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करावा. शेतीत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढीस मदत होईल व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. शासन शेतकऱ्यांसाठी विविध भरीव योजना राबवत असून नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन विकसित भारत संकल्पनेतून नांदेड जिल्ह्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
संयुक्त राष्ट्र संघटनेने 2026 हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात महिलांचे अतुलनीय योगदान आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी विशेष अभिनंदन केले. या कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी विभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
*शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाकडे वळा * -खासदार रविंद्र चव्हाण
डिजिटल युगात शेती करताना शेतकऱ्यांना आता जगातील इतर शेतकऱ्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन कसे वाढवता येईल आणि कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच आधुनिक शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाकडे वळल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे आवाहन खासदार रविंद्र चव्हाण यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, परदेशात वापरले जाणारे आधुनिक शेती तंत्रज्ञान तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी काळानुसार पीक पद्धतीत बदल करावा. ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)चा वापर करावा तसेच सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. शेतीत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाविन्यपूर्ण शेती करण्यावर भर द्या -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाऐवजी नाविन्यपूर्ण पिकांचा अवलंब करून उत्पादकता वाढीवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात रेशीम शेती, चिया सिड लागवड, फार्मर कप, सेंद्रिय शेतीचे फायदे, दुग्ध व्यवसाय वृद्धीसाठी उपाययोजना, कृत्रिम रेतनाचा अवलंब, शेतीतील यांत्रिकीकरणाचा वापर तसेच बीबीएफ (BBF) पद्धतीचा वापर यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच बांबू लागवडीचे फायदे आणि पीक कापणी प्रयोग याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी नांदेड शहराला इतर मोठ्या शहरांशी जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. या कृषी महोत्सव व प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या महोत्सवात एकूण 125 स्टॉल लावण्यात आले असून जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग आहे. महोत्सवाच्या ठिकाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहू, ज्वारी, तांदूळ, तूर, मूग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले तसेच गूळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी यांसारखी सेंद्रीय उत्पादने उपलब्ध आहेत. मध, गुळाचा पाक, महिला बचत गटांची चटणी, लोणचे, पापड, कुरडई, टरबूज, खरबूज यांसारखी फळे व विविध भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध आहे. याशिवाय जात्यावरची सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या, रानफळे तसेच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले लाकडी घाण्याचे करडई, भुईमूग, जवस व तिळाचे तेल, बांबूपासून तयार केलेल्या वस्तू, केळीचे वेफर्स, डिंक व बिब्याची गोडंबी यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या महोत्सवात भेट देवून शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी त्यांच्या प्रास्ताविकात केले.
या वेळी 36 प्रगतीशील शेतकरी व महिला शेतकऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते www.nandedkrushimahotsav.in पोर्टलचे उदघाटन करण्यात आले. या पोर्टलवर सर्व स्टॉलधारकांची माहिती व संपर्क क्रमांक असून शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना याचा फायदा होणार असून संपर्क साधता येणार आहे.









No comments:
Post a Comment