किनवट : नांदेड येथे ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्च्यात किनवट तालुक्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा निर्धार गोकुंदा येथील विश्रामगृहात पार पडलेल्या तालुकास्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे.
किनवट तालुक्यातील अनुसूचित जाती संवर्गातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी पूज्य भदंत महाथेरो, आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समिती, नांदेडचे अभियंता भरतकुमार कानिंदे , प्रा. प्रबुद्ध चित्ते , अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सचे संस्थापक अध्यक्ष वा.रा. वाघमारे , डॉ. प्रमोद वाघमारे , युवा नेते प्रशांत गोडबोले , भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तथा तालुकाध्यक्ष अभि. प्रशांत ठमके , पीरिपचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गात एकूण ५९ जातींचा समावेश आहे. यापैकी ५८ जातींनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची कोणतीही मागणी केलेली नाही. उपवर्गीकरणाची मागणी एका जातीतील काही व्यक्ती, स्वयंघोषित नेते व तथाकथित विचारवंतांकडून केली जात आहे. ही मागणी संपूर्ण मातंग समाजाची भूमिका मानता येणार नाही, कारण या विषयावर त्या समाजातील अनेक व्यक्ती व संघटनांनीही असहमती व्यक्त केली आहे. त्यामुळे ही मागणी अनुसूचित जाती समाजाच्या एकमताचे प्रतिनिधित्व करत नाही, असे आमचे मत आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट अटींच्या अधीन राहून राज्यांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरणाचा विचार करता येईल, असे नमूद केले आहे. त्यासाठी सक्षम आयोग, अनुभवाधारित (Empirical) माहिती, सखोल अभ्यास आणि वस्तुनिष्ठ निकष आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले आहे. पण राज्य सरकार यातले काहीही न करता थेट उपवर्गीकरणाची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.
राज्य सरकारला उपवर्गीकरणाची इतकी घाई का ? कारण त्यांना उपवर्गीकरण करायचे नाही तर त्यांना मतांचे राजकारण करायचे आहे. याआधी त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी, आदिवासी विरुद्ध धनगर असे भांडण लावले. आता त्यांना मातंग आणि इतर अनुसूचित जाती असे भांडण लावायचे आहे. फोडाफोडीचे हे दुष्ट षडयंत्र वेळीच हाणून पाडले पाहिजे. जाती समूहात द्वेष कलह निर्माण करण्याचे काम आरएसएस आणि भाजपासह महायुती सरकार करू लागले आहे. या सर्वांचा कडाडून विरोध म्हणून अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडण्यासाठी येत्या रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी नांदेड येथे भव्य 'आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा' आयोजित केला आहे. या मोर्च्यात डॉ. बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर , आनंदराज आंबेडकर , माजी मंत्री राजकुमार बडोले , चर्मकार महासंघाचे अध्यक्ष माजीमंत्री बबनराव घोलप , संविधान तज्ज्ञ सुरेश माने आदी मान्यवर सहभागी होत आहेत.
तेव्हा किनवट तालुक्यातील प्रत्येक गावातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येत नांदेड येथील मोच्यात सहभागी व्हावे , असे आवाहन आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा कृती समिती, नांदेड ,अखिल भारतीय भिक्खु संघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा यांनी केले आहे.
याप्रसंगी पत्रकार गोकुळ भवरे, जितेंद्र भवरे, दिलीप पाटील, सुरेश कावळे व सर्व कार्यकर्ते सुभाष कयापाक , दिलीप भगत, मधुकर मुनेश्वर, भगवान मुनेश्वर, राजाराम वाघमारे, महेंद्र नरवाडे, कैलास पाटील, रुपेश मुनेश्वर, मारोती मुनेश्वर, भीमराव पाटील, राहुल कापसे, सुरेश पाटील, कपिल कांबळे, नागसेन पाटील, भारत कावळे, शंकर नगराळे, प्रज्योत कांबळे, किरण पुनवटकर, सोनु गायकवाड, अनिकेत भरणे, द्रविड पाटील, स्वयुश पाटील, साईल गायकवाड, युवराज खोब्रागडे, प्रणव भरणे आदींची उपस्थिती होती.




No comments:
Post a Comment