मोकळ्या आकाशाचा वेध घेणारा काव्यसंग्रह.. ' प्रतिबिंब अंतरिचे ' - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 28, 2019

मोकळ्या आकाशाचा वेध घेणारा काव्यसंग्रह.. ' प्रतिबिंब अंतरिचे '



कवयित्री अर्चना खोब्रागडे यांच्या " प्रतिबिंब अंतरिचे " या कविता संग्रहाचे रमेश मुनेश्वर यांनी केलेले समीक्षण ' पुस्तक परिक्षण ' या सदरात येथे देत आहोत.
-संपादक

       
            जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी केंद्र शाळा, बोरीअरब तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथील उपक्रमशिल शिक्षिका तथा कवयित्री अर्चना खोब्रागडे -तिरपुडे यांचा "प्रतिबिंब अंतरिचे"  कवितासंग्रह मोकळ्या आकाशाचा वेध घेणारा आहे. सरकारी नोकरीत असतांना कवयित्रीने कविता लिहिण्याचा छंद जोपासला आहे. घर आणि शाळेतील कामे करतच शब्दांची बांधणी करुन भावनांची कविता शब्दांतीत झाली असल्याची कवयित्री प्रामाणिकपणे कबुल करते.
           
" मुलांना शिकवता शिकवता
स्वतः शिकत गेले मी
जीवनाचे कोडे माझे
स्वतः उलगडत गेले मी "

          ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलेंनी मुलिंना शिक्षणाचे दार उघडले त्यामुळेच माहिला आज सर्वच क्षेत्रात भरारी मारतांना दिसत आहेत. अभिमानाचे जीवन जगत आहेत. परंतु शिकल्या सवरल्या महिला जेव्हा अंधश्रद्धा बाळगत  असल्याचे पाहून कवयित्री व्यथीत होते.
         
' ज्ञानाचं सोंग घेऊन
अजुनही हरवलोय
अंधश्रद्धेच्या अंधारात
वाट चुकलेल्या
वारसरू सारखं.. ! '

         संत गाडगेबाबा म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठच. लोकांना हे करा , ते करा असा उपदेश न करता कृतीतूनच लोकांचा सहभाग ते घेत. स्वतःच्या वागण्यातून , बोलण्यातून प्रवचन करणारे गाडगेबाबा बद्दल कवयित्री 'खरा संत' या कवितेत लिहिते.
        
' गाडगेबाबा  !
तुमचा पेहराव म्हणजे
समाजाचं बोलकं चित्र
कसं गवसलं तुम्हाला
परिवर्तनाचं हे सुत्र ? '

         खरच महिलांना सन्मान मिळतोय का ? कवियत्रीला पडलेला प्रश्न. स्त्रीला दुसऱ्याच्या मर्जीनं रहावं लागतं, जगावं लागतं. खोटा मोठेपणा ठेऊन माणसं वावरत असतात. अशावेळी 'अरे बाईचं जिनं' या कवितेत त्या मार्मिक शब्दांकन करतात .
        
' तुया परी रे माणसा
बरं पाखराचं जिनं
जीव एवढासा पर
उडे आपल्या मर्जीन'

          आपल्या गावाबद्दल कुणाला आपुलकी वाटणार नाही. कामानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने आपण कितीही दूर असलो तरी गावाची ओढ काही औरच असते. गाव आणि त्यातील माणसं आपण कधीही विसरू शकत नाही. अशाच ' आठवणीतले गाव' या कवितेत गावातील परिस्थितीचे वास्तव चित्रण त्यांनी रेखाटलं.
         
' नकाशाच्या रेषेपासून दूर असलेलं
दारिद्रय रेषेखालच माझं गावं
आठवते मज आजही ते आठवणीतले गाव
दारिद्रयाने विव्हळणारे मिटे न मनीचे घाव '
'घे तू उंच भरारी' या कवितेत मुलिंना प्रेरणा देणारी शब्दरचना आहे.

' तुझेच आकाश
तुझीच धरा
भिऊ नकोस तू पोरी
घे तू उंच भरारी..'

        आईचं ममत्व काय सांगावं.. अनेक कविंनी आईबद्दल अगदी भरभरून लिहलयं. आकाशाचा कागद अन समुद्राची शाई केली तरी आई विषय संपणारं नाही. असी कुणाची आई, माय, मम्मी, माँ, याडी, बयो, अनेक शब्द असले तरी भावना एकच आहेत. 'भाकरी भवती' या कवितेत कवयित्री लिहिते.
       
' मायी माय जवा थापे
भाकर चुलीवरती
सारे जग जणू फिरे
तिच्या भाकरी भवती '  
___________________
पुस्तक परिक्षण:
रमेश मुनेश्वर, किनवट
ry.muneshwar@gmail.com
७५८८४२४७३५
___________________
          
        आपली मायबोली मराठी. भावना शब्दबद्ध करते ती मराठी, महाराष्ट्राची अस्मिता मराठी. मग मराठीवर कविता लिहिण्याचा मोह कोणत्या कविला नसेल ? बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा प्रभाव सुद्धा कवयित्रीवर दिसते 'मायी माय मऱ्हाटी' या कवितेत त्या लिहितात.
       
' मऱ्हाटीशी नाते म्हाये
हाये जसे मायवानी
तिच्या गर्भातच रुजली
म्हायी शब्दांची वाणी '

            स्व- अस्तित्व जपण्यासाठी माणूस सतत धडपडत असतो. त्या प्रमाणे निसर्गातही स्वत्वाचे बदल होत असतात आणि हे बदल स्विकारून मार्गक्रमण करावे लागते. अशावेळी कवयित्री लिहिते.
           
' भावनेला शब्दांनी तोलावे लागते
'शब्दांना महफिलीत बोलावे लागते
अस्तित्व टिकवण्या वृक्षाला
पानांना स्वतःपासून तोडावे लागते ' 
 

      भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन कवयित्री शब्दरचना करते. कधी  अनुभवांची शिदोरी तिच्याजवळ आहे तर कधी मनातल्या शब्दरेखा कवितेत उतरविते.

       ' कशास हवा आरसा दुसऱ्याचा ?

मनातच प्रतिबिंब मी न्याहाळते..
कशास हवा शब्दबाजार दुसऱ्याचा ?
माझ्या भावनांचे शब्द मी रेखते.. '


          'प्रतिबिंब अंतरिचे ' अर्चना खोब्रागडे यांचा हा पहिलाच कवितासंग्रह. यात ११० कविता असून शब्दभूमी पब्लिकेशन औरंगाबादने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अहमदनगरचे सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी सुंदर असे मुखपृष्ठ रेखाटले असून मलपृष्ठावर औरंगाबादच्या सुप्रसिद्ध साहित्यिका तथा कवयित्री प्रा.डॉ. प्रातिभा अहिरे यांचा आश्वासक असा अभिप्राय आहे.
            संतश्रेष्ठ तुकारामाशी वैचारिक नाते सांगणाऱ्या ह्या कवयित्रींच्या कविता संग्रहात बुद्ध, शिवाजी, फुले, बाबासाहेब, जिजाऊ, सावित्री, अहिल्या, रमाई यासह कर्मयोगी संत गाडगेबाबा या महामानवांचा आदर्श आहे. तर निसर्ग, शेतकरी, माय, अंध्दश्रद्धा, रुढी- परंपरा, पाऊस, गाव, लोकशाही, संविधान, जातियता, अशा अनेक विषयावरसुध्दा कविता आहेत. शिक्षिका असल्याने कवयित्रीला सामाजिक जाणिव आहे. त्यातूनच हा कवितासंग्रह आकारलाय असं मला वाटतं. याच वाटेवरचा एक पथिक या नात्याने त्यांना सम्यक शुभेच्छा देतो.. !

   ' निसर्गाने भरभरून दिलेत रंग
मुक्त निळा, तेजोमय तांबडा
शांत पांढरा, समृद्ध हिरवा
निसर्गाने भरभरून दिलेत रंग
माणसाने मात्र वाटून घेतले
हा माझा, तो तुझा
रंगानाही जात दिली
माणसाच्या माणुसकिचा रंग
नेमका कोणता कळलाच नाही.. !

पुस्तकाचे नाव : प्रतिबिंब अंतरिचे
कवयित्री : अर्चना खोब्रागडे
प्रकाशक : शब्दभूमी पाब्लिकेशन, औरंगाबाद
पानं : ११०
किमंत : १३०

2 comments:

  1. खुप खुप धन्यवाद सरजी..

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या शब्दक्रांतीचे मनःपूर्वक स्वागत

      Delete

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News