-प्रा.नंदू वानखडे
वाटलं नव्हतं कधी
असा मोबाईल येईल हाती
तोडून टाकेल तो सर्वच आपली
आपुलकीची नाती...!
ओस पडेल अंगण
सारे खेळ करेल बंद
पडद्यामागचं जग बघायचा
जडेल भलताच छंद...!
लुटल्या जाईल सर्वच काही
जगणं होईल भकास..
वरवरच्या मुलाम्यालाच
लोकं म्हणतील विकास...!
संवाद संपेल आपसातला
मनात चालेल दंगा..
इंटरनेटवर कुणीही पाहील
व्यक्ती साक्षात नंगा...!
कुणाच्या दारी येणार नाही
कुणाचं प्रेमळ पत्र...
मोबाईलवरच भेटतील सारे
जगभराचे मित्र...!
पण दिसणार नाहीत
मित्राचे या सुखदुःखाचे आसू..
फुलं फेकू, हात जोडू
नुसतेच,खोटे खोटे हासू....!'
बुडून जाईल नात्या गोत्याचा
सगळाच हा गावगाडा...
व्हाॅटस् अपवरतीच मामकुळाची
आमराई येईल पाडा...!'
मोबाईलवरतीच जन्मला माणूस
मोबाईलवरतीच मेला..
मुठीत आलं जग आपुल्या
विकास म्हणत्यात याला..!'
शेतकरी मरतो फाशी घेऊन
सलाईन लावलं पिकास...
मोबाईलचच पिक आलं
याला म्हणतात विकास...!
-प्रा.नंदू वानखडे ,
मुंगळा जि.वाशिम
9423650468




No comments:
Post a Comment