नांदेड, ता. 17:
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत असेल तर भविष्यातली सर्व आव्हाने पेलण्याची ताकद त्यांच्यात निर्माण होते, त्यातूनच तो सक्षम नागरीक बनावा याकरिता शिक्षकांनी विद्यार्थी विकासाची खूणगाठ मनाशी बांधावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता दहावीला शिकणा-या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक व विशेष शिक्षकांची कार्यशाळा व आढावा बैठक येथील कुसूम सभागृहात आज गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती ; त्यावेळी ते बोलत होते. मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, माधव सलगर, ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीकृष्ण देशमुख, डॉ. माणिक जाधव, अभय परिहार, श्री नरवाडे, हर्षद शहा. भार्गव राजे, प्रमोद शिरपूरकर, श्री नाईक, उपशिक्षणाधिकारी कें टी.अमदुरकर, दीपक शिरसाठ, डॉ. डी.एस. मठपती, बालाजी कपाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अरूण डोंगरे पुढे म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता विकासावर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर काम सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. जिल्ह्यात यावर्षी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा ओढा वाढत आहे, त्यासाठी मराठी शाळा प्रभावी करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांनी केले होते याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ डी. एस. मठपती यांनी केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी कॉपीमुक्त अभियानात यापूर्वी झालेल्या कामांची माहिती दिली. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी तेवढ्याच प्रभावीपणे अध्यापन व्हावे. पालकांना भेटा, संवाद करा, विद्यार्थ्यांच्या घरी जा, त्यांच्या समस्या जाणून घ्या, पालकांच्या बैठका घ्या, कॉफी करणारच नाही हे विद्यार्थ्यांच्या मनात पक्के ठसवावे व त्यादृष्टीने नियोजन करा असे सांगितले. हर्षद शहा यांनी स्मार्ट गर्ल योजनेची माहिती दिली. भार्गव राजे यांनी अभ्यास, नियोजन, प्रमोद शिरपुरकर यांनी इंग्रजी, श्री नाईक यांनी गणित व श्री आडेराव यांनी विज्ञान विषय अध्यापन याबाबत मार्गदर्शन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी स्मार्ट गर्ल योजना शाळास्तरावर कशी राबवावी याबाबत मार्गदर्शन केले. मुली शाळेत अनुपस्थित राहतात त्याची कारणे काय आहेत हे शोधा. मुलींना बोलतं करा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. मूली बोलू लागल्या, काही सांगू लागल्या तर त्यांचे प्रश्न जाणून त्यावर उपाययोजना कराव्यात. तसेच शाळास्तरावर मुलींसाठी स्वतंत्र वापरासाठी स्वच्छ शौचालय देखील असणे आवश्यक आहे. या सुविधा शाळेत मिळाल्या तरच मुलींची नियमित उपस्थिती राहील. रस्त्यात शाळेच्या बाहेर मुले त्रास देत असतील तर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून किंवा स्वतः शिक्षकांनी एकत्रितरित्या पुढे येऊन त्यांना विश्वासात घेऊन समजून सांगावे. प्रसंगी कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये. जिल्हाधिकारी व आम्ही यासाठी आपल्या सोबत आहोत असेही त्यांनी सांगितले.
प्रशांत दिग्रसकर यांनी स्मार्ट गर्ल, कॉपीमुक्तीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबर बसवून त्यांच्यात विश्वास वाढवायचा आहे. याचे नियोजन दिवाळी सुट्टी पूर्वीच विशेष शिक्षकांनी करावं, असे केले तर कॉपीमुक्ती शक्य आहे. निकाल चांगला हवा असेल तर परिश्रमातून तो वाढवता येतो असे त्यांनी सांगितले.
स्मार्ट गर्ल या योजनेच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. पुरुष शिक्षकांनी वडीलकीच्या नात्याने पुढे येऊन विद्यार्थिनींना मदत करावी. प्रसंगी अंगणवाडी कार्यकर्तीची मदत घ्यावी. शिक्षिकांनी याकमी सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती आणि पुढील कामांची आखणी याबाबत माहिती दिली. शिक्षकांना निग्रहपूर्वक काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास ढवळे यांनी केले. दुपारच्या सत्रात जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व दहावीला गणित, इंग्रजी आणि विज्ञान शिकवणा-या शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी आढावा घेतला. मागील वर्षाचा दहावीचा निकाल वाचून दाखवून निकाल कमी लागल्याची काय कारणे आहेत हे त्यांनी विचारले. परंतु शिक्षकांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. दहाविच्या विद्यार्थ्यांसाठी शाळास्तरावर जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका सोडविण्याचा सराव घेण्यात यावा, इंग्रजी शब्दांचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी असेल अशा विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका घेऊन त्यांना तो विषय कळेपर्यंत समजून सांगावा, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले. या आढावा बैठकीस जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, गणित, विज्ञान व इंग्रजी शिकवणारे शिक्षक, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment