किनवट :
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिनस्त विधी सेवा समिती किनवटच्या वतीने " न्याय आपल्या दारी पंधरवड्याच्या आयोजना " निमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत असून शनिवारी ( दि. १६ नोव्हेंबर) रोजी विधी साक्षरता महाफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सर्व शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केले आहे.
सर्वांपर्यंत सुलभ न्याय पोहचावा या उद्देशाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने दिनांक ९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान " न्याय आपल्या दारी पंधरवड्याचे आयोजन " करण्यात आले आहे. यानुषंगाने विधी सेवा समिती, वकील संघ, तालुका प्रशासन, पंचायत समिती, शिक्षण विभाग, पोलिस स्टेशन व बालविकास प्रकल्प कार्यालय यांच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गुरुवारी ( दिनांक १४ नोव्हेंबर ) बालक दिनाचे आयोजन करण्यात होते ; तर शनिवारी ( दिनांक १६ ) सकाळी ८.४५ वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय, किनवट येथून शहरातील सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थांची विधी साक्षरता जनजागृती महाफेरी काढण्यात येणार आहे.
तसेच १. समान न्याय, २. मोफत कायदेविषयक सहाय्य आणि ३. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 या विषयावर सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, तहसिलदार नरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत विधी साक्षरता शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी व महाविद्यालयीन युवकांच्या निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्व कायद्याचे ज्ञान, माहिती सुलभपणे पोहचावी या उद्देशाने " न्याय आपल्या दारी पंधरवड्याचे आयोजन " करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश जहांगीर पठाण, न्यायाधीश जे.एन. जाधव, विधी सेवा समितीचे सचिव गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पंजाब गावंडे, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद सर्पे, सचिव अॅड. दिलीप काळे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुदर्शन मेश्राम, पोलिस निरीक्षक मारोती थोरात, विधी सेवा समिती सदस्य के. मूर्ती, बालविकास प्रकल्पाधिकारी प्रफुल्ल बागल, स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे व उत्तम कानिंदे आदीजन परिश्रम घेत आहेत.




No comments:
Post a Comment