किनवट:
आदिवासी व अतिदुर्गम भागात आरोग्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून किनवटच्या एमआयडीसी भागात लवकरच धर्मादाय तत्त्वावर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची सुरुवात करण्यात येणार असल्याचे भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष,साने गुरुजी रुग्णालयाचे सर्वेसर्वा व थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे माणसपुत्र डाॅ.अशोक बेलखोडे यांनी रविवारी (ता. 10) पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले.
किनवट या आदिवासी तालुक्याचे मुख्यालय किनवट हे निमशहर आहे. हे ठिकाण नांदेड या जिल्हा मुख्यालयापासून 150 किलोमीटर अंतरावर आहे. किनवट हा आदिवासी, डोंगराळ व अतिदुर्गम भागात वसलेला तालुका आहे. कांही वर्षांपूर्वी या तालुक्यात आरोग्याच्या सुविधा या नाममात्रच होत्या. अशा या काळात सन 1993 मध्ये डाॅ.अशोक बेलखोडे यांनी साने गुरुजी रुग्णालयाची सुरुवात करुन ख-या अर्थाने आरोग्य सेवेची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात सरकारी दवाखाना सोडला तर आरोग्याची कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती, तेंव्हा डाॅ. अशोक बेलखोडे यांनी अत्याधुनिक आरोग्य सेवा येथे उपलब्ध करण्याचे काम सुरु केले व ते आजपर्यंत अविरत सुरुच आहे. डाॅ.बेलखोडे हे तालुक्यातील पहीले एकमेव सर्जन आहेत.कोणतेही डाॅक्टर किनवट येथे येण्याचे धाडस करत नसतांना ते येथे आले, एवढेच नाही तर त्यांनी येथे विविध तज्ज्ञ डाॅक्टरांची सेवाही उपलब्ध करून दिली. किनवट हे ठिकाण जिल्ह्यापासून दूर असल्याने त्यांनी रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका, फिरता दवाखाना यासारख्या सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या.
साने गुरुजी रुग्णालयाच्या आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम डाॅ.बेलखोडे यांनी सध्या हाती घेतले आहे. शासनाने याकरिता त्यांना येथील एम. आय. डी. सी. मध्ये पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. नियोजीत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय हे 100 खाटांचे राहणार असून पहिल्या टप्प्यात 50 खाटांच्या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी दै."लोकसत्ता"च्या "सर्व कार्येशू सर्वदा" या उपक्रमातून 481 देणगीदारांमार्फत 21 लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे. हा निधी ज्येष्ठ मराठीसिनेअभिनेते दिलिप प्रभावळकर व संपादक गिरिष कुबेर यांच्या हस्ते त्यांना मुंबई येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे. तसेच या रुग्णालयाच्या उभारणीसाठी बजाज अॅटो कंपनीने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबरोबरच एस.एम.जोशी यांच्या सुनबाई डाॅ. कांचन जोशी यांनी लहान मुलांच्या उपचारासाठी लागणारी आधुनिक तंत्रज्ञान सामुग्री विकत घेण्यासाठी 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे.
किनवट येथे धर्मादाय तत्वावर लवकर सुरु होणा-या या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणी साठी जनतेंनी स्वच्छेने मदत करावी व हातभार लावावा,अशी विनंतीवजा आवाहनही डाॅ.अशोक बेलखोडे यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment