नांदेड :
गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांनी समन्वयाने शौचालय बांधकामाचे नियोजन करुन डिसेंबर अखेर उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे राज्य समन्वयक गणेश वाडेकर यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आज गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी विस्तार अधिकारी, जिल्हा कक्षातील अधिकारी, तालुकास्तरीय गट समन्वयक व समुह समन्वयक यांची त्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी.यू.इंगोले, ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर.कोंडेकर, सहाय्यक गट विकास अधिकारी बाबुराव पुजरवाड, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे यांची उपस्थिती होती.
गट समन्वयक व विस्तार अधिकारी यांची त्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन शौचालय बांधकामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. तालुकास्तरावर मोठे उद्दिष्ट असलेल्या ग्राम पंचायतीसाठी वेगळे नियोजन करुन शौचालय बांधकाम करुन घ्यावे. ज्या लाभार्थ्यांचे शौचालय बांधकाम झाले आहे अशा लाभार्थ्यांना वरील प्रोत्साहनपर अनुदान वितरीत करावे. शौचालय बांधकामाचे फोटो संकेतस्थळावर अपलोड करणे, अनुदान वितरणासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावे. शौचालय बांधकामानंतर शौचालयाच्या वापरासाठी मोठया प्रमाणात गावस्तरावर जनजागृती होणे आवश्यक आहे. शाश्वत स्वच्छतेसाठी गावस्तरावर आराखडे तयार करुन राज्य शासनास पाठवायचे आहेत. परंतु या कामात ग्रामसेवकांकडून दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. याकामाकडे लक्ष देऊन येत्या दोन दिवसात आराखडे पूर्ण करावेत असे आवाहन राज्य समन्वयक गणेश वाडेकर यांनी केले. यावेळी स्वच्छता तज्ञ विशाल कदम, समाजशास्त्रज्ञ महेंद्र वाठोरे, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार नंदलाल लोकडे, संनियंत्रण व मूल्यांकन तज्ञ कृष्णा गोपिवार, लेखाधिकारी विठ्ठल चिगळे, वित्त नि संपादणूक सल्लागार निकिशा इंगोले, सुर्यकांत हिंगमीरे यांच्यासह गट समन्वयक व समुह समन्वयक यांची उपस्थिती होती.
येत्या 31 डिसेंबर नंतर शौचालय बांधकामाचा निधी केंद्र शासनाकडे वर्ग होणार आहे. त्यानंतर मात्र प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2019 पूर्वी शौचालय बांधून त्याचा वापर करावा, असे आवाहन राज्य समन्वयक गणेश वाडेकर यांनी केले.





No comments:
Post a Comment