बाबासाहेब तुम्ही..!
-प्रा.नंदू वानखडे
महानायकांच्या विचारांची पताका घेऊन क्रांतीकारी साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात वावरणारे , आंबेडकरी विचारांचं अनुसरण करणारे प्रसिध्द कवि, थायलंड येथे विश्व संमेलनात ज्यांचा गौरव झाला असे प्रख्यात कवि प्रा.नंदू वानखडे यांची राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेली शब्दांजली
-संपादक
बाबासाहेब,
विशाल दूरदृष्टी तुमची ..!
प्रचंड ज्ञानाचा साठा
साठवलेला महासागरच तुम्ही..!!
इथल्या दिशा जेव्हा
दिशाहीन होतात त्यांच्यासाठी
तुम्ही अजूनही बनता होकायंत्र..!
मजबूत केले आहे तुमच्या लेखणीने
या देशाचे प्रजातंत्र...!
अद्भूत अद्वितीय ज्ञानी ,अर्हंत, बोधिसत्व ,प्रज्ञासूर्य तुम्ही..!
नाही आसक्ती नाही तृष्णा, नाही वाण..
म्हणूनच तुमचे
परिनिर्वाण ठरते महापरिनिर्वाण..!
तुमच्या कर्तृत्वाचा सीमालेखच अमर्याद...
वंचित ,शोषित ,देशहिताचे
समृद्धतेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वरक्ताची शाई करून,
लेखणीत सदैव गुंतलेले
तुमचे हात
अजूनही उंचावत असतात
या देशाला प्रगतीच्या उंच शिखरावर घेऊन जाण्यासाठी ..!
तुम्ही संविधानात
अंतर्भूत केलेली सारी कलमे
देत आहेत संजीवनी
या देशाच्या एकता ,अखंडतेला ..
समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाला..!
तुमच्या संविधानाच्या कक्षा सोडून
बाहेर जाण्याचा निष्फळ
प्रयत्न करणा-यांचा
पूर्ण होत नाही इथं कुठलाच मनसुबा..
तुम्ही गेल्यावर ही कायम आहे
तुमचा अजूनही दबदबा...!
बाबासाहेब,
अजूनही' चौकात चौकात ऊभे दिसता तुम्ही,
देशाला योग्य दिशेने जाण्याचा
हितोपदेश, अंगुली निर्देश करीत...!
अजूनही बोलत असतात संसदेत
खडाखडा तुम्ही लिहीलेल्या
संविधानाची पानं...
ऊमटतच असते,अजूनही सरत नाही
आमच्या ओठावरचं तुमच्या
गौरवाचं गाणं..!
बाबासाहेब ,
व्यापला आहे तुमच्या
आदर्श प्रगल्भ ज्ञान प्रतिभेने संपन्न
आमच्या देहाचा हरेक पापुद्रा..
कोरल्या आहेत काळजावरती
तुम्ही देशहितासाठी घेतलेल्या परिश्रमाच्या श्रमभावमुद्रा...!
बाबासाहेब,
तुमच्या आठवणीचा जागर
सुरूच राहील अनेक शतकापार...
केले आहेत देशावरती तुम्ही
अनंत असे ऊपकार...!
आज तुमच्या आठवणीनं
भरून आलंय आमचं मन् अन् मन..
संविधानाच्या शिल्पकारा,
तुम्हा आमुचे विनम्र अभिवादन...!
-,प्रा.नंदू वानखडे ,मुंगळा जि.वाशिम'
(9423650468 )




No comments:
Post a Comment