जगातील विद्वान बुध्दांच्या विचाराकडे वळताहेत आजच्या घडीचीही ती नितांत आवश्यकता आहे -प्रसिध्द विचारवंत प्रा.डॉ. आ.ह. साळुंके यांचे अमृत महोत्सवी गौरव समारंभात प्रतिपादन - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, December 9, 2019

जगातील विद्वान बुध्दांच्या विचाराकडे वळताहेत आजच्या घडीचीही ती नितांत आवश्यकता आहे -प्रसिध्द विचारवंत प्रा.डॉ. आ.ह. साळुंके यांचे अमृत महोत्सवी गौरव समारंभात प्रतिपादन



उत्तम कानिंदे 
किनवट ( नांदेड )  :
सज्जनाचा धर्म म्हणजे कृतज्ञता असे बुध्द सांगतात. आज जगातील मोठमोठे विद्वान, शास्त्रज्ञ, मानसतत्वज्ञ बुध्दाकडे त्यांचं तत्वज्ञान समजून घ्यायला येत आहेत. ते बुध्दाच्या विचाराकडं वळले आहेत. आजच्या घडीची ती नितांत आवश्यकता आहे. कारण जगातील सर्वोत्तम भूमीपुत्र बुध्दाने सांगितलं, माझे वारसदार न होता माझ्या विचारसरणीचे वारसदार व्हा. वस्तूंची मालकी असणं चांगलं की स्वतःच्या आनंदापेक्षा सर्वांना फुलविणाऱ्या आनंदानं जगणं चांगलं हे शहाण्या माणसानं निवडावं. माणसामध्ये विवेक आहे. हे वापरता आलं पाहिजे असे अभ्यासपूर्ण विवेचन प्रसिध्द विचारवंत प्रा.डॉ. आ.ह. साळुंके यांनी केले.
             शनिवारी (ता. सात ) रात्री सात वाजता गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात प्रा.डॉ. आ.ह. साळुंके अमृत महोत्सव गौरव समारंभ आयोजित केला होता यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडच्या भाषा व संस्कृती विभागाचे संचालक प्रा.डॉ. दिलीप चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते ;तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादचे माजी कुलगुरू तथा प्रसिध्द लेखक प्रा.डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे प्रमुख पाहुणे होते. मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बोधी वृक्षाला जल अर्पूण कार्यक्रमास प्रारंभ झाला.
             प्रा.रामप्रसाद तौर यांनी प्रारताविक केले. प्रा. अर्जून जाधव यांनी गौरव समारंभ आयोजनाची भूमिका मांडली. प्रा.डॉ. पंजाब शेरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे यांनी आभार मानले.  नाटककार प्रा.डॉ. अंबादास कांबळे व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद सुर्वे यांचेसह सर्वकार्यकर्त्यांनी ग्रंथ भेट देऊन डॉ.आ.ह. साळुंके यांचा सत्कार केला. यावेळी आमदार भिमराव केराम यांचा डॉ. साळुंके यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
            प्रा.डॉ. आ.ह. साळुंके


             पुढे बोलतांना डॉ. आ.ह.साळुंके असे म्हणाले, पिंपळ साधा वृक्ष होता ;परंतु त्याखाली बसून सिद्धार्थाने बोधी प्राप्त केली. बोधी म्हणजे सर्वोच्च प्रतीचं ज्ञान. तेव्हापासून पिंपळाला बोधीवृक्ष नाव मिळालं. प्रवाहाविरूध्द्धचं हे ज्ञान दुसऱ्याला सांगू की नको म्हणून बुद्धांनी सात आठवडे विचार केला. त्यानंतर त्यांनी ठरवलं आपणास मिळालेलं ज्ञान दुसऱ्यांपर्यंत पोहचविणं हे माझं कर्तव्य आहे. मग त्यांनी सारनाथ येथे येऊन जुन्या सहकाऱ्यांना सर्वप्रथम धम्मज्ञान दिलं. त्यांचाच विचार पसरवण्यासाठी आज येथे बोधी वृक्षाला पाणी घातलं. आपल्या सगळ्यांना हाच विचार सर्वत्र न्यायचा आहे. मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी आज सत्कारप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ दिला. एकेकाळी नुसतं ज्यांचं नाव घ्यायला कचरत ते आज त्यांना स्विकारताहेत हेच तर परिवर्तन आपल्याला हवं.
              मी संस्कृत शिकलो. त्यातून प्राचीन ग्रंथ वाचले. अभ्यासतांना  चार्वाक मिळाला. त्यांच्याकडून चिकित्सा व बुद्धांकडून करूणा शिकलो. चार्वाक चिकित्सा कशी करावी तो शिकवतो. भारतीय समाज संमिश्र आहे. प्रचंड विविधता असलेला समाज आहे. अंतरिक ऐक्य टिकविनं महत्वाचं आहे. आपल्या स्वातंत्र्यावर कोणाचंही गैर वाजवी अतिक्रमण सहन करायचं नाही. तसच आपणही कोणावर गैरवाजवी अतिक्रमण करायचं नाही. निसर्गानं प्रत्येकाला वेगळेपण दिलं आहे. सख्या भावांच्या हाताचे ठसे एकमेकाला जुळत नाहीत. जगातल्या सात अब्ज लोकांपैकी कोणाच्याही हाताचे ठसे एकमेकाला जुळत नाहीत. प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु एकटा माणूस जगू शकत नाही. वेगळेपणाचा आदर करून जगणं अत्यंत महत्वाचं आहे.
             बाराव्या शतकात होऊन गेलेल्या महात्मा बसवेश्वरांनी एक मार्मिक विचार मांडला. हा कोणाचा ? हा कोणाचा ? हे विचारू नये. तर आमचा आमचा म्हणावं. हा कोणत्या जातीचा ? हा कोणत्या धर्माचा ? हे विचारू नये. कोणी कोणत्याही दर्जाचा असू दे परंतु माणुसकी सांभाळणारा असावा हेच बसवेश्वरांनी सांगितलं. चार्वाकांने हेच सांगितलं. वेगळेपणा असून माणूस म्हणून समतेनं, जिव्हाळ्यानं वागलं पाहिजे. जगात एकाच रंगाची फुलं असती तर फुलांची सृष्टी सजली नसती. यापुर्वी दुरावा, द्वेश कधीच नव्हता, तो आज जाणवू लागला आहे. बुद्धांच्या विचारात माणूसपणानं जोडणारी प्रेरणा आहे. आज जोडण्याची अत्यंत गरज आहे.जोडण्याचं काम जरी झालं नाही तर चालेल परंतु तोडण्याचं काम करणार नाही ही शपथच घ्यावी.
              गणित व ललित माझ्या आवडीचे विषय परंतु चार्वाकानं मला संशोधन करण्याची प्रेरणा दिली. कण - कण ज्ञान गोळा करून सर्वांसमोर मांडले. चार्वाकाने काय सांगितलं ? परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्याच्या घरी प्रश्न पडतो. त्या कार्यकर्त्याच्या पत्नीला पटत नाही. नवऱ्यावर संकट येईल म्हणून ती परंपरेला छेद देणार नाही. मोठ्या ऋषीमुनींनी सांगितलं, धर्मग्रंथात सांगितलं म्हणून जसच्या तसं स्विकारायचं नाही. तर कोणतीही गोष्ट चिकित्सा करूनच स्विकारावी असं चार्वाकाने सांगितलं. त्या काळात स्वर्ग, नरक कल्पना होत्या. स्वर्गात गेलं तरच मोक्ष मिळतो अशी समजूत होती. परंतु ' स्वातंत्र्य खरा मोक्ष ' ही विचारसरणी चार्वाकाने मांडली.
              चहा पितांना गाळून घेतो. जे हवं ते घेतो बाकीच टाकून देतो. कोथींबीरची जुडी जशीच्या तशी स्वयंपाकात टाकत नाही.एक - एक काडी स्वच्छ धुवून घेतो. मग मेंदुमध्ये माहिती पाठवतांना तपासून घेतो का ? आपण अडीच -तीन हजार वर्ष आपल्याला मेंदू नाही असेच जगत राहिलो. परंतु तीन, चार, पाच पिढ्यात माणसं इतकी बदलली.
             महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या वा नातलगाच्या कुणीही मुली नसतांना त्या काळी प्रचंड विरोध पत्करून त्यांना शिकवलं. त्यांना आठवलं पाहिजे, त्यांच्या कार्याची उजळणी केली पाहिजे. तरच आपल्या प्रेरणा जिवंत राहतात. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ज्या समाजातील उपेक्षित राहिलेले, सर्वांना माणूस म्हणून उन्नत करणारे बिरसामुंडा, तंट्या भिल्ल, झलकारीबाई हे केवळ आदिवासींची नाही तर सर्वांच्या स्वातंत्र्याची प्रेरणा आहेत.
        एक बातमी वाचनात आली. एका जिल्ह्यातील एकशे तेहत्तीस गावात सर्वेक्षण केलं. सर्वेक्षण काळात तिनशे सोळा बालके जन्माला आली होती. आपण कल्पनाही करू शकणार नाही. किती हे दुष्कर्म. तिनशे सोळा बालकांपैकी सर्व मुलगे होती. एकही मुलगी नव्हती. होमोशेफीयन माणसाने कृत्रिमरितीने हे घडविलं. हे काही त्या जिल्ह्यातलं चित्र नाही ;तर भारतातील प्रत्येक ठिकाणचं हे दुश्य आहे. आपण अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार आहोत की, प्रकाशाकडून अंधाराकडे चाललोय का ?
        ज्यांच्याकडे इतिहास, साहित्य, शब्द व कोणतीही कला आहे त्यांची जबाबदारी किंवा त्यांचं काय ध्येय असलं पाहिजे ? आपल्यामुळे हे जग अधिक सुंदर व्हावं, प्रकाशमान व्हावं. ही जबाबदारी आहे. हे जर झालं नाही तर निदान ते कुरूप होऊ नये .याची जबाबदारी स्विकारली तरच तमसोमा ज्योतिर्गमय म्हणता येईल. ज्या समाजात शंभर टक्के फुलण्याची संधी मिळते. ते चागलं. मुंगीवर सुद्धा पाय पडला तर ती शक्य असेल तेवढा प्रतिकार करते. दगड बाहेरून कुणी ढकलला तरच तो हलतो. मुंगी खूप बारीक आहे परंतु ती सदैव हलत चालत राहते. आपण कितीही छोटे असलो तरी प्रकाश देण्यासाठी सतत हलचाल करणे आवश्यक आहे.असेही ते म्हणाले.
             प्रा.डॉ. नागनाथ कोत्तापल्ले


             याप्रसंगी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आपले विचार मांडतांना असे म्हणाले की, किनवटमध्ये मला वेगवेगळे बॅनर दिसले. तंट्या भिल्ल,शहीद बिरसामुंडा ब्रिगेड यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. हे पुण्यात, औरंगाबादेत दिसत नाही. म्हणून येथे प्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ. आ.ह. साळुंके यांचा सत्कार होतोय त्याला विशेष महत्व आहे.आदिवासीबहुल भागात आता आमच्या धडावर आमचं डोकं असल्याचं हे लक्षण आहे. एकोप्यानं राहणं म्हणजे राष्ट्रवाद ही महात्मा फुले यांनी केलेली राष्ट्रवादाची सोपी व्याख्या. जगातील कोणताही धर्मग्रंथ बाईने लिहिला नाही. जातीच्या पलिकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली. जातीच्या पलिकडे किती जाता येतं त्यावर आपलं मोठेपण आहे. ही सगळी माणसं आपली माणसं आहेत, असं वाटणं ही फार मोठी बाब आहे. प्रा.डॉ. आ.ह. साळुंके हे असं व्यक्तिमत्व आहे की, जातीच्या पलिकडे जाऊन ते सदैव काम करतात.
             वाराणसी विद्यापीठात एका मुस्लीम माणसाची नेमणूक केली.विद्यार्थी संपावर गेले. उर्दू ही भारताच्या सर्व भाषेतून तयार झालेली भाषा. उर्दू भाषेच्या काही परंपरा आहेत. त्याच्या बाहेर जायचं की नाही हे ठरवणं फार महत्वाचं आहे. संस्कृत ही देवभाषा आहे. या देवभाषेत काय काय लपलं ? हे सांगायला फार दबाव येतो. या विषयी धाडसानं सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.आ.ह. साळुंके.
             या देशात शेकडो -हजारो राजे झाले. परंतु कुणालाही वाटलं नाही की बहुजनांना शिक्षण द्यावं. परंतु इंग्रजांनी शिक्षण दिलं. अशा प्रकारचं विवरण फक्त डॉ.आ.ह. साळुंके यांच्या साहित्यात मिळतं. म्हणूनच त्यांना फुल्यांचे समर्थ वारसदार म्हणतात. संत तुकारामांचा खून झाला की नाही त्यावर चर्चा केली तर वाद होतो. मध्ययुगीन काळात संस्कृतीमधील दबाव झुगारून सत्य निर्भिडपणे मांडणारे डॉ.आ.ह. साळुंके. गौतम बुध्दांबद्दल महत्वाच पुस्तक लिहिलं. ते जगातील सर्वोत्तम भूमिपुत्र आहेत.
             डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्म स्विकारल्यानंतर आपल्याकडे असा एक समज झाला की, बौध्द धर्म हा केवळ नवबौद्धांचा धर्म आहे. बौध्द धर्मातील मौलिक तत्वज्ञानाने बौध्द धर्म जगात पोहचला. बहुजनांच्या उध्दाराचा मार्ग म्हणून त्यांनी हा धर्म स्विकारला. ' जात ' म्हणजे पाचर आहे. स्वामी विवेकानंदानी एक पत्र पाठवलं होतं. त्यात इंग्लंडच्या लोकांना ' जात ' फार आवडते. असं लिहिलं होतं. कारण जाती -जातीत भांडणं लावून खुशाल राज्य करता येतं. हे त्यांना चांगलं माहित होतं. बौध्द झाल्यानंतर सुध्दा आम्ही पोटजाती पाळू तर हे कटू सत्य आहे. आज देशात सर्वत्र वेगळं वातावरण आहे. अशा सगळ्या परिस्थितीत आजची खरी गरज म्हणजे ' बुध्द '. म्हणून त्यांनी गौतम बुध्द ग्रंथ लिहिला.
             समाजात ज्यांच्याकडं वर्तमानपत्र, सत्ता, संस्था आहे, असे माणसं आपल्याला जे हवं ते पसरवतात. जे लोक शिवाजीला क्षत्रिय नाही म्हणून स्तोम माजवतात ते लोक शिवाजीचा गोरव करतात. पुन्हा माणुसकीचा प्रसव व्हावा हे निखाऱ्यासारखं  आहे. बहुजनांच्या अध्यात्मिकतेतूनच वारकरी संप्रदाय निर्माण झालाय.
             डॉ.आ.ह. साळुंके हे निखाऱ्यावर फुंकर मारणारे नाहीत तर नवे निखारे आपल्यासमोर ठेवणारे आहेत. हा केवळ त्यांचा गौरव समारंभ नव्हे तर विचारमंथनाचा कार्यक्रम आहे.डॉ. आ.ह. साळुंके हे समाजात माणूसकी,करूणा पेरण्याचा प्रयत्न करणारा माणूस आहे.
   
         प्रा.डॉ. दिलीप चव्हाण        


        अध्यक्षीय समारोप करतांना प्रा.डॉ. दिलीप चव्हाण म्हणाले, भारताच्या इतिहासातील वळणबिंदू आहे. अनिष्ट संकटाचा सामना कसा करायचा ? स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात डॉ.आ.ह. साळुंके, त्यानंतरच्या कालखंडात प्रा.डॉ. नागनाथ कोत्तापल्ले त्यानंतर आजच्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. डॉ. साळुंके संस्कृत, डॉ. कोत्तापल्ले मराठी तर मी इंग्रजीचा अभ्यासक. इंग्रजी भाषेत शानाची प्रक्रिया खुली राहिली. उग्र राहिली. या भाषेत एका विद्याशाखेनं खूप मोठं आव्हान उभं केलं. सांस्कृतिक अभ्यासातून सामाजिक प्रश्न सोडविले. सत्तेची रचना कशी निर्माण झाली ? आपल्याकडे सत्तेचा थेट संबंध विषमतेशी, भेदभावाशी व शोषणाशी आहे. युपोपमध्ये विकास पावलेला समकालीन सिंध्दात वेगळा. परवा हैद्राबादेत काय घडलं ? याचा विचार आपण कसा करतो. समाजाच्या घडवणूकीसाठी आपण पात्र आहोत की नाही हे महत्वाचं आहे. प्राचीन, मध्ययुग व सध्याकाळात काय घडलं ? याचा विचार करणं गरजेचं आहे. भारतात जन्म झाला असेल तर इतिहासाचं उत्खनन आपल्याला महत्वाचं आहे. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत जोतीराव फुलेंच्या ग्रंथांचे शिर्षक बघा, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाचे शिर्षक बघा त्यांनी संपूर्ण हयात इतिहासाचं चिंतन करण्यात घालवली. डॉ.आ.ह. साळुंके हेही इतिहासाचं संशोधन करण्यात आयुष्य वेचत आहेत. इतिहासाचं भूत भारतीयांच्या मानगुटीवर बसविलं. प्रचंड दरी, अवहेलना यांचा थेट सबंध इतिहासाशी आहे. समकालीन जाण ठेऊन इतिहासावर भान ठेवणं महत्वाचं आहे. योग्य भाषेत शक्य असलेल्या साधनातून डॉ.आ.ह. साळुंके यांनी मांडलं. एका नव्या समाजाचं सृजन करायचं असेल, निर्मिती करायची असेल तर त्यांचा वारसदार शोधावा लागेल. नव्यानं इतिहास मांडावा लागेल.
             डॉ.आ.ह. साळुंके गौरव समितीचे सर्व सदस्य प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, प्रा.उमाकांत इंगोले, प्रा. किशनराव किनवटकर, प्रा.डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रा.डॉ. सुरेन्द्र शिंदे, प्रा. विजय खुपसे, प्रा. द्वारकाप्रसाद वायाळ, अॅड. मिलिंद सर्पे, उध्दव रामतिर्थकर, उत्तम कानिंदे, प्रा.डी.पी.चंदेले, प्रा.मंदाकिनी राठोड, सामाजिक कार्यकर्ते मारोती भरकड, प्रा. दगडू भरकड आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News