112 India ऍपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली... - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Sunday, January 5, 2020

112 India ऍपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली...


             आदिती प्रधान, पुण्यात राहणारी एक उच्चशिक्षित, सुंदर २३ वर्षीय तरूणी. आदिती एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत टेक्नॉलॉजी ऍनालिस्ट आहे. सध्या ती एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असल्याने घरी जायला बर्‍याचदा उशीर होतो. पण आज क्लायंट सोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मुळे रात्रीचे अकरा कसे वाजले तिला कळंलं देखील नाही.

आदितीने बॅग उचलली, ड्रॉवर उघडून मोबाइल बाहेर काढला. आईचे ५ मिसकॉल दिसत होते. फोन करून आईला तिने तासाभरांत घरी पोहचते असे सांगून मोबाइल वर कंपनीचे कॅब बुकिंग ऍप उघडले आणि कॅब बुक केली. ती बाहेर पडत असतानाच कॅब समोरून येताना दिसली. दार उघडून ती आत बसली. ड्राइवर शिवाय कॅबमधे कोणीही नव्हते. आज तिला फारच उशीर झाला होता. ड्रायव्हर सुद्धा ओळखीचा वाटत नव्हता. कंपनीतील महिला कॅबमधे एकटी असल्यास किंवा तिचा शेवटचा स्टॉप असल्यास सेक्युरीटी गार्ड बरोबर घेण्याची सुविधा होती पण आदिती सहसा गार्ड बरोबर घेण्याचे टाळत असे.

हिंजेवडी फेज वन वरून गाडी बाहेर पडली आणि मुंबई बेंगलोर रस्त्याला लागली. पाच दहा मिनिटं झाली असतील ड्रायव्हरने समोर ठेवलेला त्याचा मोबाईल उचलून स्विच अॉफ केला. तिने कारण विचारल्यावर "मोबाइल डिस्चार्ज होतो आहे आणि थोडय़ा वेळाने महत्त्वाचा कॉल करायचा आहे. म्हणून बंद केला." असे त्याने सांगितले. पण त्याच्या उत्तराने आदितीचे समाधान झाले नाही. कंपनीच्या कॅब बुकिंग ऍपला त्याचे लोकेशन ट्रॅक करता येऊ नाही म्हणून त्याने मोबाइल बंद केला हे तिच्या लक्षात आले.

तिच्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली. तेव्हढ्यात ड्रायव्हरने गाडीचा स्पीड वाढवला. आणखी थोड्या वेळात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका माणसाजवळ गाडी येऊन थांबली आणि तो माणूस ड्रायव्हर शेजारचे दार उघडून गाडीत येऊन बसला. पेहरावावरून आणि चेहर्‍यावरून तो माणूस काही सभ्य वाटत नव्हता. दोघांच्या हेतूची तिला पूर्ण कल्पना आली आणि तिची खात्री झाली कि ती फार मोठ्या संकटात सापडली आहे.

थंडीचे दिवस असूनही आदितीला घाम फुटला. घशाला कोरड पडली. मोठ्या प्रयत्नाने तिने स्वतःवर ताबा मिळवला आणि शांत डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करू लागली. अचानक तिला आठवले काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअऍपवर आलेली एक पोस्ट वाचून तिने 112India ऍप डाउनलोड करून मोबाइलवर इन्स्टॉल करून घेतले होते आणि त्याला टेस्टही केले होते. थरथरत्या हाताने तिने पर्समधून मोबाइल बाहेर काढला. पिन टाकून सुरू करून होमस्क्रीन वरचे 112India ऍप ओपन केले आणि पोलिसांच्या मदतीसाठीचे बटन दाबले. आत्ताच्या परिस्थितीत या ऍपमुळे आपल्याला काही मदत मिळते की नाही या बाबतीत आदिती साशंक होती.

एव्हाना गाडीचा वेग कमी होऊन गाडी एका सुनसान रस्त्यावरून धावत होती. ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस मागे वळून घाणेरड्या नजरेने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करत होता. तिने पुन्हा एकदा 112India ऍपवरचे पोलिस आणि अदर्स हे दोन्ही बटन्स एकामागोमाग एक दाबले. दुसरी कुठलीही मदत मिळेपर्यंत तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे भाग होते. ड्रायव्हरजवळ बसलेल्या माणसाला ती मोबाइलवर कोणाची तरी मदत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे, याचा संशय आला होता. त्याने मागच्या सीटवर झुकून तिचा मोबाइल काढून घेण्याचा प्रयत्न केला. आदितीने मोबाइल पटकन पर्समधे टाकला आणि चालत्या गाडीचे दार उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण गाडी आतून लॉक होती.

गाडी एका निर्मनुष्य जागी येऊन थांबली. ड्रायव्हर आणि त्याच्याजवळ बसलेला माणूस दोघेही दार उघडून मागे आले. दोघेही गाडीची मागची दोन्ही दारं उघडून तीला घेरून उभे राहिले. क्षणाचाही विलंब न करता अादिती उजव्या बाजूच्या दारातून ड्रायव्हरला ढकलून बाहेर पडली आणि रस्त्याच्या दिशेने धावत सुटली.

ऍपवरून पोलिसांना सूचना देऊनही दहा मिनिटे उलटली होती. ती जीवाच्या आकांताने पळत होती. त्याचबरोबर पोलिसव्हॅनच्या सायरनचा आवाज येतो का हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. दोघेही तिचा पाठलाग करत होते. दोन तीन मिनिटांतच त्यांनी तिला सहज गाठलं असतं.

तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज तिला ऐकू आला. तिच्या जीवात जीव आला आणि ती अधिकच जोरात रस्त्याच्या दिशेने धावू लागली. थोड्याच वेळात पोलिस व्हॅन तिच्या दृष्टीस पडली. पाच पोलीस व्हॅनमधून उतरले. त्यात एक महिला पोलीस देखील होती. तिने धावण्याचा वेग कमी केला आणि मागे वळून पाहिले. दोघंही नराधम पोलिसांना पाहून पळून गेले होते.

आदिती पोलीस व्हॅनजवळ आली. तिने सगळी घटना पोलीसांना सांगितली. पोलीसांनी आसपासचा परीसर पिंजून काढला पण दोघंही सापडले नाही. पोलीसांनी व्हॅनमधून आदितीला घरी सोडले.

आज भारत सरकारनी सुरू केलेल्या 112India ऍपमुळे आदिती एका मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडली होती.

आदितीने दोघा नराधमां विरुद्ध एफआयआर दाखल केला. तिने सांगितलेल्या गाडीच्या आणि दोघांच्या वर्णनावरून तसेच कंपनीजवळ असलेल्या ड्राइव्हरच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवरून पोलीसांनी सातार जवळच्या एका गावातून दोघांनाही ताब्यात घेतले.

112India ऍप डाउनलोड करून इंस्टॉल केल्यावर, नाव, जन्मतारीख आणि फोन नंबर दिल्यावर ओटीपी येतो. ऍपला कॉन्टॅक्ट्स, लोकेशन, फोनकॉल्स वगैरे ची परवानगी द्यावी लागते. ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे 112India ला अशक्य असते. लगेच स्क्रीनवर ऍप लोकेशन दाखवू लागते. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागतात.

भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमर्जंसी मध्ये वापरण्यासाठी खुला केला आहे. आजपर्यंत २२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्यातही होत आहे.

पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांजवळ स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी ऍप विकसित केलेले आहे. ऍपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत - पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत ६ ते १० मिनिटांत मिळू शकते.

आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.

बर्‍याचदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमेरजन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले दूरदेशी असतात. अशा वेळी हे ऍप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे. ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे.

ऍपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे हे तर नक्कीच आपल्या हातात आहे.

(साभार - कविता दातार ©)

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News