नांदेड येथील सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रा. प्रमोद दिवेकर सर यांचं दि. १५ जानेवारी, २०२० रोजी पहाटे १:३५ वाजता नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाल्याची बातमी काॅलेज कट्टा ग्रुपवर वाचली अन् मी भूतकाळात गेलो. प्रा. प्रमोद दिवेकर सर यांनी विविध वृत्त पत्रांमध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटविला होता. प्रा. प्रमोद दिवेकर सरांनी नांदेडच्या एम. जी. एम. फाईन आर्ट महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काही काळ काम पाहिल्याचे आठवते. सिद्धहस्त चित्रकार म्हणून ते उभ्या मराठवाड्याला सुपरिचित होते.
अनेक दिग्गज लेखकांच्या पुस्तकांना प्रा. प्रमोद दिवेकर सरांनी मुखपृष्ठ दिलेले आहेत.
मुखपृष्ठ काढण्यासाठी दिलेले पुस्तक पूर्ण वाचून त्याची थीम काय आहे, यावरून थीमला साजेसे सर्वांग सुंदर, समर्पक मुखपृष्ठ प्रा. प्रमोद दिवेकर सर देत असत. १९९१-९५चा काळ आठवतो मी, पत्रकार बबन जोगदंड, मधुकर पवार, मिलिंद ढवळे, सदाशिव गच्चे सर प्रमोद दिवेकर सर यांचे घरी जायचो, सर्व क्षेत्रातील गप्पा होत असत. चहा घेतल्याशिवाय जायचे नाही असा दंडक असे. नांदेड शहरात तेव्हा रमाई प्रतिष्ठान, दखल, भीमांजलीचे विविध कार्यक्रम होत असत. महाराष्ट्रातील चळवळीचे एक केंद्र म्हणून नांदेड कडे सगळ्यांचेच लक्ष असायचे,
प्रा. प्रमोद दिवेकर सर एक जिंदादिल मित्र, एक मार्गदर्शक म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर कालचा दिवस माझ्या आयुष्यातील काळा दिवस ठरला. मी अलिकडेच माझ्या कवितासंग्रहासाठी सरांशी चर्चा करून मुखपृष्ठ काढून घेऊ या विचारात होतो त्या आधीच सरांनी आम्हां सर्व मित्रांचा निरोप घेतला.
मानवी जीवन अशाश्वत आहे हे मान्य. परंतु अशा चळवळीत काम करणाऱ्या, समाजाचे देणे लागतो या भूमिकेतून काम करणाऱ्या सच्चा कार्यकर्त्यांसाठी जीवन हे काही काळासाठी निश्चितच शाश्वत असावं असं वाटते.
प्रा. प्रमोद दिवेकर सरांचा अनेक सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक चळवळीत सहभाग होता. दिवेकर सर यांच्या अचानक Exit मुळे आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. कालकथीत प्रा. प्रमोद दिवेकर सरांना त्रिवार आदरांजली!
-डॉ.दिलीप लोखंडे, साक्री (धुळे)
एवढा मोठा चित्रकार,कलेचा अहंकार नाही की मोठेपणाचा बाज नाही
-मधुकर पवारप्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी मिळाली अन नांदेड शहरात ज्यांच्याशी हृदयाशी नाते जोडले गेले असे अनेक सोन्यासारखी माणसं मी गमावून बसलो.कारण ड्युटी जरी तालुक्यातील खेड्यात असली तरी उमरीला येण्या -जाण्याची प्रवासाची सोय नव्हती.मी खेड्यातच राहिल्यामुळे मी नांदेडच्या सहवासातील अनेकांपासून दुरावला गेलो.
लोकपत्र सारख्या दैनिकात 'मुद्रित शोधक'पदावर काम करण्याचा योग्य आला.त्याचवेळी आदरणीय का.प्रा.प्रमोद दिवेकर यांची ओळख झाली,अन ते माझ्यासाठी गुरुस्थानी राहिले.स्क्रीन छपाईचा तो काळ,ती कला त्यांनी मला शिकवली.1994-95 या कालावधीत याच कलेने मी स्थिर झालो.
एवढा मोठा चित्रकार,कलेचा अहंकार नाही की मोठेपणाचा बाज नाही."रमाई" दिनदर्शिका 1992 छपाई करताना आमची मैत्री अधिक घट्ट झाली.जणू त्यांच्या कुटुंबातील सदस्यच.सर्वच जण परिपक्व विचाराची ही मंडळी.या कुटुंबातील "प्रा.दिवेकर" सर,म्हणजे मुकुटमणीच !
1996-97 ची घटना. गल्लीत बाबासाहेब आंबेडकर यांचे पेंटींग केलेले फोटो विकण्यासाठी दोघे जण फिरताना दिसले.मी आवडीने ते पाहू लागलो. ते म्हणाले,"सर, नांदेडला एक महान चित्रकार आहेत दिवेकर नावाचे ! आम्ही बुद्धविहार बांधकामासाठी देणगी मागण्यांसाठी त्यांच्याकडे गेलो.त्यांनी ह्या फोटो आम्हाला दिल्या, ह्यांच्या प्रिंट काढून समाज बांधवाकडे गेल्यास सहज देणग्या मिळतील,असा सल्ला दिला. आणि खरंच भरपूर सहकार्य मिळत आहे."
प्रा.दिवेकर सरांचा असा हा मोठेपणा ! एरव्ही चित्रं विकून कमाई करणारे चित्रकार कोठे आणि प्रा.दिवेकर सर कुठे.!
तो फोटो मी आजही जपून ठेवला आहे,तो माझ्यासाठी अनमोल ठेवाच आहे.
त्यांच्या अचानक जाण्यानं एक सोन्यासारखा मित्र,मार्गदर्शक कलेच्या क्षेत्रातून हिरावला गेलाय,हे नक्की !
असा माणूस पुन्हा होणे नाही,त्यांना विनम्र आदरांजली !
- मधुकर पवार




No comments:
Post a Comment