किनवट :
स्त्री संस्काराचा आणि सृजनाचा आविष्कार आहे. मुळातच महिलांमध्ये निसर्गाकडून काही देणग्या पुरुषांपेक्षा जास्त आहेत. स्त्रीमध्ये सहनशीलता, नावीन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गतःच अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे; कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे. लैगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणे, तसेच सामाजिक, घरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजना करणे, त्याचबरोबर महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन प्राचार्या शुभांगी ठमके यांनी केले.
सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक व उच माध्यमिक विद्यालय, सुभाषनगर, किनवट येथे पोलिस स्थापना दिनानिमित्त आयोजित ' महिला व वाहतूक सुरक्षा कार्यक्रमात ' प्रमुख मार्गदर्शिका म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस निरीक्षक मारोती थोरात, केंद्र प्रमुख रमेश राठोड, उत्तम कानिंदे, प्राचार्या संगीता राठोड, ज्योती शेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. गोमा चव्हाण यांनी प्रास्ताविक व सुनिल निकम यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश राठोड यांनी आभार मानले.
यावेळी बोलतांना ज्योती शेरे म्हणाल्या की, 'जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. तीन ‘प’ अर्थात पिता, पती आणि पुत्र यांच्या आदेशाने आणि बंधनाने ती आपले आयुष्य काढते आहे. अगदी कामकाजी, व्यवसायी, नोकरदार महिलांशी चर्चा केली असता त्यादेखील स्वतःला सक्षम मानत नाहीत. त्यांच्या दृष्टीने महिला सबलीकरण म्हणजे फक्त कार्यक्रम, व्याख्यान आहे; पण तसे न होता वास्तविकतेत महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य देणे गरजेचं आहे. '
याप्रसंगी केंद्र प्रमुख रमेश राठोड व उत्तम कानिंदे यांनी महिला सुरक्षा आणि पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांनी वाहतूक सुरक्षा या विषयावर विस्तृत माहिती दिली. महिला पोलिसांनी स्वतःचे संपर्क क्रमांक मुलींना देऊन संकटकाळी आवाज देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता तोरणेकर, माया देवराव, मायावती देवतळे, छाया रिठे, सुनिता माजळकर, सुनिता राठोड, बळीराम राठोड, शोभा शिंदे, काशीनाथ आडे आदिनी पुढाकार घेतला.







No comments:
Post a Comment