नांदेड :
शाळा हे मुलांवर शिक्षणासह योग्य संस्कार रुजविणारे केंद्र असून संस्थाचालकांनी व मुख्याध्यापकांनी शाळेचा लौकीक वाढविण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवावेत. मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यावा, तसेच कॉपीमुक्ती अभियानासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने 10 वी व 12 वी परीक्षा कॉपीमुक्त अभियान 2020 व बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा 2012 या विषयावर आज शुक्रवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात नांदेड जिल्हयातील सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक व परीक्षा केंद्र संचालक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे उप महापौर सतिश देशमुख, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर आदींची मंचावर उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, शाळास्तरावर शिक्षकांनी मुलांचा पाया पक्का करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली तरच विद्यार्थी गुणवंत होतील. कॉपी मुक्ती अभियानात मुलांसह त्यांच्या पालकांनीही सहभाग घेणे आवश्यक आहे. बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यासंदर्भात श्री डोंगरे म्हणाले की, नांदेड जिल्हयातील तीन शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यीनींवर झालेला अत्याचार ही दूदैवी घटना आहे. शिक्षकांचा पालकांमध्ये विश्वास निर्माण करावयाचा असेल तर अशा घटना शाळेत घडू नयेत यासाठी संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी कठोर पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण विभागाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा बुके देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे बैठकीत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांवर परीक्षांचे दडपण असते. त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी शिक्षकांनीही मार्गदर्शन करावे. शाळास्तरावर सराव परीक्षा घेण्यात याव्यात. ज्या मुलांच्या सराव परिक्षेत काही प्रश्नांची उत्तरे चुकले असतील तर त्यांना समजावून सांगावे. विद्यार्थ्यांनी परिक्षेच्या काळात रात्री जागरण करु नये. तसेच शांतपणे परीक्षेला सामोरे जावे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होवू नये यासाठी केंद्र संचालकांनी सुरुवातीपासूनच पायबंद घालावा. प्रत्येक परीक्षा केंद्रात कॉपी दाखवा दहा हजार रुपये विळवा हा उपक्रम राबवावा. असे झाल्यास मोठ्या प्रमाणावर कॉपीला आळा बसेल. ज्या केंद्रावर कॉपी झालीच नाही अशा केंद्राचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. शालेयस्तरावर मुलींना सक्षम करण्यासाठी यापूर्वी स्मार्ट गर्ल्सचे प्रशिक्षण शाळेतील महिला शिक्षीकांना देण्यात आले आहे. त्यांनी मुलींशी नियमित संवाद साधणे आवश्यक आहे. दर शनिवार किमान एक तास मुलींसाठी कराटे प्रशिक्षण देण्यात यावे असेही ते म्हणाले.
या बैठकीत जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शाळास्तरावर मुली व बालकांवर अत्याचारासारखे प्रकार हे अत्यंत गंभीर आहेत. अशा घटनांमुळे शाळांवरचा पालकांचा विश्वास उडत चालला आहे. यासाठी सर्व शैक्षणीक संस्थेत विशाखा समितीची स्थापना करणे आवश्यक आहे. शाळेतील महिला कर्मचारी, शिक्षिका व विद्यार्थींनींच्या असणाऱ्या तक्रारींवर चर्चा करुन निर्णय घेणे हे या समितीचे कार्य आहे. परंतू अशा समित्या शाळास्तरावर दिसून येत नाहीत. तसेच पोलिस विभागातर्फे पोलीस दिदी उपक्रम चालविण्यात येतो. यात महिला पोलीस कर्मचारी शाळेत येवून मुलींशी संवाद साधतात. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवितात. एखाद्या मुलीस शाळेत कुणी त्रास देत असेल तर पोलीस दिदी मार्फत त्याच्यावर कारवाई केली जाईल. शाळेत आमच्या पोलीस दिदी आल्या तर मुख्याध्यापकांनी त्यांना वेळ देणे आवश्यक आहे. आपण शाळेतील जबाबदार घटक आहोत. अशा कोणत्याही घटना आपल्या शाळेत घडणार नाहीत यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी उप महापौर सतिश देशमुख, उप शिक्षणाधिकारी माधव सलगर, अतिरिक्त पोलीस अधिकारी कोलते, मुख्याध्यापक प्रतिनिधी एल.के. भगत, संस्थाचालक अवधूत क्षीरसागर, विस्तार अधिकारी एस.आर. आळंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी बी.आर. कुंडगीर यांनी केले. विस्तार अधिकारी प्रविणा मांदळे यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला जिल्हयातील सुमारे सातशे संस्थाचालक, प्राचार्य, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, परीक्षा केंद्र संचालक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हनूमंत पोकळे, अनित लिंबकर व माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची पुढाकार घेतला.
इयत्ता बारावीच्या परिक्षा 18 फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परिक्षा 3 मार्चपासून घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेसाठी एकूण 82 केंद्रावरुन परिक्षा घेतल्या जाणार असून 38 हजार 711 विद्यार्थी बारावीची परिक्षा देणार आहेत. तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेसाठी एकूण 157 केंद्र स्थापन करण्यात आली असून यासाठी 50 हजार 772 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. यासाठी जिल्हयात 37 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात 157 बैठे पथकाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हयातील परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या प्रत्येक परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी 5 पोलीस कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे.






No comments:
Post a Comment