रंगाचा दुनियेचा किमयागार रणजीत वर्मा ! - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, March 16, 2026

रंगाचा दुनियेचा किमयागार रणजीत वर्मा !

 



मुंबई येथील जहांगीर कलादालनात तारीख १६ मार्च २०२६ ते २२ मार्च २०२६ कालावधीत चित्रकार रणजीत वर्मा यांचे "ग्वाला " चित्रप्रदर्शन होत आहे. त्यानिमित्ताने स्तंभलेखक यादवपुत्र रमेश मुनेश्वर यांचा लेख देत आहोत -संपादक



"शब्दांना जिथे मर्यादा येतात, तिथे रेषा आणि रंग बोलू लागतात..."

       एका कोऱ्या पांढऱ्या कागदावर जेव्हा एखादा चित्रकार आपला ब्रश फिरवतो, तेव्हा तिथे केवळ रंग उमटत नाहीत, तर एक नवीन जग जन्माला येते. चित्रकार हा निसर्गाचा सर्वात जवळचा मित्र असतो. कवी आपल्या शब्दांतून भावना मांडतो, गायक सुरांतून मन जिंकतो, पण चित्रकार आपल्या मूक चित्रातून हजारो शब्दांचा अर्थ समजावून सांगतो.

       चित्रकाराकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी असते. त्याला पावसाच्या थेंबात संगीत दिसते आणि मावळत्या सूर्याच्या केशरी रंगात एक नवी आशा दिसते. निसर्गातील प्रत्येक रंग तो आपल्या पॅलेटवर उतरवतो. कधी डोंगरांच्या रांगा, कधी खळाळणारी नदी, तर कधी झाडावरून पडणारे वाळलेले पान; चित्रकार या साध्या गोष्टींनाही आपल्या कलेने 'अजरामर' करतो. चित्रकला ही केवळ रेषांची ओढाओढी नाही, तर ती मनाची अभिव्यक्ती आहे. एखाद्या गरीबाच्या डोळ्यांतील अश्रू असोत वा खेळणाऱ्या लहान मुलाचा निरागस आनंद, चित्रकार ते हुबेहूब कॅनव्हासवर उतरवतो. म्हणूनच म्हणतात की, "एक चांगले चित्र हजार शब्दांच्या बरोबर असते." असा रंगाचा जादूगार रणजीत वर्मा यांचे नाव घेता येईल.

      महाराष्ट्रातील देविच्या साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगड येथे रणजीत दत्त वर्मा यांचा जन्म झाला. वड़ील दत्त वर्मा हे उत्कृष्ठ सुलेखनकार तथा चित्रकार असल्याने बालपणापासूनच वडीलोपार्जीत कला त्यांच्यात रुजत गेली. .  माहूरची सांस्कृतिक परंपरा पुढे नेणारे वर्मा है प्रसिद्ध चित्रकार आहेत. प्रारंभिक शिक्षण माहूर येथे तर कलेचे शिक्षण चित्रकला महाविद्यालय, नांदेड येथे झाले. कलावंत असो की सर्व सामान्य माणूस दैनंदिन जगणे जगत असतांना आपआपल्या परीने भवतालाचं कळत नकळत निरीक्षण करीत असतो. या निरीक्षणाचे ठसे त्याच्या मनावर उमटत असतात, साठत जातात त्यावर प्रत्येक जण आप आपल्या परीने विचार करतो.

        वर्मा यांनी "ग्वाला" शिर्षकांतर्गत चित्रमाला तयार केली असून ती ग्वाला या व्यक्तिरेखे भोवती फिरत असते. आजुबाजूच्या गवळी लोकांमध्ये श्रीकृष्णाची प्रेम प्रतिमा अनुभवायला मिळते. शेवटी कृष्ण ज्या संस्कृती मधून आला ती संस्कृती दूध-दूभत्याने भरलेली होती आज ती आजतागायत टिकून आहे. विविध विषय, भाव-भावनांचा आविष्कार, सामाजिक आशय, सौंदर्य शास्त्र त्यांच्या चित्रशैली मधून साकारत कलात्मक आणि कल्पकतेचा आविष्कार मुंबईकर रसिकांना या निमीत्ताने अनुभवता येणार आहे.. जहांगीर कलादालनात होणाऱ्या ग्वाला या चित्रप्रदर्शनातून १६ मार्च २०२६ ते २२ मार्च २०२६ कालावधीत.

       रणजीत वर्मा यांच्या चित्राविषयी सांगायचे झाल्यास त्यांची चित्रे बोलकी वाटतात, रसिकांशी संवाद साधतात चित्र पाहतांना रसिकास ध्वनी प्रतीध्वनीचा भास होतो. त्यांची सर्वच चित्रे भडक रंगांचा वापर करून रंगवलेली असतात. मूळ रंगांमध्ये इतर कुठल्याही रंगांचे मिश्रण त्यात नसते त्यामुळे रंगांचा ताजेपणा कायम राहतो. विशेष बाब म्हणजे या रंगसंयोजनामध्ये काळ्यारंगांचा वापर आपणास दिसून येत नाही. कुठलीही सीमा रेषा न वापरता ते चित्र पूर्ण करतात, त्यांची चित्रे पूर्णतः अर्धवास्तववादी असतात वर्मा यांच्या चित्रात मानवी मनाचे, विचारांचे, वेदना आणि संवेदनेचे भावविश्व मनाचा वेध घेतात. त्यांची चिचे खरे वाटतात पण त्यात काही काल्पनिक शैलीबद्ध बदल असतात.

       कलावंत अभिव्यक्तीच्या मार्गावरची एक आनंददायी निर्मिती प्रक्रीया अनुभवत असतो; थोडक्यात कलाकृती म्हणजे कलावंताने विशीष्ठ साधनांद्वारे विशीष्ठ माध्यमातून घडविलेली एक नाविण्यपूर्ण अशी अनुभवाकृती असते असे म्हणता येईल. आपल्यातील कलागुणांची केलेली साधना साधक रणजीत दत्त वर्मा यांना सर्वांपासून वेगळे करते म्हणूनच माहूरच्या मातीचा गंध जहांगीर कला दालनात दरवळणार हे निश्चित. खेड्यातील गल्ली ते जहांगीर कला दालन मुंबई पर्यंतचा विश्वासी संवाद साधणारा त्यांचा प्रतिभावंत कला प्रवासास अनेक शुभेच्छा..! चित्रकार हा जगाला अधिक सुंदर आणि रंगीत बनवण्याचे काम करतो. तो आपल्याला शांतता आणि आनंदाचा संदेश देतो. रंगांच्या या दुनियेत रमणारा हा कलाकार खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा असतो. अशा या कुंचल्याच्या किमयागाराला माझा मानाचा सलाम !


-यादवपुत्र रमेश मुनेश्वर

(राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा बालभारती सदस्य)

किनवट / नांदेड, संवाद : ७५८८४२४७३५

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News