किनवट :
आदिवासींसाठी असलेल्या घरकुल योजनेतील शबरी आदिवासी घरकुल योजनेचे २०१९ - २० चे उद्दीष्ट वाढवून देण्याची मागणी किनवट विधानसभा मतदार संघाचेे आमदार भिमराव केराम यांनी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामिण गृहनिर्माणचे संचालक यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.
आदिवासी बहूल व नक्षलप्रवण भाग म्हणून प्रचलित असलेला,किनवट व माहूर तालुक्याचा समावेश असलेला किनवट विधानसभा मतदारसंघ भौगोलिक दृष्ट्या मोठ्या डोंगरदरीत वसलेला आहे. येथील बहुसंख्य आदिवासी बांधव मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे प्रत्येकाला स्वत:च्या हक्काचा निवारा असण्याचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळे सर्वांसाठी घरे २०२२ या शासनाच्या प्रभावी उपक्रमाची अंमलबजावणी करताना मात्र आदिवासी बहूल किनवट व माहूर तालुक्याला सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचेच दिसून येत आहे.
विशेषत: किनवट विधानसभा मतदार संघातील सन २०११ च्या जनगणनेनुसार येथील आदिवासींची लोकसंख्या सुमारे ८६ हजार सातशे दोन ऐवढी असताना गतवर्षी संपुर्ण नांदेड जिल्ह्यातील एकूण १६ तालुक्यांसाठी आदिवासींसाठी केवळ १७३ घरकुल मंजूर करण्यात आले होते. ही नगण्य संख्या आदिवासींची केवळ मस्करीच नव्हे तर क्रूर चेष्टा होती. त्यामुळे अनेक गरीब व बेघर असलेले आदिवासी बांधव आजही घरकुलापासूव वंचित असून डोंगर दरीत आपल्या मुलाबाळांसह कसोशीने जीवनमान जगत आहेत. त्यामुळे किमान शासन योजनेतून त्यांना हक्काचा निवारा प्राप्त होवून त्यांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनेे त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी किनवट व माहूर तालुक्यातील आदिवासींसाठी शबरी आदिवासी घरकुल योजनेतून सन २०१९-२० साठी किमान ५ हजार घरकुलांचेे सुधारीत उद्दिष्ट देण्याची मागणी किनवट व माहूर चेे आमदार भिमराव केराम यांनी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामिण गृहनिर्माण विभाग मुंबई यांचेकडे लेखी पत्र देवून मागणी केली आहेे.




No comments:
Post a Comment