कोरोनाला रोखण्यास ' जनता कर्फ्यू ' पाळावा ; यासाठी सर्वांनी आपापल्या घरीच रहावे -सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Saturday, March 21, 2020

कोरोनाला रोखण्यास ' जनता कर्फ्यू ' पाळावा ; यासाठी सर्वांनी आपापल्या घरीच रहावे -सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल



किनवट  :
प्रचंड वेगाने जगभरात कोरोना पोहोचत असला तरी त्याला वेळीच रोखणे हे आपल्या हाती आहे. केंद्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिलेल्या आदेशान्वये सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्याचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना विषाणूचा  प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सध्या शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, शिकवणी वर्ग व अभ्यासिका यांना सुटी देण्यात आलेली आहे. आठवडे बाजार बंद केले आहेत. अत्यावश्यक सुविधा औषधी, अन्नधान्य व किराणा दुकाना शिवाय इतर सर्व आस्थापना बंद करण्यात आलेल्या आहेत. यात ईतर सर्वच दुकानासह बिअर बार, दारू दुकाने, पानटपरी यांचाही समावेश आहे. हा विषाणू खोकला वा शिंकतांना थुंकीच्यावाटे बाधीताकडून संक्रमित होतो. तेव्हा नाकाला रूमाल लावावा. दोन व्यक्तीत दीड मीटरच्यावर अंतर ठेवावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, घरीच राहून कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दोन दिवस कडकडीत बंद पाळावा. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी ( दि. 22 ) सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत सर्वांनी ' जनता कर्फ्यू ' पाळायचा आहे. यासाठी सर्वांनी आपापल्या घरीच रहावे असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
           किनवट उपविभागा अंतर्गत किनवट व माहूर तालुक्यात कोरोणा विषाणू प्रतिबंधक उपाय योजने अंतर्गत केलेल्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शनिवारी ( दि. 21 ) दुपारी बारा वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार नरेंद्र देशमुख, मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य डॉ.अशोक बेलखोडे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, पोलीस निरीक्षक मारोती थोरात, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल, डॉ. किरणकुमार वाघमारे, डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिरीश पत्की आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            पुढे बोलताना गोयल म्हणाले, किनवट येथील नवीन तहसील कार्यालयात  व माहूर येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रत्येकी 50 खाटांचा विलगीकरण कक्ष स्थापीत केला आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय किनवट येथे 15 बेड व साने गुरुजी रुग्णालय येथे 5 बेड आणि ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 20 बेडचा अलगीकरण कक्ष कार्यान्वित केले आहेत. बसस्थानक व रेल्वे स्टेशन येथे प्रवाशांच्या तपासणी करिता वैद्यकीय पथक तैनात केले आहेत.
            मागील दोन दिवसापासून दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावातील घरोघरी जाऊन ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलिस पाटील यांनी सर्वेक्षण करून कुटुंबात प्रवासातून आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची माहिती आरोग्य विभागाकडे सादर केली आहे.आवश्यकतेनुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. काही लक्षणे आढळून आल्यास त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जास्त संसर्ग झालेल्या बारा देशातून कोणी आल्यास त्यांच्या हातावर होम कोरोन्टाईनचा  शिक्का मारून त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना घरीच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात गर्दी जमू नये यासाठी औषध, अन्न व किराणा  यासारखी दुकाने सुरू ठेवून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याकरिता आम्ही स्वतः काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरात फिरून बंदचा आढावा घेत आहे. महामारीसारखा प्रसंग उद् भवू नये म्हणून आपण स्वतःच कुठेही न जाता घरी च राहून स्वतःची काळजी घेतली पाहिजे. म्हणून गर्दी टाळा, जीव सांभाळा, या उक्तीचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. कोरोणाच्या अनुषंगाने तक्रार निवारणासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे " तक्रार निवारण व माहिती जनसंपर्क कक्ष " स्थापन करण्यात आला असून त्याचे नोडल अधिकारी हे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक असून त्यांचा संपर्क क्रमांक 02469-221697 हा आहे. कोरोनाच्या अनुषंगाने कोणत्याही बाबींचं येथे निराकरण करून घ्यावे. कोणीही अफवा पसरवू नयेत, चुकीचे संदेश पसरवू नयेत किंवा खोटे संदेश देऊ नयेत, असे आढळून आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            याप्रसंगी मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य डॉ.अशोक बेलखोडे यांनी प्रशासनाच्या नियोजनाची प्रशंसा केली व काही बाबीं निदर्शनास आणून दिल्या. नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, पोलीस निरीक्षक मारोती थोरात, पालिकेचे मुख्याधिकारी निलेश सुंकावार यांनी कोरोनाच्या अनुषंगाने योजलेल्या बाबींची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News