नांदेड :
महिला व बाल विकास विभागा .च्या पोषण अभियानांतर्गत दूर्गा बाल गणेश उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये गरोदर महिलांचे अपेक्षित वजनवाढ होणे, त्यांनी लोहयुक्त, फॉलिक अॅसिड गोळयांचे सेवन करणे, गरोदर महिलांच्या हिमोग्लोबिन प्रमाणामध्ये वाढ होणे, नोंदणीकृत गरोदर महिलांच्या कमीत कमी चार आरोग्य तपासण्या करणे याकरीता दैनंदिनरित्या अंगणवाडी सेवांच्याद्वारे उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वर ;तीने नांदेड जिल्हयात दूर्गा बाल गणेश उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाव्दारे लोकचळवळ निर्माण होऊन माता व नवजात मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यास सहाय्यभूत ठरले. त्यामुळे हा उपक्रम नांदेड पॅटर्न म्हणून राज्यात राबविला जाणार आहे. या आशयाचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाने काढल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, एकात्मिक बाल विकास विभाग व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्हयात दूर्गा बाल गणेश उपक्रम राबविण्यात आला. यात अंगणवाडी कार्यक्षेत्रातील गरोदर महिलांसाठी मध्यान्ह भोजन उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात सहा महिना ते एक वर्षाच्या कालावधीमध्ये गरोदर महिलांच्या वजनामध्ये अपेक्षित वाढ झाल्याचे दिसून आले. गरोदर महिलांनी अंगत पंगत झाल्यानंतर नियमितरित्या लोहयुक्त गोळयांचे सेवन केल्याने त्यांच्या हिमोग्लेबिनच्या प्रमाणामध्ये देखील अपेक्षित वाढ दिसून आली. तसेच अंगत-पंगतच्या निमित्ताने दैनंदीन संपर्कात राहिल्याने गरोदर महिलांच्या गरोदर कालावधी दरम्यानच्या आवश्यक असणाऱ्या चार आरोग्य तपासण्या करुन घेण्यामध्ये यश आले. अंगत-पंगत उपक्रमामुळे अप्रत्यक्षरित्या गरोदर महिलांच्या संबंधीत सर्व निर्देशकांची काळजी घेतल्याने याचा सकारात्मक परिणाम होऊन जन्मत: कमी वजनांच्या बालकांच्या प्रमाणामध्ये लक्षणिय घट झाल्याचे दिसून आले. हा उपक्रम नांदेड जिल्हयात राबविल्यामुळे याचे सकारात्मक परिणाम कुपोषण प्रतिबंध करण्यास तसेच माता मृत्युचे प्रमाण, नवजात व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करण्यास सहाय्यभूत ठरले आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तत्कालिन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.शिंगणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका़ यांनी अंगणवाडी बिट अंतर्गत भेटी देऊन पाहणी केली. त्यामुळे हा उपक्रम नित्यनियमाने सुरु राहून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.
या प्रभावी उपक्रमाची शासनाने दखल घेऊन आता हा नांदेड पॅटर्न राज्यात लागू झाला आहे. दिनांक 6 मार्च 2020 रोजी महिला व बाल विकास विभागांतर्गत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानूसार गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांच्याकरीता अंगणवाडीस्तरावर यशोदामाता अंगत-पंगत उपक्रम राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कुठल्याही प्रकारचा वित्तीय भार येणार नसल्याने प्रस्तुत उपक्रम सर्व जिल्हयामध्ये बिट निहाय, प्रकल्प निहाय टप्प्या-टप्प्याने राबविण्याचे नियोजन सर्व जिल्हा प्रशासनाने राबविण्याचे आवाहन या शासन निर्णयात करण्यात आले आहे. नांदेड जिल्हयाने राबविलेला हा उपक्रम राज्यात नांदेड पॅटर्न म्हणून जशास तसा लागू केल्यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकारी, महिला व बालविकास, एकात्मिक बालविकास व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती व अंगणवाडी मदतनिस यांनी आनंद व्यक्त केला आहे.




No comments:
Post a Comment