नांदेड : आकाशवाणीचा परिपाठ असणाऱ्या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात शेवटी, 'मंडळी... मी भीमराव शेळके, आता तुमचा निरोप घेत आहे... पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात..', या अंगवळणी पडलेल्या निवेदनांची आज अखेर झाली. अवघे ६२ वर्षाचे आयुर्मान असताना आकाशवाणीचे माजी सह केंद्र संचालक भीमराव शेळके यांनी जीवनपटाच्या कार्यक्रमातूनच आज अखेर खराखुरा निरोप घेतला.
नांदेड येथे गोवर्धन घाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ सुपुत्र अनुराग शेळके यांनी त्यांच्या चितेला भडाग्नी दिला.
दिनांक २१ रोजी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात सकाळी ११ वाजता उपचार सुरू असताना भीमराव शेळके यांचे निधन झाले होते. नांदेड आकाशवाणी लोकप्रिय करणाऱ्या भीमराव शेळके यांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या, आकाशवाणी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून शोकसंदेश धो-धो कोसळत राहिले.
भीमराव शेळके यांच्या निधनाने सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि धम्मचळवळीची मोठी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी नोंदवल्या.
प्रा. ऋषिकेश कांबळे
भीमरावजींनी सामान्यातला सामान्य आकाशवाणीशी जोडला होता. कुठलाही बडेजाव नाही, पोझ नाही, सर्व प्रकारच्या भिंती गाडून निखळ माणूसपणाचं निर्लेप तेज त्यांच्या वागण्यातून लखखायचं. एक अंतर्बाह्य खळाळता झरा म्हणजे भीमराव शेळके', अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विचारवंत समीक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी दिली.
प्रा. डॉ. जगदीश कदम
मित्र म्हणून व माणूस म्हणूनही भीमराव शेळके खूप मोठे होते. सहवासात आलेल्यांवर त्यांनी भरभरुन प्रेम केले. त्यामुळे त्यांचे जाणे सगळ्यांनाच चटका लावून जाणारे आहे. आपली वैयक्तिक मोठी हानी झाली आहे.
देविदास फुलारी
भीमराव शेळके एक प्रयोगशील अधिकारी होते. आमचा संवाद हा दोन्ही बाजूंनी 'दादा' याच आदराने होत असे. नांदेड आकाशवाणीला लोकाभिमुख करणारा कार्यक्रम अधिकारी म्हणून ते नांदेडकर आणि आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या चिरंतन स्मरणात राहतील.
विश्वास वाघमारे
नांदेड आकाशवाणीचे केंद्र अधिकारी विश्वास वाघमारे यांनी भीमराव शेळके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आकाशवाणीत रुजू झाल्यानंतर नांदेड येथे शेळके साहेबांच्या मार्गदर्शनात खूप काही शिकायला मिळाले. आकाशवाणीची कार्यप्रणाली, प्रसारण व प्रशासन या बाबतीत अनेक बारीक-सारीक गोष्टी भीमराव शेळके सरांनी खूपच आपुलकीने शिकवल्या.
विलास ढवळे
भीमराव शेळके सर गेल्याचे वृत्त विकास कदम च्या फेसबुक वॉलवर दिसलं .सगळ्यांच्या दुःख प्रसंगात अगदी घरच्यासारखा धावून जाणारा विकास आज पार कोलमडला होता. त्याचे शब्द वाचताना मला गहिवर दाटून आला .त्याला फोन करून डिटेल्स विचारण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही म्हणून मिलिंदला बोललो.घडलेलं हे खरंच होतं.
" चला तर मंडळी तुमचा निरोप घेत आहे अखेरचा- तुमचा भीमराव शेळके दुपारी तीन वाजता".
विकास च्या वॉल वरील ही वाक्ये वाचताना पूर्ण अवसान गळून गेलं. शरीर शक्तीक्षयानं मलूल पडलं आहे असा भास होत राहिला.
मी खिन्न झालो .अचानक ही सरांची एक्झिट !!
आयुष्यभर ज्या माणसाने एकेक करीत माणसं उभी केली. विकास, मिलिंद ,बबन ,गौतम ,कितीतरी मानसपुत्र यांना होती .एवढ्या मनाच्या श्रीमंत माणसाची ही अखेर फार चटका लावून गेली .पाऊस
काळ मला निरंतर अशाच वेदना देत आला आहे .या पाऊसकाळी सर गेले. आकाशवाणीत सरांची भेट झालेल्यालाही तीस वर्षे उलटून गेली. त्यानंतर मागे लॉकडाऊन आधी मार्चमध्ये सर भेटले .जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात मेडिकल ऑफिसर साठी त्यांच्या कन्येनं अर्ज केला होता .त्याबद्दल विचारपूस करण्यासाठी दोघे आले होते .मी ,मिलिंद आणि सर आम्ही मनसोक्त बोलत राहिलो.खूप गप्पा झाल्या.
डोळ्यांमध्ये निरागस, स्वच्छ भाव, चेहरा हसरा ,स्वभावातील मृदुपणा हे त्यांचे गुणविशेष. त्यांच्या चेहऱ्यावर मला माझ्या मामाची झाक दिसायची. म्हणून ते भेटले की अाजोळ गवसल्याचा समाधान व्हायचं . त्यांना कितीकदा तसे म्हणालोही .
माझ्या ऑफिसमधली ती शेवटची भेट ठरली त्यांची .
अशी काही माणसं आपल्या आयुष्यात असतात ते तुटून गेली की आपण केवळ नीरव पोकळ उरतो. त्यातले सर होते.
शेळके सर गेले. झाडावरचे आम्ही सारेच पक्षी दीनवाणी आणि असहाय्य झालो आहोत.
कुणी कुठेही जावं तर निरोप द्यावा. निरोप घ्यावा. निरोपाविना जाणं मला कधी रुचलेच नाही .अगदी आपल्या जवळचे कोणी गावी जात असेल तर गाडीत बसून गाडी हलेपर्यंत तिथून माघारी वळावे वाटत नाही. गाडी दूर गेल्यानंतरही गाडीच्या खिडकीतून दिसणारा अस्पष्टसा हात नजरेआड झाला की मन अमळ अस्वस्थ घेऊन परततोत. निरोप दिल्या घेतल्याचं एक समाधान असतं. तसा निरोप द्यायची संधी नियती का बरं देत नाही हो सर. एकदा कडकडून मिठी मारावी तुम्हाला आणि तुम्ही म्हणावं- विलास, विकास ,मिलिंद, गौतम .,
असं म्हणून का बरं गेला नाहीत. निरोप न देताच जाण्याची किती मोठी जखम होते अंतर्मनात .
माझी आई गेली ,आत्या गेली, मामा (सासरे) गेले ,आता तुम्ही !!
हे क्रूर नियंत्या ,कधी थांबवणार रे बाबा हा खेळ.....
-विलास ढवळे नांदेड




No comments:
Post a Comment