लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती ते महाकवी वामनदादा कर्डक जयंती १ ते १५ ऑगष्ट या कालावधीत क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या विशेष उपक्रमात महेंद्र नरवाडे लिखित 'प्रबोधन चळवळीत कवी, गायक व शाहिरांचे योगदान... ' ही लेखमाला देत आहोत. प्रसिद्ध संगीतकार प्रज्ञाचक्षू गायक अनिल बाबाराव उमरे यांचा आज वाढ दिवस आहे. यानिमित्त त्यांच्या प्रबोधन चळवळीतील योगदानाची ओळख सर्वांना करून त्यांचा वाढदिवस ऑनलाईन साजरा करीत आहोत.
(भाग - ११ ),
-संपादक
प्रसिद्ध संगीतकार प्रज्ञाचक्षू गायक अनिल बाबाराव उमरे यांचा जन्म १२ ऑगष्ट १९८८ रोजी किनवट तालुक्यातील सिंदगी (मोहपुर) या डोंगरी दुर्गम गावात झाला. बोधडी (बुद्रूक ) येथील अंध विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. संगीतातील संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली. लहाणपणीच त्यांना संगीत कला अवगत झाल्याने याच आवडीच्या क्षेत्रात आपले करीअर घडवण्याचा निश्चय त्यांनी केला. अंध विद्यालयात शिक्षण घेतांना त्यांचे गुरु संगीतातील राज समजले जाणारे पंडित वसंत महादेव शिरभाते यांचे तसेच राजेश गजानन ठाकरे, तबला उस्ताद दत्ता नारायण पांचाळ यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. दोन्ही डोळ्यांच्या दृष्टींनी सृष्टी पाहता येत नाही ; परंतु ते संगीताचे इलेक्ट्रॉनिक उपकरण स्वतः दुरुस्त करतात. इलेक्ट्रीक जोडारीची डागणी असो अथवा आय सी बदलणे असो ते सहज करतात. असे हे प्रज्ञाचक्षु गायक कलावंत आहेत. हार्मोनियम, तंतुवाद्य, तबला, ढोलक, मृदंग, सिंथोसायझर असे अनेक वाद्य ते भन्नाट वाजवतात. त्यांना शास्त्रीयगायन कलेची परिपुर्ण जाण आहे म्हणून त्यांना शास्त्रीय गायक म्हणता येईल. कोणत्याही गाण्याला ते चपखल संगीत देऊ शकतात असे ते संगीत तज्ज्ञ आहेत. उपविभाग किनवटच्या कोरोना नियंत्रण कक्ष अंतर्गत शासनाच्या जनजागृती कक्षातील कलावंतांच्या कोरोना जनजागृती गीतांना नुकतेच त्यांनी संगीत दिले आहे. ती गीते आकाशवाणी व दुरदर्शनसह अनेक वाहिण्यावरून प्रसारीत झालीत. ते संगीतही शिकवतात.
त्यांच्या पत्नी प्रज्ञाचक्षू लता अनिल उमरे ह्या सुद्धा संगीत विशारद आहेत. त्याही गीत गाण्यासाठी स्वत:सोबत राहुन साथ देतात. त्यांची मुलं ही संगीत शिकत आहेत. किनवट माहुर परीसरात अनेक ठिकाणी जयंती सोहळा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरीनिर्वाण दिन, धम्म परीषद, मेळावे यांमध्ये तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, माता रमाई, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गीतं सादर करुन त्यांनी जनप्रबोधन केले. भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखा किनवट तर्फे आयोजित बौद्धधम्म परिषदेत राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी स्टेज कार्यक्रम करून प्रबोधन केले. त्यावेळी ताईंना त्यांचा गौरव केला होता. तसेच 'किनवट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी सहा डिसेंबरला 'गाणे निळ्या नभाचे' या अभिवादन गीताच्या कार्यक्रमास ते संगीत देतात व गीतगायनही करतात. माहुरलाही त्यांनी अनेक कार्यक्रम केले. संगीत साथ देण्यासाठी त्यांच्या सोबत रामा शिवाजी काळे मराठवाडा संगीत रत्न, संगीत व गायनासाठी. तबला-संजय आणेराव, हार्मोनियम-प्रदिप नरवाडे हे संचात त्यांच्या सोबत असतात. महाराष्ट्र, गुजरात,राजस्थान, आंध्रप्रदेश व कर्नाटकला ही त्यांचे कार्यक्रम झाले.
त्यांच्या आवाजामध्ये रसिकांना खिळवून ठेवण्याची जादू व संगीतातील तालावर डोलायला लावण्याची ताकत आहे.आनेक ठिकाणी रसिकांनी त्यांना भरभरून बक्षीसं दिली. तसेच या कलेमुळेच त्यांना चर्चच्या माध्यमातुन इस्राईलला जाता आलं. या शिवाय भावगीते,भजनं, चित्रपट गीतं अशी सर्व प्रकारची क्लासिकल गीतं ते सादर करतात. सर्व जातीधर्माच्या लग्न विधी प्रसंगी मंगलाष्टके व मनोरंजन गीतं सादर करतात.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या सोबत त्यांचा सामना झाला. एका गीतगायन स्पर्धेत पद्मजा जोगळीकर ह्या जज होत्या त्यांच्या समोर गीत गायन केले.
विशेष आठवण-
गायक अनिल उमरे यांच्या गीत गायनावर खुश होऊन एक ख्रीश्चन ग्रस्त संगीत प्रेमी किजिओ जोशीवा यांनी दोन इन्स्ट्रुमेंट ऑर्गन व ऍक्टोपॅड बक्षीस म्हणुन दिले. हे गृहस्त आजही आठवण आली की फोनवर त्यांचे गीतं ऐकतात. तसेच प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात अनिल जींच्या बोटांची जादू पाहून त्यांच्या संगीतावर बेहद खूश होऊन एक किबोर्ड त्यांना भेट दिला .
मनपसंत गीते-
१)भीमरावानी देवावरची प्रेम अलौकिक केले.
२)धम्म दीप हा मानवतेचा.
३)भीमराया घे तुला लेकराची वंदना.
४) जनसागर रडला होता,आकाशही रडले होते.
५)भीमरावा घरी नादाया आली रमा.
अशा प्रकारची एकापेक्षा एक सरस बुद्ध भीम गीतं गाऊन समाज प्रबोधन करतात.
पुरस्कार-
मराठवाडा संगीतरत्न पुरस्कार-परभणी .
संदेश-
समाज व्यसनापासून व अंधश्रद्धेपासून दूर रहावा. समाज एकसंघ व्हावा आपल्या महापुरुषांच्या विचाराने चालावा असा मोलाचा सल्ला ते प्रबोधन करतांना समाजाला देतात.
गायक अनिल उमरे या गुणी कलावंताला एखाद्या शाळेत संगीत शिकवण्याची संधी मिळावी ही मंगलकामना करुन त्यांच्या संगीत क्षेत्रातील व प्रबोधन चळवळीतील वाटचालीस मनापासून हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद.
-आयु.महेंद्र नरवाडे, किनवट
जि.नांदेड.
मो.न.९४२१७६८६५०.





No comments:
Post a Comment