नांदेड : अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंच महाराष्ट्र, शाखा- नांदेड यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेली ऑनलाईन काव्यमैफल रंगली.
काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक वीरभद्र मिरेवाड होते तर नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश मुनेश्वर हे उद्घाटक होते. कविसंमेलनात कवी मिलिंद जाधव, राणी नेम्माणीवार, साहेबराव कांबळे, रुपेश मुनेश्वर, अर्चना गरुड, विजया तारु, महेंद्र नरवाडे, गणपत गायकवाड, मनोहर बसवंते, सूर्यभान खंदारे, सागर गौरव, सोनबा दवणे सहभागी होते.
रमेश मुनेश्वर यांच्या 'शब्द:चक्षु' या कवितेने काव्यमैफलीचे उद्घाटन झाले. त्यानंतर कवी संमेलनाध्यक्ष वीरभद्र मिरेवाड यांनी 'मातीत शाबूत राहावी म्हणून ' या कवितेने कार्यक्रमाचा बहारदार प्रारंभ केला. सरचिटणीस मिलिंद जाधव यांनी प्रास्ताविक व राणी नेम्माणीवार यांनी सूत्रसंचालन केले. रुपेश मुनेश्वर यांनी आभार केले.
साहेबराव कांबळे यांनी
"गाली खळी तुझ्या ग
लोचनांनी या लुटावी,
येताच जवळी सखे ग
का पापणी तू मिटावी.."
ही रचना सादर करून वाहवा मिळवली.
यानंतर अर्चना गरुड यांनी
"चांदण्या रात्रीला
हवास तू कवेत
ऋणानुबंधाची नाते
जुळो तुझं सवेत.."
ही कविता सादर केली.
"जागले एक स्वप्न नवे
मंद का श्वास आहे,
गुंतले तुझ्यात मी प्रेमाचा आभास आहे.."
या कवितेच्या सादरीकरणातून राणी नेम्माणीवार यांनी दाद मिळवली.
"रंग प्रेमाचा असतो कसा
कळण्याआधीच रंग तो जसा
जसा जसा रंगत जातो
तसा गोडवा भरत राहतो.."
या विजया तारुंच्या कवितेने रंगत आणली.
"का जातीस दूर अशी
दिव्यातील वात बाकी आहे,
ये जवळ जराशी अजूनही
आपली बात बाकी आहे.."
कवी मनोहर बसवंते यांची ही कविता भाव खाऊन गेली.
सांगावा कार महेंद्र नरवाडे यांनी
"हे कविते, तुझा शिल्पकार
होण्याचे भाग्य मला आज मिळालं
माझ्या रोमारोमात उठणारे
तरंग शब्दमय झाले.."
ही रचना सादर करून वाहवा मिळवली.
यानंतर मिलिंद जाधव यांनी
"परसबागी, चाफा पांढरा
प्रिय चंद्रा, माझ्या दारी
सखे ये ना.. एकदाच
आनंदच बघायला.. "
या रचनेतून परसबाग फुलवली.
रुपेश मुनेश्वर यांच्या
" ये पाऊसधारा घेऊन
ये मोरपिसारा लेऊन
ये सखे साजणी
प्रीतीने न्हाऊनी.. "
या गेय रचनेने मैफल जिंकली.
सूर्यभान खंदारे यांनी
"निळ्याशार आकाशात
पुनवचा चंद्र आला,
नक्षत्रांच्या भेटीला
चंद्र आहे साक्षीला.."
ही कविता सादर करून दाद मिळविली..
नजर तिची न माझी
झाली नजरानजर
झाली नजरानजर
ती झाली अजरामर..
सोनबा दवणे यांनी ही प्रितिची रचना सादर केली.
"तुझी रे छाया, मीच राया
नको विस्मरण, क्षणाचेही.."
ही रचना उर्मीला परभणकर यांनी दमदार सादर केली.
राजू भगत यांनी
" प्रेम असावे असे
सूईच्या टोकावरही
लक्ष भार पेलणारे,
तुडूंब सागरातही,
वलय निर्माण करणारे "
ही प्रेम व्यक्त करणारी कविता सादर केली..
गणपत गायकवाड व सागर गौरव यांनीही बहारदार रचना सादर केल्या. गुगल मिटवर झालेल्या या कविसंमेलनास बहूसंख्येने ऑनलाईन श्रोते उपस्थित होते.





No comments:
Post a Comment