श्वानपुराण : विनोदी आणि करूण
- पुस्तक परिचय : विलास शिंदे
प्रा.डॉ . अंबादास कांबळे यांच्या " श्वान पुराण " या एकांकिका संग्रहाचा विलास शिंदे यांनी दिलेला परिचय बोधी रंगभूमी दिनाच्या निमित्त येथे देत आहोत
-संपादक
भ्रमणध्वनीचा जमाना सुरू झाला आणि टपाल येणे कमी झाले. त्यातही फेसबुक आणि व्हॉट्सअप आल्यापासून दिपावलीच्या आगेमागे येणारी शुभेच्छापत्रेही बंद झाली. आता पोस्टाने येतात ती मासिके आणि दिपावली अंक. अशा आभासी दुनियेत असताना काल टपालातून तीन पत्रे आली. त्यातील दोन माझे लेख असलेले दिपावली अंक होते. तिसऱ्या पाकिटातून एक सुंदर छोटेखानी पुस्तक होते. पुस्तकाचे नाव ‘श्वानपुराण’! लेखक नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या बळीराम पाटील महाविद्यालयातील शिक्षक डॉ. अंबादास कांबळे.
अंबादास सरांचे पुस्तक पाहून मनस्वी आनंद झाला. त्यांचा मला दोन वर्षे सहवास लाभला. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा कुलसचिव पदाचा कार्यभार सांभाळत असताना त्यांची ओळख झाली. विद्यापीठातील सांस्कृतिक स्पर्धांच्या तयारीमध्ये दोन ‘एक्के’ फार पुढे असत. अंबादास कदम आणि अंबादास कांबळे. कदम सरांचे खळाळून हसणे आणि कांबळे सरांचे स्मितहास्य. दोघेही लाघवी. कदम सर वनस्पतीशास्त्राचे तर कांबळे सर प्राणीशास्त्राचे. दोघेही सांस्कृतिक स्पर्धांची तयारी करणे आणि आयोजनात अग्रभागी. त्यावेळी अंबादास कांबळे सर एकांकिका लिहितात, हे समजले. त्यांच्या लेखनाने त्यावेळीच प्रभावित झालो होतो. मनाला भिडणारे लेखन. हसवत, हसवत प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणण्याची ताकत त्यांच्या लेखनात होती. मात्र हे साहित्य प्रकाशित झालेले नव्हते. त्यामुळेच सहा एकांकिकांचे पहिले पुस्तक प्रसिद्ध झाल्याचे पाहून मनस्वी आनंद झाला.
या सर्व एकांकिकांचे विषय म्हटले तर वेगळे आहेत. पहिली एकांकिका ‘श्वानपुराण’ ही एका सत्य घटनेवर आधारित आहे. एक दलित महिला सवर्ण व्यक्तीने पाळलेल्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालते. दलित महिलेने दिलेली भाकरी खाऊन कुत्रा बाटतो, असे सवर्ण व्यक्तीचे म्हणणे. सवर्ण व्यक्ती कुत्र्याच्या शुद्धीकरणासाठी पैसे मागते. दलित महिला पैसे देण्यास नकार देते. परिणामी कुत्रे दलित महिलेच्या दारात सोडले जाते. हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्याच्या दरबारात पोहोचल्याची ती बातमी २०१० मध्ये मीही वाचली होती. एकविसाव्या शतकातही ‘जात’ जात नाही, हे पाहून अस्वस्थही झालो होतो. पुढे काळाच्या ओघात विसरलोही. मात्र अंबादास सरांनी याच वेदनादायी घटनेवर एकांकिकेच्या माध्यमातून संवेदनशील प्रबोधनात्मक भाष्य केले आहे. हे करताना कुत्र्याचा शिवी म्हणून वापर करणारा माणूसच किती अनियंत्रित आणि बेशिस्त आहे, याचे वास्तवदर्शी दर्शन घडते. या एकांकिकातून हाताळलेले विषय सामाजिक आहेत. त्या विषयांना जाती धर्माची बंधने नाहीत. असे प्रसंग सर्वच समाजात, धर्मांत, जातीत आणि पंथांत आढळतात.
दुसरी एकांकिका ‘सबसे तेज कल तक’ ही दूरचित्रवाहिन्या टीआरपीच्या नादात कसे वार्तांकन करतात, हे खुमासदार पद्धतीने सांगणारी. खरं तर ही एकांकिका मूळात पथनाट्य म्हणून लिहिली होती.वार्तांकन करणारांच्या वर्तनामुळे एकीकडे हसू येते, तर दुसरीकडे डोळ्यांत पाणीही उभे राहते. हीच गोष्ट लेखकाचे मोठेपण अधोरेखित करते. वेदना मांडताना विनोदाने हास्य आणि प्रसंगाने मनात करूणा निर्माण करणे हे खरंच कठिण काम. मात्र असे हे लेखन वाचताना वारंवार घडते. जखमी विव्हळणाऱ्या व्यक्तीला ‘तुम्ही बाँबस्फोट झाला तेव्हा येथे काय करत होता?’ असला प्रश्न असो किंवा पाणी मागणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारणे असो. या मांडणीतून आपण अशा वाहिन्यावरचे वार्तांकन का बघतो, असा प्रश्न वाचकाला पडल्याशिवाय राहात नाही. त्यांनी लिहिलेल्या एकांकिकांचे वाचन करताना दृष्यस्वरूप डोळ्यांसमोर उभे राहते. त्यामुळे वाचन आनंददायी बनते. पूरपरिस्थिती, बाँबस्फोट या घटनांचे वार्तांकन पाहण्याचे अनुभवच जिवंत होत राहतात.
एकलव्य आणि द्रोणचार्यांची कथा सर्वांना माहित असणारी. या कथेला ‘व्याधपुत्राचा वेध’ या एकांकिकेत मांडले आहे. एकलव्य गुरुच्या मागणीनुसार उजव्या हाताचा अंगठा कापून देतो. दिलेले वचन पाळतो आणि नंतर द्रोणाचार्यांना जाणीव करून देतो की मी उजव्या हातापेक्षा डाव्या हाताने आणखी चांगला लक्ष्यभेद करू शकतो. हा आधुनिक बदलत्या विचारांना मांडण्याचा प्रयत्न खूपच चांगला जमला आहे. द्रोणाचार्यांना अर्जुन नव्हे, तर, अश्वत्थाम्यालाच संपूर्ण विद्या द्यावयाची होती. मात्र अर्जुनाच्या बुद्धीचातुर्यामुळे ते शक्य होत नाही. एकलव्य खरेतर स्वत:च विद्यार्जन करतो. मात्र द्रोणाचार्य आपल्या वचनाला पाळण्यासाठी त्याचा अंगठा मागून निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करतात आणि अर्जुनच श्रेष्ठ धनुर्धर असे मानतात. मात्र आजचा एकलव्य त्यांच्या पुढेच आहे, हे सांगणारी ही एकांकिका खूपच चांगली उतरली आहे.
‘गाव हरवलेली माणसं’ ही आणखी एक उत्तम एकांकिका या संग्रहात आहे. आज शहरात जागा भाड्याने देतानाही व्यक्तीच्या जातीचा विचार केला जातो. त्याचे पद, मान सन्मान यापेक्षा जातीला महत्त्व कसे आहे, हे या एकांकिकेचे मुख्य सूत्र. गावातील परिस्थिती विसरण्यासाठी माणसे शिकतात, शहरात जातात. मात्र तिथे त्यापेक्षा भयाण वास्तव समोर येते. या सर्व गोष्टींवरचे मार्मिक भाष्य या एकांकिकेत आहे. लेखक आपले म्हणणे यथोचितपणे वाचकापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला आहे.
पाचव्या एकांकिकेत ‘माणसांचा खेळ’ मांडला आहे. या एकांकिकात राजकारण, समाजकारण, हुंडाबळी, पर्यावरण, बालविवाह, नरबळी, बेरोजगारी इत्यादी सामाजिक मुद्द्यांवर भाष्य आहे. एवढे मुद्दे असूनही एकांकिका बोजड होत नाही. प्रवाहीपणे पुढे जाते आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवते. या एकांकिकेत भाषा खूपच छान पद्धतीने वापरली आहे. नेमक्या शब्दांचा वापर केला आहे. यामध्ये भोंडल्याची गाणी नकळत येतात आणि त्या त्या जागी चपखल बसतात. वेगळ्या पद्धतीने मात्र प्रभावी मांडणीने अनेक समस्या एकाच एकांकिकेत बसवण्यात लेखक यशस्वी झाला आहे. हे त्यांचे कौशल्य अभिनंदनीय आहे.
‘बॉब बिल देना’ ही दोन व्यसनी मित्रांची कथा. आयुष्यभर मित्राला स्वत:च्या पैशाने दारू पाजणारा नायक आजारी पडतो. तो मरणासन्न असताना त्याकडे दवाखान्याचे बिल देण्यासाठी पैसे नसतात. दारूगुत्त्याची बिले भागवणारा नायक दवाखान्याचे बिल द्यायला मित्राला सांगतो, हे दुर्दैवी चित्र अनेक ठिकाणी दिसते. व्यसनाधिनता कशी संसाराची वाट लावते, हे चित्र समोर उभा करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
पुस्तक हाती आले आणि वाचायचा मोह आवरला नाही. रात्रीत पुस्तक संपवले. पुस्तक खाली ठेवावेसे वाटले नाही. वाचल्यानंतर मनापासून लिहावेसे वाटले. मुळात हल्ली एकांकिका प्रकार हा केवळ स्पर्धेसाठी लिहिला जातो, असे वाटते. गत पाच वर्षात अनुप जत्राटकर यांच्या एकांकिका संग्रहानंतर वाचनात आलेला हे दुसरेच पुस्तक. त्यामुळे हे एकांकिकांचे पुस्तक येणेच अभिनंदनीय आहे. त्यातही एकांकिकांत हाताळलेले विषय त्यांची मांडणी यामुळे संपूर्ण पुस्तक वाचनीय झाले आहे. पुस्तकाला दत्ता भगत यांची सविस्तर प्रस्तावना आहे. प्रेमानंद गज्वी यांनी शेवटच्या पानावर खूप छान भाष्य केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठही सुंदर आहे. पुस्तकात एकांकिका सादर करताना काम केलेल्या कलाकारांची नावे दिली आहेत. त्यांच्या बहुतांश एकांकिका पुरस्कारप्राप्त आहेत. अंबादास कांबळे सरांचा विषय प्राणीशास्त्र. प्राण्यांचे जीवन अभ्यासता अभ्यासता या शिक्षकाने माणसेही वाचली आणि मानवी स्वभावाच्या विविध छटा या संग्रहात शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा! त्यांचा हा पहिला एकांकिका संग्रह आहे. त्यांनी लिहिलेल्या पण पुस्तकरूपात न आलेलया आणखी काही एकांकिका आहेत. त्यांच्या हातून नवीन एकांकिकांचे लेखनही व्हावे ही मनोमन इच्छा आहे. त्यांचे अनेक एकांकिकांचे संग्रह प्रसिद्ध होवोत आणि आम्हा वाचकांना वाचनानंद देवोत, हीच शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव - ‘श्वानपुराण’,
लेखक डॉ. अंबादास कांबळे,
लेखकाचा भ्रमणध्वनी - 9822313283
प्रकाशक – कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठे – ११२
किंमत – रु. १००/-




No comments:
Post a Comment