किनवट (नांदेड) : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या माहूर शहरात दरवर्षी देशभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. पर्यटन केंद्राच्या दृष्टीने शासनाने येथे सुविधा उपलब्ध करून देण्याची खरी गरज होती. परंतु त्याकडे तत्कालीन लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने राज्यात नावलौकिक असलेल्या माहूर शहराच्या पर्यटनाचा प्रश्न दुर्लक्षित राहिला. माहूर शहराला ‘पर्यटन हब’च्या धर्तीवर विकसित केल्यास उत्पन्न वाढ होऊन बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार भीमराव केरामांनी राज्य शासनाकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. नुकतेच केरामांच्या मागणीचा उल्लेख करून नितीन गडकरी यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र पाठवून माहूर पर्यटन विकासासाठी २१६.१६ कोटीच्या आराखड्याला मंजुरी देऊन सहकार्य करण्याची मागणी केली आहे.
तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या माहूर शहराला निसर्गाचा अनमोल ठेवा लाभला आहे. सह्याद्रिच्या पर्वतरांगा मध्ये वसलेले घनदाट जंगल, बाजूला वाहणारी पैनगंगा नदी, लिंगण भुयारी लेण्या, गड किल्ल्यांचे वैभव, प्राचीन शिल्प कलेचा इतिहास येथे पाहायला मिळतो. एकंदरीत पर्यटनासाठी ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहे. त्या सर्व इथे निसर्गाने आधीच निर्माण करून ठेवल्या आहेत. गरज आहे ती त्याच्या संवर्धनाची की, ज्या मुळे पर्यटन विकासाला चालना मिळेल. पर्यटन वृध्दी होऊन बेरोजगारांना रोजगार निर्मिती होईल असे काही करण्याची. या सर्व बाबी लक्षात घेऊन आमदार भीमराव केरामांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. केरामांच्या मागणीच्या अनुषंगाने गडकरींनी दिनांक ११ जानेवारी रोजी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र पाठवून २१६.१६ कोटी रुपयांचा माहूर पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
आमदार केरामांच्या विकास कामाचा आलेख वाढतोय!
आमदार भीमराव केराम निवडून आल्यानंतर कुणालाही प्रत्यक्ष भेटणार नाहीत किंवा ते त्यांच्या अडीअडचणी सोडवणार नाहीत असा काहीसा संभ्रम विरोधकांकडून पसरविण्यात आला होता. विरोधक काय वावड्या उठवतात याकडे लक्ष न देता. जनतेसाठी काय करता येईल याची आखणी करून मागील वर्षभराच्या काळात जनतेच्या हिताचे कित्येक निर्णय केरामांनी मंजूर करून घेतले आहेत. त्यात कृषीमालाला हमी भावात खरेदी करणे, मतदार संघातील रुग्णवाहिकांचा प्रश्न सोडवने, इजिमाचा राज्यमार्ग म्हणून समावेश, उच्च पातळी बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी पाठपुरावा आदी वाखण्याजोगी कामे केली असून ही उद्याच्या सुजलाम सुफलाम किंनवट माहूरची चाहूल आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विरोधी बाकावर बसून देखील त्यांनी कामांचा धडाका सुरू ठेवल्याने आपसूकच आमदार केरामांच्या विकास कामाचा आलेख वाढतोय असेच म्हणावे लागेल.




No comments:
Post a Comment