*कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी नांदेड जिल्ह्यात हे असतील निर्बंध* ▪️जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश निर्गमीत - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Thursday, March 11, 2021

*कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणासाठी नांदेड जिल्ह्यात हे असतील निर्बंध* ▪️जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश निर्गमीत

 



नांदेड (जिमाका), 11 :- जिल्ह्यात कोविड-19 रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला व वाढत्या बाधित रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी विविध निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध दिनांक 12 मार्चच्या मध्यरात्री 12.00 वाजेपासून ते 21 मार्चच्या मध्यरात्री 12 पर्यंत लागू राहतील.

 

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बुधवार दि. 10 मार्च रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविड-19 चे मोठ्या प्रमाणावर वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे क्रमप्राप्त झाले. ही बाब विचारात घेऊन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेत काही निर्बंध घातले आहेत. या निर्बंधात नांदेड जिल्ह्यामध्ये पुढीलप्रमाणे आदेश अधिनियमानुसार पारीत केले आहेत.

 

नांदेड जिल्ह्यातील व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व कोचिंग क्लासेस 12 ते 21 मार्च 2021 या कालावधीत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन, शिक्षण मंडळ स्तरावरील यापूर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोविड-19 विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात येत आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांचे पालन करुन चालू राहतील. हे निर्बंध औषधी दुकानांसाठी लागू राहणार नाहीत.

 

नांदेड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार 12 ते 21 मार्च 2021 या कालावधीमध्ये पूर्णपणे बंद करण्यात येत आहेत. लग्न समारंभ व इतर समारंभ 15 मार्च 2021 पर्यंतचे पूर्वनियोजित असलेल्या कार्यक्रमांच्या बाबतीत तहसिलदार तथा इन्सीडेंट कमांडर यांचेकडून परवानगी घेण्याच्या व कोविड-19 चे बाबतीत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे अधिन राहून तसेच आयोजक व मंगल कार्यालय, लॉन्स, हॉल्सचे धारक यांनी याबाबतीत तहसिलदार यांचेकडे प्रतिज्ञापत्र सादर करणेच्या अटीवर सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 50 लोकांच्या मर्यादेत घेण्यास परवानगी राहील. दिनांक 16 ते 21 मार्च 2021 या कालावधीत लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात येत आहे.

 

खाद्यगृहे, परमिट रुम / बार फक्त सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत कोविड-19 चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करुन 50 टक्के टेबल्स क्षमतेने सुरु राहतील. होम डिलिव्हरीचे किचन/वितरण कक्ष रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.

जीम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदान, स्विमिंग पूल हे वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील. तथापि सामुहिक स्पर्धा, कार्यक्रम बंद राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम / उत्सव समारंभ पूर्णपणे बंद राहतील. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे सकाळी 7 ते सायं. 7 यावेळेत सुरु राहतील. धार्मिक स्थळी एकावेळी 50 व्यक्तींपेक्षा जास्त उपस्थिती राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरु राहील आणि एका आड एक याप्रमाणे ओटे राहतील याची दक्षता स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासनाने घ्यावी.

 

सर्व संबंधित विभागांनी कोरोना जनजागृती सप्ताह सुरु करुन जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करुन नागरिकांमध्ये कोविड-19 बाबतचे मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याबाबत जनजागृती करावी. तसेच कोविड-19 बाबतीत शासनाच्या मार्गदर्शक सूचना जसे मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हॅन्ड सॅनीटायझरचा वापर इत्यादी बंधनकारक राहील.

 

वरीलप्रमाणे नमूद आदेश हे 12 मार्च 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 21 मार्च 2021 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील. सर्व संबंधित विभागांनी या आदेशाप्रमाणे तंतोतंत पालन व अंमलबजावणी करावी. या आदेशाचे कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 आणि साथरोग कायदा, 1897 आणि यासंदर्भातील शासनाचे इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी 10 मार्च 2021 रोजी निर्गमीत केले आहेत.


No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News