मातंग जात समूहातील झुंजार बाप-लेकांनी व्यवस्थेविरुद्ध दिलेली ' झुंज'
पुस्तक परिचय : डॉ. मारोती कसाब
मातंग म्हणजे हत्तीचं बळ असलेला माणूस. आपल्या शक्तीच्या जोरावर महा आतंक माजविणारा तो मातंग. मातेच्या अंगापासून जन्मलेला तो मातंग. मातंग म्हणजे आदिमानव. मातंगी म्हणजे देवी. शेतीची निर्माती. मातंग आणि मातंगी यांनी मिळून शेतीचा शोध लावला. बैलाचे तिसरे शिंग मोडून, त्याचे अंडकोष ठेचून त्याला नामर्द करून आणि त्याच्या नाकात दाभण टोचून, हाताने वळलेल्या दोरीची ' वेसण' घालून मातंगानेच त्याला शेतीला लावले.
मातंग शेतीचे पुरोहित होते. मातंग ऋषी सारखे अनेक विद्वान या कुळात जन्माला आले. मातंग शूर होते. वीर होते. युद्ध कलेत पारंगत होते. महात्मा बसवण्णांच्या अनुभव मंडपात कवी होते.
संपूर्ण भारतभर त्यांची राज्ये होती. आर्य-अनार्य यांच्या संघर्षात मातंग कुळांची राज्ये बुडाली. आर्यांकडून हरलेल्या मातंग कुळाची ओळख डोंब, चांडाळ, दास -शूद्र अशी झाली. मातंग या शब्दाचा अपभ्रंश होऊन ' मांग ' हा शब्द प्रचलित झाला. अस्पृश्यतेचे लाजिरवाणे जिणे मांगाच्या वाट्याला आले.
मांग म्हणजे राग. परंतु या व्यवस्थेने पद्धतशीरपणे पदोपदी अपमान करून मांगामधला राग जिरवण्याचे काम केले. धार्मिक परंपरांच्या नावाखाली 'मांग बळी' देण्याची प्रथा सुरू झाली. गढी - बुरुजाच्या पायात, मोठमोठ्या किल्ले आणि इमारतींच्या पायात मांगाला तेल शेंदूर पाजून जिवंतपणे गाढण्यात येऊ लागले.
गावाच्या भल्यासाठी म्हणून मांगाला पर गावाशी लढायला लावण्यात आले. दुसऱ्या गावातून होळीचा विस्तव आणताना त्या गाववाल्यांनी पकडून मांगांना ठार केल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्रात सापडतात. बळी गेलेल्या मांगांच्या समाध्या आजही याची साक्ष देत उभ्या आहेत. इंग्रजी राजवटीच्या विरोधात लढल्या मुळे इंग्रज सरकारने मांगाला ' जन्मजात गुन्हेगार ' घोषित करुन छळ छावण्यात डांबले. तीन वेळची हजेरी लावली.
एकूणच काय तर मांगाचे जगणे इथल्या व्यवस्थेला मान्य नव्हते. 'भेटला मांग तर फिटला पांग' असे म्हणून एका बाजूला त्याला गोंजारण्यात आले ; तर दुसर्या बाजूला सर्व प्रकारच्या वंचना त्याच्यावर लादून त्याचे जगणे हराम करण्यात आले. गाळात रुतलेल्या हत्तीसारखी अवस्था झालेल्या मातंग जात समूहात लेखक रामराव अनिरुद्ध झुंजारे यांचा जन्म झाला.
' झुंज ' या आत्मकथनाच्या पहिल्याच पानावर रामराव लिहितात - " लांब्या व्हळ, गुकाड्या व्हळ अन् बेंडक्या व्हळ ह्या तीन व्हळांच्या चिमटीत उधळं शेलगाव मांगांना दाढेत धरुन बसलं होतं. ह्या गावातला माझा जन्म. म्या कधी जन्मलो तो वार, मास अन् तारीख बापूलाबी ठावं नाही. बोंबंचा महिना तेव्हढाच त्याला माहीत होता. जन्मल्याबरोबर म्या बोंबलत होतो . गावातले लोक बी माझ्यासंगं बोंबलत होते. माय बापू मला आता बी सांगतात, भावकीचे सारे लोक तुला शिव्या देत होते. बोंबंच्या महिन्यातलं पोरगं मायबापाच्या मुळावर येते. मुळावर आलेलं पोरगं असं मला लोक म्हणत होते. अशा भोळ्या आणि अज्ञानी समाजात मी जन्मलो.
आमचं जिणं म्हणजे कुत्र्या- मांजरा परिस हलकं. गावच्या कुत्र्याला किंमत होती; पण मांगांना नव्हती. त्यांना कोणी जवळ येऊ देत नव्हतं की शिवत नव्हतं. सगळ्या मांगांची हीच गत. मांगांना पाहिल्याबरोबर पाटलांच्या कपाळावर तिरस्काराच्या आठ्या पडत. पाटलांच्या जीवावर जिणं जगणारी मांग जात. त्यांचे जोडे शिवावं, त्याच्या मोबदल्यात अर्धी कोर भाकर पाटलीणी मोठ्या थाटात मांगाच्या पदरात वाढत होत्या. मांगांची घरं पूर्वेला होती. ती घरं नसून कोंबड्यांची खुराडीच. त्या खुराड्यात अनेक मांग जन्मले, लहानाचे मोठे झाले अन् मेले. मांगांना पाण्याला शिवण्याचा हक्क नव्हता. पाटील मांगाच्या ओंजळीत पाणी वाढत होते.
प्रत्येक सणाला मांगाला मागावे लागे. संध्याकाळी नाही बरं का ! दुसऱ्या दिवशीच्या सकाळी. शिळंबिळं उरलेलं पाटलीणी मांगाच्या टोपल्यात वाढत. प्रत्येक घरी मांग टोपले घेऊन जात. नजरचुकीने जर एखादं घर मागायचं राहिलं तर गरजल्या सारखं पाटील मांगावर गरजत होते.
" आरं ये मांगडगे हो, माजले काय रं ?
तुमच्या मायची गांड झवली.
राहायचं की नाही रे गावात ? मला काय समजलं ? मला काय वाळीत टाकलं की काय? खरकट्याहो, दुसऱ्यांदा माझं घर विसरले तर याद राखा. माणसासारखे वागा जरा. अरे तुमच्या परीस कुत्रं बरं "
महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या सीमाभागात असलेलं शेलगाव हे महाराष्ट्रातील इतर गावांसारखच एक गाव. या गावातील पाटील मांगांना आपल्या हक्काचा गुलाम समजत. त्यांच्याकडून विनामोबदला काम करून घेत.
लेखक रामराव झुंजारे यांच्या वडिलांना ही गुलामगिरी असह्य झाली. अनिरुद्ध महादू झुंजारे हा काळा कुळकुळीत धिप्पाड देह असणारा गावचा गुलाम; मात्र स्वाभिमानी मांग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्याने ऐकलेले होते. बाबासाहेबांवर त्याची प्रचंड निष्ठा होती. म्हणून त्याने आपल्या मुलांना शिकविण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा तो आपला मोठा मुलगा रामराव याला घेऊन गावातल्या शाळेत गेला. मास्तरांनी प्रथम त्याला वर्गात घ्यायला नकार दिला. मात्र दर आठवड्याला एक लाकडाचा बिंडा टाकण्याच्या बोलीवर रामरावला शाळेत प्रवेश मिळाला.
शिक्षण घेणारा गावातील एकमेव अस्पृश्य विद्यार्थी. शाळेतील मुले त्याचा द्वेष करीतच ; मात्र शिक्षक सुद्धा त्याचा द्वेष करायला कमी करत नसत. शिक्षक त्याला संपूर्ण शाळा झाडायला लावीत. त्याने अभ्यास केला तरी पहात नसत आणि सातत्याने त्याचा अवमान करून बोलत असत. तरीही रामराव चौथी पास होतो आणि पुढील शिक्षणासाठी मुदखेडला जातो. आजोळी राहून मुदखेडला जाणे येणे करतो. त्याच्या आजी आणि मावश्यांना शिक्षण मान्य नसल्यामुळे त्याही रामरावचा छळ करतात. त्याला उपाशी पोटी ठेवतात. असाच उपासपोटी शाळेत गेलेला रामराव शाळेतून परत येताना रस्त्यात त्याला 'भुताचं खाजं' दिसतं. रामराव त्यावर तुटून पडतो. उतारा खाल्ल्यामुळे रामराव आजारी होईल, ही भीती त्याच्या काकाला होती; मात्र रामरावला काही होत नाही. कारण रामराव भुताखेतांवर विश्वास ठेवीत नव्हता.
रामराव दुसऱ्या क्रमांकाने पाचवी पास होतो आणि सहावीला उमरीच्या वसतिगृहात दाखल होतो. वसतिगृहात नंबर लावण्यासाठी दोघा बापलेकांना पाटलाच्या शेतात एक आठवडाभर फुकट राबावे लागते. रामराव आणि त्याच्या कुटुंबाचे प्रत्येक ठिकाणी व्यवस्थेकडून शोषण झाले आहे. अनेकांनी त्यांची मजूरी बुडविली आहे.
मॅट्रिक पास झाल्यानंतर रामराव धर्माबादच्या शास्त्री महाविद्यालयात शिकायला जातो. तिथं वसतिगृहात राहून तो सुट्टीच्या दिवशी कामाला जातो.
एकदा कॉलेजचा पांढराशुभ्र ड्रेस आणि पायात नवी चप्पल घालून रामराव गावात येतो. तेव्हा पारावर बसलेली पाटील मंडळी त्याला जाब विचारतात आणि पायातली चप्पल हातात घेऊन जायला भाग पाडतात.
प्रत्येक उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत अंगमेहनत करून रामराव नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयातून आपले बी.ए. पूर्ण करतो. तिथेच एम.ए. इंग्रजी पूर्ण करतो. आणि बी.एड्. शिक्षणासाठी मध्य प्रदेशातील भोपाळला जातो. भोपाळला जाताना एका रेल्वे पोलिसाच्या मदतीने अकोला पर्यंत विनातिकीट प्रवास करतो. भोपाळ मध्ये त्याला भालेराव नावाचा नांदेडचा मित्र भेटतो. दोघे मिळून कॉलेजचे प्राचार्य जे. एस. राजपूत सरांना भेटतात. त्यांना आपली कर्मकहाणी सांगतात आणि कॉलेज सुरू होईपर्यंत काम मिळवून देण्याची विनंती करतात. प्राचार्य राजपूत त्यांना काम मिळवून देतात. दोघांचेही ऍडमिशन होते. मात्र तिथेही प्रा. पचौरी आणि शेख शफी हे दोन शिक्षक रामराव आणि भालेराव यांना हलक्या जातीचे म्हणून हिणवतात. वर्षभर त्रास देतात. प्रात्यक्षिक परीक्षेत नापास करतात. मात्र पुन्हा अभ्यास करून रामराव पास होतो आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या मुरारका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होतो.
रामराव प्राध्यापक झाला तरी त्याच्या मागील जात सुटता सुटत नाही. हलक्या जातीचा म्हणून विद्यार्थी त्याचा अवमान करतात. जाणिवपूर्वक वर्गात त्रास देतात. तेव्हा आंबेडकरी विचाराचे विद्यार्थी रामराव यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतात. प्राध्यापक होऊनही रामरावांना वसतिगृहातच राहावे लागते. अनेक दिवस त्यांना शेगावात खोली मिळत नाही.
पोराला नोकरी लागल्यानंतर रामरावांच्या वडिलांनी 'मांगकी ' सोडून दिली. घरातील हलगी, सनई, सूर आदी वाद्यांची जाहीर होळी केली. हे पाहून गावातील महारांनीही 'महारकी' सोडून दिली. गावकी सोडण्यासाठी मांगांना आणि महारांना रामरावानेच फितवल्याचा समज करून गाव बिथरला. रामरावाचा जीव घ्यायला टपला. गावाने दलितांवर बहिष्कार टाकला; मात्र पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि रामरावांनी शेलगाव सोडले.
आपल्या गावातील गरीबाचा मुलगा प्राध्यापक झाला, याचा आनंद होण्याऐवजी गावकऱ्यांना प्रचंड दुःख झाले. यावरून तथाकथित सवर्ण समाजाची मानसिकता लक्षात येते.
ही कहाणी आहे मातंग जात समूहातील बाप-लेकांनी व्यवस्थेविरुद्ध दिलेल्या प्रखर झुंजीची. संपूर्ण मातंग जात गावाची गुलामी करीत असताना अनिरुद्ध महादू झुंजारे यांनी आपल्या चारही मुलांना शिक्षण दिले. त्यांना नोकरीच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले. यातून उपेक्षित वंचित समूहाने मोठा बोध घेण्याची गरज आहे. व्यवस्थेकडून पदोपदी हिणवले गेले. अवमानित केले गले. तरीही न डगमगता रामराव आणि त्यांच्या वडिलांनी कडवी झुंज दिली. शिक्षण घेतले आणि नोकरीमध्ये स्थैर्यही प्राप्त केले. हा एका दुर्दम्य जिद्दीचा प्रवास आहे.
लेखकाने आपल्या कुटुंबासाठी प्रचंड खस्ता खाल्ल्या. स्वतःला शिक्षण घेता यावे म्हणून वडिलांसोबत मिळेल ते काम केले. कामाची कधी लाज धरली नाही. म्हणूनच तो आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकला. विशेष म्हणजे लेखक आणि त्याचे वडील आणि भाऊ सर्व प्रकारच्या व्यसनांपासून आणि अंधश्रद्धांपासून दूर राहिले. त्यांनी बुद्धाचे पंचशील अंगिकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वाभिमानी विचार स्वीकारले. म्हणूनच ते या व्यवस्थेविरुद्धच्या लढाईत यशस्वी होऊ शकले. शेलगावात मांगकी करणाऱ्या अनिरुद्ध महादू झुंजारे आणि केवळाबाई झुंजारे यांच्या चारही मुलांना शिक्षणाच्या बळावर चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. ते गुलामीच्या गु-घाणीतून बाहेर पडले. त्यांनी जातीवर मात केली. माणसाला गुलाम करणारा कथित धर्म नाकारला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान स्वीकारले. हा आदर्श संपूर्ण वंचित शोषितांनी घेतला पाहिजे.
साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी ' फकिरा' या कादंबरीत मातंग जात समूहाचे वास्तव दर्शन घडवून या जमाती पुढे 'फकीरा' च्या रूपाने आदर्श ठेवला होता. मात्र नंतरच्या काळात अनेक दुःख, यातना सहन करूनही या समूहाने आपल्या दुःखाला वाचा फोडली नव्हती.
शंकर भाऊ साठे यांनी 'माझा भाऊ अण्णा भाऊ' (१९८०) या आत्मकथनात काही अंशी या समूहाचं दर्शन घडवलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने मातंग जात समूहाची दुःखं मांडण्याचा मान उत्तम बंडू तुपे यांच्या 'काट्यावरची पोटं' (१९८२) या आत्मकथनाकडे जातो. त्यानंतर आर. के. त्रिभुवन यांचे 'दे दान सुटे गिरान' , गणपत पोचिराम वाघमारे यांचे 'असा होतो... असा झालो' , विजय कुमार सूर्यवंशी यांचे 'काठी' , बापू यशवंत पाटील यांचे 'उतारा' , प्राचार्य जे.एस. तोटरे यांचे 'अनुभवाची शिदोरी ' दलितमित्र धनाजीराव घोडजकर यांचे 'हिरापुत्र' , ऍड.एकनाथ आव्हाड यांचे 'जग बदल घालुनि घाव' , शिल्पकार मारोती दाढेल यांचे 'कारकोदवा' , प्रा. डॉ. बाबासाहेब घाटगे यांचे 'बटी' आणि ल. सि. जाधव यांचे 'होरपळ' आणि 'सूळ काटा ' ही मातंग जात समूहाच्या सुखदुःखांची मांडणी करणारी मोजकी आत्मकथनं आली.
या पार्श्वभूमीवर १९९८ साली प्रकाशित झालेले 'झुंज ' हे रामराव अनिरुद्ध झुंजारे यांचे आत्मकथन निश्चितच वेगळे ठरावे असे आहे. कारण यातील नायकाचा झुंजार आंबेडकरी बाणा हा वाचकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रेरणा देणारा आहे.
एका कष्टाळू, रगदार , अब्रूदार, निर्व्यसनी, विज्ञानवादी आणि स्वाभिमानी आंबेडकरवादी कुटुंबाची ही कहाणी मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर नेणारी नक्कीच आहे. भोकर- धर्माबाद, उमरी परिसरातील अस्सल मराठवाडी भाषा हे या आत्मकथनाचे अजून एक बलस्थान आहे. ही केवळ कुटुंब कथा नाही; तर मातंग जात समूहाच्या वेदनेची गाथा आहे. यानिमित्ताने मांग लोकसंस्कृती, मांग भाषा, प्रथा परंपरा आणि मांगांचे अभावग्रस्त जगणे प्रथमच उजागर झाले आहे.
प्रांजळ सत्यकथनाला आत्मविश्वासाची जोड असल्यामुळे हे आत्मकथन अधिकच उठावदार झाले आहे. लेखक रामराव अनिरुद्ध झुंजारे यांच्या धाडसाला सलामच...! त्यांचे हार्दिक अभिनंदन..!
' झुंज' ( आत्मकथन )
लेखक- रामराव अनिरुद्ध झुंजारे
प्रकाशक -डिंपल पब्लिकेशन, वसई रोड स्टेशन ठाणे, मुंबई.
प्रथमावृत्ती- १२ जून १९९८
पृष्ठ संख्या- १९६
किंमत- १२५ रुपये.
-डॉ. मारोती कसाब,
महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जि. लातूर
मो. ९८२२६१६८५३
kasabmaroti@gmail.com




No comments:
Post a Comment