नांदेड : आंबेडकरी चळवळीतील महान जलसाकार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या २०२१-२२ या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने शहरात आज शनिवारी २१ मे रोजी महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी यशदा पुणे येथील संशोधन अधिकारी (प्रशिक्षण अधिकारी ) तथा आंबेडकरी साहित्यिक विचारवंत डॉ. बबन जोगदंड हे राहणार असून भारतीय सिनेसृष्टीतील प्रतिभावान अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात येथील ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांना संयोजन समितीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी माजी उच्च व शिक्षणमंत्री डी. पी. सावंत, महापौर जयश्री पावडे, मनपा स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, सामाजिक कार्यकर्ते गजानन मुधोळ, अविनाश राऊत, स्वागताध्यक्ष बालाजी इबितदार, निमंत्रक जी.पी. मिसाळे, सत्यशोधक फाऊंडेशनचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, मानव विकास संस्थेचे राज गोडबोले, संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे आदींची उपस्थिती राहणार आहे.
शहरातील कुसुम सभागृहात २१ मे रोजी सकाळी अकरा वाजता एकदिवसीय राज्यस्तरीय महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनास प्रारंभ होणार असून उद्घाटन सत्रात प्रकाशन, जीवनगौरव पुरस्कार, सत्यशोधक फाऊंडेशनचे समाजभूषण पुरस्कार, दशकातील जलसाकार पुरस्कार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर हिंगोली कथाकार शिलवंत वाढवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कथाकथन कार्यक्रमात भंडारा येथून ऍड. विशाखा बोरकर, दर्यापूरच्या संघमित्रा खंडारे तसेच नायगाव येथील कथाकार विरभद्र मिरेवाड यांच्या आंबेडकरी कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न होईल. त्यानंतर दु. ४ वा महाकवी वामनदादा कर्डक यांच्या गितांमधील समग्र आंबेडकरवाद या विषयावर परिसंवादास प्रारंभ होईल. यात औरंगाबाद येथील प्रख्यात आंबेडकरी विचारवंत तथा समीक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, यवतमाळ येथील सुनिता काळे सहभागी होणार असून या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत प्रा. रविचंद्र हडसनकर हे उपस्थित राहणार आहेत.
संमेलनाच्या चौथ्या सत्रात प्रा. विलास भवरे यांचा आयुष्य नांगरतांना आणि रुपेश निकाळजे यांचा क्रांतीचा साक्षीदार हे एकपात्री प्रयोग सादर होतील. समारोपाच्या सत्रात सायंकाळी ठराव वाचन आणि एकाच दिवशी तीन-तीन ठिकाणचे मानधन घेऊन आपणास वाटलं त्या ठिकाणी जाणाऱ्या व्यावसायी व्याख्यात्या प्रा. सुषमा अंधारे यांचे व्याख्यान होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. बबन जोगदंड, मराठा सेवा संघाचे कामाजी पवार, दशरथ लोहबंदे यांची उपस्थिती राहणार आहे. शेवटच्या सत्रात सुप्रसिद्ध जलसाकार प्रतापसिंग बोदडे, कुणाल वराळे, ललकार बाबू यांच्या उपस्थितीत वामनदादांच्या अजरामर गितांचा जलसा सादर होणार आहे. हा जलसा सुप्रसिद्ध भीमगायक क्रांतीकुमार पंडित सादर करणार आहेत. येथील ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमोद कांबळे, जनार्दन मोहिते, सज्जन बरडे, प्रेम हनवते, शलिक जिल्हेकर, संजय गोडघाटे, किरण पतंगे, संजय मोखडे, सुनंदा बोदिले, शुभांगी जुमळे, सरिता सातारडे, देवकांत वंजारे यांच्या उपस्थितीत उद्घाटन पूर्व सत्रात विद्रोही काव्य मैफिल रंगणार आहे.
संपूर्ण संमेलनाच्या नियोजनाची तयारी पूर्ण झाली असून यशस्वीतेसाठी एन. डी. गवळे, प्रा. कैलास राठोड, प्रफुल्ल सावंत, डॉ. सी. के. हरनावळे, भीमराव हाटकर, प्रशांत वंजारे, बापू लाभली, एन.टी. पंडित, बाबुराव कसबे, प्रभू ढवळे, नितीन एंगडे, डॉ. राम वनंजे, रमेश कसबे, संजय जाधव, ज्ञानोबा दुधमल, राहुल गवारे, एम. एस. गव्हाणे, आर. पी. झगडे, अशोक मल्हारे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, शंकर गच्चे कैलास धुतराज, प्रशांत गवळे, रुपाली वागरे वैद्य, बाबुराव पाईकराव, रणजीत गोणारकर आदी परिश्रम घेत आहेत.
कुसुम सभागृह परिसरास स्मृतीशेष मिलिंद एंगडे यांघे नाव
शहरात २१ मे रोजी शनिवारी महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलन संपन्न होत असून कुसुम सभागृह परिसराचे आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते स्मृतिशेष मिलिंद एंगडे साहित्यनगरी असे नामकरण करण्यात आले आहे. विचारमंचाला वामनदादांचे शिष्य भीमशाहीर दलितानंद यांचे नाव देण्यात आले असून प्रवेशद्वाराला पॅंथर रोहिदास यशवंत ढवळे यांचे नाव देण्यात आले आहे.




No comments:
Post a Comment