किनवट : विधानसभा मतदारसंघातील माहूर व किनवट तालुक्यातील होतकरू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचा मार्ग सुकर करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या सौजन्याने व आमदार भीमराव केराम यांच्या पुढाकाराने येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी (दि. 18) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालयातर्फे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांनी दिली.
आदिवासी बंजारा बहुल दुर्गम डोंगराळ भागातील होतकरू उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारीचा मोठा प्रश्न या भागात मागील अनेक वर्षापासून कायम आहे. उपजीविकेचा प्रश्न सोडवण्यासाठी येथील तरुण तरुणींना शहराचे ठिकाण गाठून जेमतेम मोबदल्यावर मिळेल ते काम करून आपला व आपल्या परिवाराचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. विकास कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी खेचून आणतानाच बेरोजगारांच्या रोजगाराचा प्रश्नही भेडसावत होता. या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री श्रीमंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतील पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्यात नामांकित उद्योग, कंपन्यामध्ये नोकरीची संधी, कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, स्टार्टअप व उद्योजकता साठी मार्गदर्शन, अप्रेंटिसशिप रोजगारासाठी नोंदणी, बायोडाटा कसा लिहावा व मुलाखत कशी द्यावी याचे प्रशिक्षण, स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध कर्ज योजनांची माहिती आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. शिवाय राज्यभरातील एकूण १९ नामांकित कंपन्या मध्ये तब्बल एक हजार नऊशे पन्नास एवढ्या रिक्त जागा येथील आयोजित मेळाव्यातून भरल्या जाणार आहेत. या रोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार जनसंपर्क कार्यालया तर्फे करण्यात येत असल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक श्री कुडमते यांनी दिली.
किनवट - माहूर विधानसभा मतदारसंघात उद्योगधंदे नसल्याने तरुणावर बेरोजगाराची कुऱ्हाड!
देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात गाजावाजा करून साजरा केला गेला. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षापेक्षा अधिक काळ झाला असला तरी किनवट -माहूर विधानसभा मतदारसंघात एकही उद्योग धंदा किंवा कारखाना उभा राहू शकला नसल्याने तरुण युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.
मतदारसंघामध्ये प्राथमिक सुविधा असणेआवश्यक असले,तरी त्यामुळेच विकास होतो काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. बेरोजगार तरुणाच्या रोजगाराची समस्या उग्ररूप धारण करत असतानाच तालुक्यात पहिलीच वेळ आहे की आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले जात आहे.




No comments:
Post a Comment