किनवट : नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील बौद्ध तरुण अक्षय भालेराव यांच्या निर्घुन हत्येप्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस निरीक्षक किनवट यांच्या मार्फत निवेदन सादर करून खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या गावातील रहिवासी असलेल्या अक्षय भालेराव या बौद्ध तरुणाचा जातीय द्वेषातून खून करण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या रागातून हे क्रूर हत्याकांड घडविण्यात आले. या घटनेचे तीव्र पडसाद किनवट तालुक्यात उमटले असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली सदर घटनेचा निषेध व्यक्त करून किनवट पोलिसांमार्फत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या या खुणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. पुरवणी जवाब नोंदवावे. विश्वासू साक्षीदार ठेवावेत, सक्षम तपास अधिकाऱ्याची नेमणूक करावी. प्रामाणिक व अभ्यासू सरकारी वकीलाची नेमणूक करावी, मयत अक्षयच्या कुटुंबियांना व घटनेतील साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, पीडित कुटुंबाला शासनाने 1 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी व कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. अक्षय भालेराव हा वंचित बहुजन आघाडीचा निष्ठावंत पदाधिकारी होता. तो वरचढ ठरेल या भीतीपोटी त्याची क्रूरपणे हत्या घडवून आणली. यात काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांचा हात असल्याची आमची शंका आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा तपास निःपक्षपाती करून आरोपींना कठोर शिक्षा दिली पाहिजे असे राजेंद्र शेळके म्हणाले. या प्रकरणात ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लक्ष घातल्याने अक्षय भालेरावला निश्चितपणे न्याय मिळेल असेही त्यांनी सांगितले. निवेदनावर वंचितचे राहुल चौदंते, निखिल वाघमारे, सिद्धार्थ वाघमारे, दत्ता कसबे, संदीपराजा हनवते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




No comments:
Post a Comment