किनवट (परमेश्वर पेशवे) : निर्मल हिमायतनगर महामार्गावर असलेल्या भिशी ते कोल्हारी या मुख्य रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून जवळपास तीन किलोमीटर कामावर डांबरीकरण न करता गुत्तेदारांनी गीट्टी अंथरून ठेवल्याने या ठिकाणी जवळपास तीन ते चार मोटरसायकल चालकाचे अपघात सुद्धा झालेत पण संबंधित गुत्तेदारांना व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कुठलीही जाग आली नाही.
तब्बल दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर या ठिकाणच्या राजकीय वरदहस्त असलेल्या गुत्तेदारांनी अचानक एका रात्रीमध्ये अंथरलेल्या गिट्टीच्या थरावर दबाई करण्यास सुरुवात केली व त्या गिट्टीवर पाणी टाकून दबाई न करता लगेच दुसऱ्या दिवशी डांबरीकरणाच्या कामास सुरुवात केल्याने या परिसरातील जनतेतून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. संबंधित महामार्गावरील भिशी ते कोल्हारी या ठिकाणचे डांबरीकरणाचे व मजबुतीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून हे काम तात्काळ थांबण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रकाश करेवाड यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे केली. तर सदरील काम हे व्यवस्थित होत नसून या कामाचा दर्जा खालावला असल्याची बाब कोसमेट येथील मा. सरपंच तथा गुतेदारी क्षेत्रात काम करणारे व सदरील कामाचा अनुभव असणारे शिवाजी बोटेवाड यांनी या महामार्गावरील हे काम व्यवस्थित होत नसल्याची बाब काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या निदर्शनास आणून दिली. पण तुम्हाला यातील काय समजते असे उत्तर या गुत्तेदारांनी माजी सरपंच यांना दिले. व या रस्त्याला दहा वर्षे सुद्धा खड्डा पडणार नाही. असे सांगायला सुद्धा गुत्तेदार महाशय विसरले नाहीत. तेव्हा संबंधित सरपंचांनी या विभागाचे कनिष्ठ अभियंता सुरकुंडे यांच्याशी संपर्क साधला असता ,आज माझा शासकीय सुट्टीचा दिवस आहे असे सांगून वेळ साधून नेली. व माझ्याकडे तालुक्यातील जवळपास 45 गावे आहेत मी कुठे कुठे लक्ष देऊ असे उत्तर त्यांना ऐकायला मिळाले. सदरील महामार्गावरील रस्त्याच्या कामासंदर्भात लाखो रुपयाची अंदाजपत्रके मंजूर झाली असताना जर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुग गिळून गप्प असतील तर कामाचा दर्जा कसा सुधारणार ? व तक्रार धारकांनी तक्रार कुणाकडे करावी ? हा प्रश्न तक्रार धारकांना पडणे साहजिकच आहे.? संबंधित महामार्गावरील काम निकृष्ट दर्जाच्या स्वरूपाचे होत असताना जनतेकडून सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्याकडून संबंधित प्रकरणाची दखल घेण्यात यावी अशा स्वरूपाची रास्त अपेक्षा असते पण सार्वजनिक बांधकाम विभाग कामाकडे दखल घेण्याऐवजी दुर्लक्ष करते. तेव्हा भोकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व खासदार हेमंत पाटील यांनी या बाबीकडे लक्ष वेधावे अशा स्वरूपाचीच मागणी आता जनतेतून समोर येत आहे.




No comments:
Post a Comment