किनवट : स्वातंत्र्याचा व मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिदुर्गम डोंगरी व मागासलेल्या माहूर आणि किनवट तालुक्याला आमदार भीमराव केराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनोडा, उनकेश्वर, मारेगाव आणि किनवट अशा चार उच्च पातळी बंधाऱ्यांना मंजुरी दिल्याने या उच्च पातळी बंधाऱ्यामुळे किनवट विधानसभा मतदारसंघातील पाच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. माहूर व किनवटसाठी राज्य शासनाची ही एक ऐतिहासिक भेट ठरली आहे.
किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किनवट मतदार संघ विकास कामासाठी दत्तक घेत असल्याचे सुतोवाचक केले होते. त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतून केली आहे. माहूर - किनवट तालुक्यात सिंचनाचा अनुशेष दूर करणारे किनवट आणि माहूरकरांची कायमस्वरूपी तहान भागविणारे पैनगंगा नदीवर धनोडा, उनकेश्वर, मारेगाव आणि किनवट येथे उच्च पातळी बंधारे विशेष बाब म्हणून मान्यता मिळण्याची आग्रही मागणी मान्य करून घेण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी पाठपुरावा केला होता. त्याचेच फलस्वरूप आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत माहूर किनवट तालुक्यातील चार उच्च पातळी बंधाऱ्यांना कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करत मंजुरी देण्यात आल्याने किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील वर्षानुवर्षाचा सिंचनाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
शिवाय पैनगंगा नदीवरील उनकेश्वर येथेउच्च पातळी बंधाऱ्यास विशेष बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आमदार भीमराव केराम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून व पत्र व्यवहार केल्याने आजच्या सिंचन गिफ्ट मध्ये उनकेश्वरचा ही प्राधान्य क्रमाने समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या सिंचन गिफ्ट मुळे माहूर किनवट तालुक्यातील तब्बल पाच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, व तसेच आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या शासन धोरणाची अंमलबजावणी देखील होत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रलंबित असलेला उनकेश्वर बंधारा,माहूर उच्च पातळी बंधारा व त्यासोबतच किनवट आणि मारेगाव उच्च पातळी बंधारा हे सिंचनाचा अनुशेष भरून काढणाऱ्या प्रकल्पांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पामुळे किनवट विधानसभा मतदारसंघातील तब्बल पाच हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या धाडसी निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना किनवट मतदार संघातील तमाम शेतकरी, शेतमजूर व तसेच सर्वच घटकातील जनता धन्यवाद देत आहे.




No comments:
Post a Comment