*अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रबोधन आवश्यक* #*नियोजन भवन येथे एकदिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा संपन्न* - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Monday, September 7, 2026

*अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रबोधन आवश्यक* #*नियोजन भवन येथे एकदिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा संपन्न*



नांदेड, ता. 7: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, 1989 व सुधारित अधिनियम, 2016 यांची प्रभावी अंमलबजावणी, कायद्यातील तरतुदी तसेच विविध यंत्रणांची भूमिका याबाबत अधिकारी, कर्मचारी, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आणि सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे एकदिवसीय प्रबोधनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बार्टीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड, तज्ज्ञ व्याख्याते ॲड. डॉ. भीमराव हाटकर तसेच समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे उपस्थित होते. 


बार्टीच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी, या कायद्याच्या अनुषंगाने विविध शासकीय यंत्रणांची भूमिका आणि आवश्यक कार्यवाही याबाबत सखोल मार्गदर्शन केले. कायद्यातील तरतुदींची योग्य माहिती संबंधित यंत्रणांना असणे आणि पीडितांना वेळेत न्याय व आवश्यक मदत मिळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात तज्ज्ञ व्याख्याते ॲड. डॉ. भीमराव हाटकर यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील विविध कायदेशीर तरतुदी, त्यांची अंमलबजावणी आणि कायद्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या बाबी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थितांनी विविध कायदेशीर बाबी समजून घेत मार्गदर्शकांशी संवाद साधला.


प्रास्ताविकात सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत मृत व्यक्तीच्या वारसांना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात 34 अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी 20 वारसदारांना वर्ग-4 संवर्गातील शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील पोलीस विभागासाठी अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अनुषंगाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक तसेच संबंधित कार्यान्वित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच ‘नशामुक्त भारत अभियानाची’ शपथ घेण्यात आली. 

या कार्यशाळेस नांदेड जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक गजानन पांपटवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका समन्वयक अंजली नरवाडे यांनी केले.




No comments:

Post a Comment

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News