आंबेडकरी साहित्यास ऊर्जा देणारा काव्यसंग्रह : ' अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ..' - NIVEDAK NEWS
"निवेदक न्यूज : समाज परिवर्तनासाठी " सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, विकासात्मक, लोकोपयोगी, ज्ञानवर्धक,बातम्या, संवाद आणि माहितीच्या आदान -प्रदानासाठी निवेदक न्यूजशी संपर्क साधा. E-mail : nivedaknews@gmail.com What's App no. 09021439951

जाहिरात

Translate

Live

Followers










Tuesday, May 21, 2019

आंबेडकरी साहित्यास ऊर्जा देणारा काव्यसंग्रह : ' अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ..'



पुस्तक परिचय :
रमेश मुनेश्वर,
किनवट ( नांदेड )
7588424735



' काया वाचा मनी तथागत बुध्द
माझ्या जिंदगीची नजाकत बुध्द
अंतिम सत्य तू समजून घे जरा
साऱ्या या पिढ्यांची हकिकत बुध्द'
       तथागत बुध्द व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी नाळ जुळलेला कवी रमेश बुरबुरे यांचा "अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ.." हा कवितासंग्रह वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणारा आहे. बाबासाहेबांनी ज्या तरतुदी संविधानात करुन दिल्या त्याची व्यवस्थेकडून होत असलेली दुरावस्था पाहून कवीला प्रश्न पडतो..
' बा भिमाचे कायदे तू पाळले का ?
संविधानाला कधी तू चाळले का ?
या समाजाची दिशा तू काय केली ?
शिकविले बा नी तसे सांभाळले का ?
     शेतकऱ्यांची थट्टा निसर्ग तर करतोच पण विविध सरकारी योजना सुध्दा थट्टेचाच विषय झाला आहे. अशावेळी एका शेतकऱ्याचा मुलगा असलेला कवी आपल्या कवितेत लिहितो..
'कोरडवाहू शेती तीन एक्कर करतो तो
आपल्या घामाचेही अत्तर करतो तो
झुकणे नामंजूर त्याला कर्जमाफीसाठी
स्वाभिमानासाठी स्वतःला खत्तम करतो तो '
     राजकारणी आपल्या स्वार्थासाठी सरकारचा वापर करतात, स्वार्थी पुढाऱ्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे दिसते तर सर्वधर्मसमभाव शब्दांचा काहींना विट आलाय. अशावेळी कविच्या या ओळी मार्मिक वाटतात..
' शासनाचा लाड आता फार झाला
ह्या पुढाऱ्यांचा भुईला भार झाला
काल ज्यांनी जात माझी पाहिली अन
आज पाठी खंजिराचा वार झाला '
     स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय आणि हक्क देणाऱ्या भारतीय राज्यघटनेला खऱ्या अर्थाने अमलात आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. संविधान आपले रक्षण करते म्हणून आपणही संविधानाचे रक्षण केले पाहिजे..
' जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते
रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते
आयुष्यमान करते सद्धम्म मानवाला
सुटलाच तोल अमुचा तर सावधान करते '
     बहुजनांचे नेते एकत्र नसल्यामुळे चळवळीची हानी होतांना दिसते. बहूजनांचे नेते एकत्र आले तर शासनकर्ती जमात होण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होण्यास बळ मिळेल असे कविला वाटते..
'हात हात अपुले मिळणार सांग केव्हा ?
होऊन एक सगळे लढणार सांग केव्हा ?
विसरून चळवळीला करतोय मौज मस्ती
उपकार बा भिमाचे फिटणार सांग केव्हा ?'
     कवी तथा गझलकार रमेश बुरबुरे हे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तहसिलमधील निंबर्डा पो. शिरोली या गावचे. त्यांच्या पहिल्याच 'अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ..' ह्या कविता संग्रहाचे आंबेडकरवादी गझल संमेलन मुंबई येथे नुकतेच प्रकाशन झाले. सोलापूरच्या थिंक टँक पब्लिकेशन अॅन्ड डिस्ट्रिब्युशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून यात 82 कविता -गझल आहेत. संदेश तुपसुंदरे यांनी मार्मिक मुखपृष्ठ रेखाटले आहे. यवतमाळ येथील सुप्रसिद्ध गझलकार विनोद बुरबुरे यांचा बोलका अभिप्राय तर निवेदनकार तथा गझलकार किरणकुमार मडावी यांची सविस्तर प्रस्तावना या संग्रहाची उंची वाढवते.
      यातील सर्वच कविता -गझल विचारप्रर्वतक आहेत. सत्य व स्पष्टपणा यात आहेत. वेदना, विद्रोह, समस्या यावर भाष्य करणाऱ्या रचना आहेत. आंबेडकरी चळवळीत नवी ऊर्जा देण्याचे काम या संग्रहातून होईल यात मात्र शंका नाही. एक उमदा प्रतिभावंत साहित्यिक आंबेडकरी चळवळीत भरारी मारण्यास सज्ज झाला आहे. त्यांच्या काव्यप्रवासास क्रांतीकारी शुभेच्छा.. !
'वेदना लपवण्या घावाची झूल पांघरतो आम्ही
शेतासोबतच नव्याने आयुष्य नांगरतो आम्ही'
पुस्तकाचे नाव:
अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ
कवी : रमेश बुरबुरे
प्रकाशक : थिंक टँक पब्लिकेशन्स अॅन्ड डिस्ट्रिब्युशन सोलापूर
पानं : 100
मूल्य : 100


1 comment:

जाहिरात

Website Views

Flag Counter

जाहिरात

MAHARASHTRA WEATHER

MAHARASHTRA WEATHER

Popular Posts

Nivedak News