किनवट :
अनुभवातून साहित्य निर्मिती व्हावी. माणंसांचे जगणे हे साहित्यातून यावे. कविता ही कल्पनेवर नाही तर वास्तव जीवन व्यक्त करणारी असावी.आपल्या परिसरातील माणंस साहित्यातून मांडावेत.परिसरातील बोलीचे संवर्धन करावे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक प्रा. रविचंद्र हडसनकर यांनी केले.
ते येथील बळीराम पाटील, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागांतर्गत ' मराठी वाङमय मंडळाच्या ' उदघाटन प्रसंगी बोलत होते. प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर अध्यक्ष होते. प्रा.रामप्रसाद तौर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक कवी रमेश मुनेश्वर, नाटककार प्रा.डॉ. अंबादास कांबळे, प्रा.डॉ. आनंद भालेराव, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने,उत्तम कांनिदे हे अतिथी विचारमंचावर उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.पंजाब शेरे यांनी केले.प्रा.तौर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुढे बोलतांना प्रा. हडसनकर म्हणाले ' कवितेमुळे घर सुटले पण आयुष्याचंउभं प्रागंण माझ्यासाठी खुले झाले. जीवनाला आकार मिळत गेला. महाकवी वामनदादा यांच्या सहवासातून परिवर्तनाची गाणी लिहू लागलो. जगातील सर्वात मोठे दैवत माय आहे. तिला समजून घ्यावे. आमची संस्कृती समजून घ्यावी. पुस्तक वाचनाने जीवन बदलून जाते. कथा, कविता, कादंबरी, वैचारिक साहित्य वाचून नवी प्रेरणा मिळते. कष्ट, श्रम यांना महत्त्व द्यावे. 'आईतवार आला की, माय म्हणायची ' ही कविता त्यांनी सादर केली.
...चुकले नाही सुट्टीच्या दिवशी,
मायीसंगे मजुरीला जायचे,
माय निंदायची भराभरा,
मी भरायचा पूंजाने.
या बरोबर
सरावन महिना आला की,
असाच जीव भंडाऊन जाते.
आभाळ फाटल्यावानी सांडू लागले की,
झोपडी पुळु पूळू रडू लागते.
कृषी,संस्कृती, दारिद्रय, माय, बापांच्या पायातील खुरुप, आपली माणसं साहित्यातून मांडावेत. दुःखावर प्रेम करायला शिकले पाहिजे.आपल्या अनुभवावर कविता असावी.पंरतू अनुभवाची व्याप्ती ही सर्वसमावेशक कशी होईल यांचे चितंन होत नाही. तोपर्यंत चांगली कविता निर्माण होत नाही. समोरचे जग पाहून जीव जळला की, आत्मतेजाने प्रकाशित होऊन कविता निर्माण होते. जिच्या डोक्यात ज्ञानाचा प्रकाश आहे. ती स्वयंम प्रगतीचा मार्गक्रमण करील.
.....आई माझी काळजी करतील कशाला.
उजेड घेतला की ग उशाला.
ही कविता त्यांनी सादर केली.
...प्रिये, आलीस आहेस इथवर,
आभाळभर घे साठवून,
ही माझी चिरफाड झालेली माणूस!
आयुष्य अत्यंत जटील आहे.
शेतात राबराबणा-या माय, बापाच्या हाताला पडलेल्या भेगा एकदा लक्षपूर्वक पहा त्यातून साहित्य जन्माला येईल.
या नभासम माय, बाप
या भूईला घामाचे तू दान द्यावे.
अरे, कोणती पापे आली येथे जन्माला.
मुठभर दाण्यासाठी मौताज व्हावे.
अशी दर्जेदार कविता सादर करुन कबीरांचे दोहे सांगितले. 'थंडा बर्फ' ही कथा सादर करुन उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध केले.
प्रेम, वेदना, अनुभव, सामाजिक जाणीव हे साहित्यातून व्यक्त झाले पाहिजे. प्रकाशाचा सतत शोध घेणे म्हणजे वाड़़मय निर्माण करणे होय असे मत व्यक्त केले. याच कार्यक्रमाचं औचित्य साधून नुकताच महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रमेश मुनेश्वर यांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना त्यांनी ही शेतकऱ्यांच दुःख, वेदना मांडणारी कविता सादर केली.
हातापायाच्या जखमा साऱ्या, बाच्या कहाण्या सांगायच्या,
.... तरीही बाप जगायचा...
याप्रसंगी नवनिर्माण अभ्यास मंडळातील सर्वांचे स्वागत करण्यात आले. उन्मेष भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास रुपेश मुनेश्वर, प्रा.उमाकांत इंगोले, डॉ. सुरेंद्र शिंदे, डॉ. गजानन वानखेडे आदिंसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. प्रल्हाद जाधव यांनी सूत्रसंचालन केले ; तर प्रा. दयानंद वाघमारे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment